अचंबित करणारं एडिनबर्ग

एडिनबर्ग येथील भव्य ऐतिहासिक इमारती, दगडी वास्तू, चर्च, राजवाडे, म्युझियम्स, आणि हॉटेलच्या बिल्डिंगसुद्धा बघत राहाव्या अशा आहेत.
Edinburgh capital of Scotland heritage of historical architecture important educational center of Scotland
Edinburgh capital of Scotland heritage of historical architecture important educational center of ScotlandSakal
Updated on

एडिनबर्ग येथील भव्य ऐतिहासिक इमारती, दगडी वास्तू, चर्च, राजवाडे, म्युझियम्स, आणि हॉटेलच्या बिल्डिंगसुद्धा बघत राहाव्या अशा आहेत. अभ्यासकच नव्हे तर सामान्य जनांसाठीसुद्धा एडिनबर्गमधलं वातावरण अचंबित करणारं आहे.

- विशाखा बाग

आपण जाणार आहोत युकेमधल्याच स्कॉटलंड या देशांमध्ये. इंग्लंडच्या वरच्या बाजूला म्हणजेच उत्तरेकडे स्कॉटलंड वसलेला आहे. निसर्गरम्य तलावांचा प्रदेश, बर्फाच्छादित डोंगर आणि काही ठिकाणी ओसाड प्रदेश स्कॉटलंडमध्ये बघायला मिळतात;

पण एकंदरीतच इंग्लंडपेक्षासुद्धा जास्त, एक प्रकारचं राकट निसर्गसौंदर्य अनुभवायचं असेल तर स्कॉटलंडला भेट द्यायलाच हवी. एडिनबर्ग ही आहे स्कॉटलंडची राजधानी. ऐतिहासिक वास्तुकलेचा संपन्न वारसा मिरवणारं आणि स्कॉटलंडचं महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र असलेलं हे शहर.

डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये एडिनबर्गला आम्ही भेट दिली. राजधानीचं गाव म्हणून या शहराचा वेगळा तोरा आणि मान तर आहेच; पण हे शहर ऐटदार आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. शहरात पावलोपावली असलेल्या ऐतिहासिक इमारती आणि वास्तू पाहिल्यात की आपणही एका वेगळ्या युगात वावरतो आहे, असंच वाटतं.

लंडनहून डायरेक्ट ट्रेन जाते आणि चार ते साडेचार तासात आपण एडिनबर्गला पोहोचतो. रेल्वे स्टेशन अगदी मुख्य गावातच आहे. आपण तिथून सहज चालत महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊ शकतो. स्टेशनपासून जवळच प्रिन्सेस स्ट्रीटवर जो मुख्य रस्ता आहे, तिथेच आम्ही हॉटेल बुक केलं होतं.

या शहराने मोस्ट ब्युटीफूल अँड वॉकेबल सिटी असा मान मिळवला आहे. हॅरी पॉटरच्या मुव्हीज तुम्ही बघितल्या असतील किंवा पुस्तकं वाचली असतील, तर एडिनबर्ग या शहरात फिरतानासुद्धा अगदी तसाच अनुभव येतो. जे. के. रोलिंग हिने एडिनबर्ग इथेच एका कॅफेमध्ये बसून हॅरी पॉटर लिहायला सुरुवात केली होती.

तीन दिवस आम्ही शहरातील सर्व मुख्य ठिकाणांना भेटी दिल्या. या शहरात १००च्या वर छोट्या-मोठ्या बागा आहेत. शहराची लोकसंख्या साडेपाच लाख आहे आणि त्याहून अधिक झाडं इथे आहेत. शहरात रात्रंदिवस उत्तमरीत्या चालणारी पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे.

तुमचा चहा झालाच असेल किंवा तुम्ही चहा घेऊन आलाच असाल, हे प्रसिद्ध वाक्य पुण्याचं नसून एडिनबर्गचं आहे. अठराव्या शतकामध्ये मेकॅनटोश नावाच्या माणसाला चारचौघांमध्ये बसून आवाज करत चहा प्यायला आवडायचं नाही आणि तेव्हापासून त्याच्यामुळे हे वाक्य बोलायला सुरुवात झाली. असं हे एडिनबर्ग बघताना मला क्षणोक्षणी अचंबित करत होतं. भारावलेल्या नजरेनं आजूबाजूचा सर्व नजारा डोळ्यात साठवून ठेवावा, असंच वाटत होतं.

एडिनबर्गचे मुख्य आकर्षण आहे होलीरूड हाऊस. हे पॅलेस अजूनही इंग्लंडमधल्या राजाचं स्कॉटलंडमधील उन्हाळी सुट्टीमधलं ऑफिशियल रेसिडेन्स म्हणून ओळखलं जातं. अजूनही शाही घराण्याचे लोक दरवर्षी उन्हाळ्यामध्ये स्कॉटलंडच्या या पॅलेसमध्ये राहायला येतात.

सोळाव्या शतकापासून उभा असलेला हा भव्य राजवाडा पाहताक्षणीच आपल्या मनात घर बांधतो. आजूबाजूचा परिसर, प्रचंड पसरलेल्या बागामध्ये उभा असलेला हा २८९ खोल्यांचा राजवाडा. शाही घराण्याचे लोक जेव्हा इथे राहायला असतात, तेवढे दिवस सोडून पर्यटकांना हा राजवाडा बघता येतो.

या राजवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूला स्कॉटिश पार्लमेंटची नवी बिल्डिंग उभी आहे. रॉयल माइल ही साधारण एक मैल पसरलेली एक लांब मोठी गल्ली किंवा रस्ता हे एडिनबर्गचे मुख्य आकर्षण आहे. या रस्त्याच्या एका बाजूला आहे एडिनबर्ग किल्ला आणि दुसऱ्या बाजूला होलीरूड हाऊस.

या दोन्ही मुख्य शाही घराण्याच्या इमारतींच्या मध्ये जो रस्ता आहे, त्यालाच ‘रॉयल मैल’ म्हणतात. इतिहास काळात राजाचं मार्गक्रमण मुख्यतः या रस्त्यानेच होत असे. आतासुद्धा याच मुख्य रस्त्यावर महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत.

हॉलीरूड हाऊसपासून आम्ही चालतच सेंट गाईल्स कॅथेड्रलकडे निघालो. रस्त्यात वेगवेगळी रेस्टॉरंट्स आणि कॅफे दिसत होते. अतिशय सुंदररीत्या फुलांनी हे कॅफे बाहेरून सजवले होते. या रस्त्यावर अनेक इंडियन रेस्टॉरंटसुद्धा आहेत.

एडिनबर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहत असल्यामुळे भारतीय जेवणाची अजिबात अडचण भासत नाही. रस्त्यात अनेक टुरिस्ट तर दिसत होतेच; पण खास स्कॉटलंडचा असा पारंपरिक पोशाख घालून बॅग पाइपर वाजवणारे स्कॉटिश लोकसुद्धा दिसतात. जुन्या ऐतिहासिक काळात बॅग पाइपरची धुन ऐकत एक प्रकारच्या धुंद वातावरणात आम्ही फिरत होतो, असंच वाटत होतं. आजूबाजूला धुकं पसरलेलं होतंच.

ओल्ड टाऊन सेंटरसुद्धा बघण्यासारखे आहे. इथेच वेगवेगळे म्युझियम्स आहेत. जुन्या गावात रॉयल मैलच्या दगडी रस्त्यावरून फिरताना थकायला मात्र अजिबात होत नाही. आजूबाजूला वेगवेगळ्या दुकानांमध्ये मांडून ठेवलेल्या खास स्कॉटलंडची आठवण करून देणाऱ्या भेटवस्तू, इथले प्रसिद्ध टारटन कापड आणि त्यापासून बनवलेले विविध कपडे बघायला मिळतात.

मऊ लोकरीची, परंतु कॉटनसारखी दिसणारी आणि वेगवेगळ्या आकर्षक रंगातले चौकडी कापड ही खरी स्कॉटलंडची ओळख. हे सगळं बघतच आम्ही चालत एडिनबर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचलो. असं म्हणतात की निद्रिस्त ज्वालामुखीपासून तयार झालेल्या मोठ्या दगडावर किंवा डोंगरावर एडिनबर्ग किल्ला आहे.

अकराव्या शतकात बांधण्यात आलेला हा राजवाडा तीन लाख ८४ हजार चौरस फूट पसरलेला आहे. डोंगर चढून आल्यानंतर राजवाड्यासमोर भव्य मोठे पटांगण आहे आणि तिथून तुम्हाला संपूर्ण एडिनबर्ग शहराचा देखावा, स्काय लाईन अतिशय सुंदर दिसते. इथे उभे राहून किल्ला बॅकग्राऊंडला दिसत असलेले फोटो तुम्ही काढू शकता.

अजून एक मुख्य रस्ता म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट. हा रस्ता वेगवेगळ्या आकर्षणांनी भरलेला आहे. पुढच्या दोन दिवसांत आम्ही स्कॉटिश मॉन्युमेंट, वॉर मेमोरियल, वॉटरलू प्लेस, बोटॅनिकल गार्डन, केल्टन हिल, डीन व्हिलेज, ऑर्थर सीट आणि वेगवेगळे गार्डन्स अशा अनेक ठिकाणी मनसोक्त भटकंती केली. केल्टन हिलवरून संपूर्ण शहराचा देखावा आणि त्याच्या मागच्या बाजूला पसरलेला समुद्र दिसतो.

इंडस्ट्रियल, सर्व्हिस सेक्टर, टुरिझम आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांची पार्श्वभूमी असलेलं आणि त्यावरच सर्व शहराचं आर्थिक गणित असलेल्या एडिनबर्गमध्ये आर्थिक सुबत्ता जाणवत होती. सार्वजनिक ठिकाण, ऐतिहासिक वास्तू, वेगवेगळ्या बागा, अतिशय सुसज्ज अशी सार्वजनिक वाहतूक, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा हे सर्व बघून स्कॉटलंडला गेल्यावर एडिनबर्ग शहरालासुद्धा नक्कीच भेट द्यायला हवी.

gauribag7@gmail.com(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com