

Artificial Intelligence technology
sakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
आपण अशा जगाकडे चाललो आहोत जिथे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक निर्जीव वस्तूला एक छोटासा ‘मेंदू’ मिळणार आहे. तंत्रज्ञानाची पद्धत बदलतेय. एआय आता क्लाउडमध्येच अडकून राहणार नाही, तर थेट आपल्या हातातल्या उपकरणात येऊन बसणार आहे. या बदलाचंच नाव आहे ‘एज एआय’.
आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ याची चर्चा चहाच्या टपरीपासून थेट कॉर्पोरेट बोर्डरूमपर्यंत सगळीकडे रंगलेली दिसते. चॅटजीपीटी असो, गुगलचा जेमिनी असो किंवा एआयवर चालणारी इतर कितीतरी ॲप्स असोत, या सगळ्यांनी आपलं रोजचं आयुष्य नक्कीच सोपं केलंय. कुठलाही प्रश्न विचारला, की लगेच त्याचं उत्तर मिळतं, कंटाळवाणा ई-मेल क्षणात तयार होतो, अगदी जुन्या फोटोतला मजकूरसुद्धा शोधता येतो आणि अस्पष्ट झालेले चेहरे किंवा वस्तू ओळखता येतात; पण ही सगळी जादू नेमकी घडते कुठे, याचा आपण फारसा विचार करत नाही.