esakal | मेळघाटातील दोन दशकांची ‘प्रकाशयात्रा’

बोलून बातमी शोधा

डॉ. आशिष व डॉ. कविता सातव.

मेळघाटात आदिवासींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन दशकांहून अधिक काळ झटणारे डॉ. आशिष व कविता सातव यांना ‘महादेव बळवंत नातू पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. ९) पुण्यात त्याचे वितरण होणार आहे. त्यानिमित्त डॉ. सातव यांच्याशी साधलेला संवाद.

मेळघाटातील दोन दशकांची ‘प्रकाशयात्रा’
sakal_logo
By
सु. ल. खुटवड

मेळघाटात आदिवासींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन दशकांहून अधिक काळ झटणारे डॉ. आशिष व कविता सातव यांना ‘महादेव बळवंत नातू पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. ९) पुण्यात त्याचे वितरण होणार आहे. त्यानिमित्त डॉ. सातव यांच्याशी साधलेला संवाद.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - मेळघाटात जाऊन आदिवासी समाजासाठी काम करावे, याची प्रेरणा कशी मिळाली?
डॉ. आशिष सातव -
 माझे आजोबा वसंतराव बोंबटकर हे ज्येष्ठ सर्वोदयीवादी नेते होते. त्यांचे संस्कार आणि महात्मा गांधी व विनोबा भावे यांचा माझ्यावरील प्रभाव यातून प्रेरणा मिळाली. खेड्यापाड्यांत, आदिवासी भागात जाऊन तिथे सेवा केली पाहिजे, याबाबत आजोबा आग्रही असायचे. तरुणपणीच मी आदिवासी भागात काम करायचे ठरवले. नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे, अभय व राणी बंग यांच्या कामाची माहिती मिळाली. डॉ. आमटे यांचे काम जवळून पाहता आले, त्यामुळे आपणही त्यांच्यासारखेच झोकून देऊन काम करावे असे वाटले.

मेळघाटात जाण्याच्या निर्णयाबाबत तुमच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती? 
माझ्या आई-वडिलांना या निर्णयाचा आनंदच झाला. माझी पत्नी कविता हीदेखील डॉक्‍टरच आहे. लग्नाआधीच तिला मी सर्व गोष्टींची कल्पना दिली होती, तीदेखील आनंदाने या कामासाठी तयार झाली. किंबहुना नंतर तिनेच या कामात पुढाकार घेऊन, आदिवासींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनन्यसाधारण प्रयत्न केले. आम्ही नोंदणी विवाह केला आणि दोघांनीही आमच्या आई-वडिलांना सांगितले, की नोंदणी विवाहामुळे वाचलेले पैसे आम्हाला मेळघाटात वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी द्या. त्यांनीदेखील आनंदाने ते मान्य केले. 

आदिवासी समाजाचा विश्‍वास कसा संपादन केलात?
आम्ही मेळघाटातील धारणी येथे वैद्यकीय सेवा करण्यास सुरवात केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. कारण अंधश्रद्धेमुळे उपचार करून घेण्यास कोणी तयार नसायचे. आम्ही धीर सोडला नाही. एकदा मेंदूचा आजार असलेल्या व्यक्तीला आमच्याकडे आणण्यात आले होते. ही व्यक्ती जगेल याचीही खात्री नव्हती. ते आव्हान स्वीकारून आठ दिवस मी त्याच्यावर उपचार केले. त्याकाळात दिवस-रात्र मी त्या माणसाच्या शेजारीच असायचो. सुदैवाने या प्रयत्नांना यश आले व नवव्या दिवशी ती व्यक्ती स्वतःच्या पावलांनी घरी गेली. डॉ. कविताला अडलेल्या बाळंतिणीसाठी बोलावण्यात आले होते. त्या बाळंतिणीची अवस्था फारच वाईट होती. मात्र, कविताने दोघांना वाचवले. बाळंतिणीला दूध नव्हते. त्याचवेळी कविताला नुकताच मुलगा झाला होता. तिने त्यांच्या बाळालाही पुढे बरेच दिवस स्वतःचे दूध पाजले. अशा गोष्टींमुळे त्या लोकांचा विश्‍वास बसला.

गेल्या वीस वर्षांत तुम्ही किती आदिवासींवर उपचार केले आहेत?
आतापर्यंत मी ‘महान ट्रस्ट’तर्फे ओपीडी चालविली व गावोगावी जाऊन दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले. अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणले आहे. कविता तेथील एकमेव नेत्र शल्यचिकित्सक. डोळ्यांवर उपचार करायचे असतात, याबाबत आदिवासी समाजात मोठे अज्ञान व अंधश्रद्धा आहे. मात्र, कविताने त्यांचा विश्‍वास संपादून वीस हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर उपचार केले आहेत. कित्येक रुग्णांना अंधत्वापासून वाचवले आहे. तिने दोन हजारपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. 
 

आदिवासी समाजात मृत्यूचा दर अधिक आहे, तो रोखण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या?
आदिवासी समाजावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. तसेच, अज्ञानाचाही मोठा फटका त्यांना बसतो. कुपोषण, व्यसनाधीनता, आत्महत्या यामुळेही तेथील मृत्यूचे प्रमाण इतर ठिकाणापेक्षा जास्त आहे. हे रोखण्यासाठी आम्ही गावोगावी शिबिरे आयोजित करतो, त्यातून जागृतीचा प्रयत्न करतो. मेळघाटातील ३५ गावांमध्ये आम्ही बालमृत्यू व अतिकुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश मिळवले आहे. तसेच, तरुणांना व्यसनांपासून दूर करण्याच्या प्रयत्नांनाही यश मिळाले. अनेक गावे आम्ही व्यसनमुक्त करू शकलो, याचे समाधान आहे. अलीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला भेटीस बोलावले आणि या कामात काय अडचणी येतात, अशी विचारणा केली, त्यामुळे आमचा आत्मविश्‍वास आणखी उंचावला आहे. 

मेळघाटातील अनेक गावांपर्यंत तुमचे काम कसे पोचते? तेथील नागरिकांना तातडीचे उपचार कसे मिळतात?
एकाचवेळी आम्ही मेळघाटातील तीनशे गावांपर्यंत पोचू शकत नाही. यासाठी आम्ही प्रत्येक गावातील महिलांना ‘आरोग्यदूत’ म्हणून प्रशिक्षित केले आहे. दर दोन-तीन महिन्यांनी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. आरोग्यदूतांमार्फत आम्ही प्रत्येक गावाशी कनेक्‍ट झालो आहे. आरोग्याची सुविधा प्रत्येकाला मिळावी, हाच आमचा उद्देश आहे.  

‘पोषण आहार शेती’ ही संकल्पना काय आहे? तिचे कामकाज कसे चालते?
आदिवासी समाजात सर्वाधिक मृत्यू हे कुपोषणामुळे होतात. त्यांना जर पोषण आहार मिळाला, तर हे मृत्यू रोखण्यात यश मिळेल, यातून ही संकल्पना साकारली आहे. आम्ही तेथील १७ गावांमध्ये तेथील स्थानिक तरुणांनाच ‘युवादूत’ म्हणून नेमले, त्यांना प्रशिक्षणही दिले. गावांमध्ये सेंद्रिय शेती व पोषणमूल्ये असणारी पिके यांची लागवड करण्यासाठी ‘युवादूत’ प्रोत्साहन देतात. त्यातून दोन प्रकारचे फायदे झाले. एक तर आदिवासी समाजाला पोषण आहार मिळतो, शिवाय त्यांना शेतीतून रोजगारही मिळतो.