बालसाहित्यात बदललेलं भावविश्‍व हवं

माझा जन्म नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील दापूरचा. पण वडील नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना घेऊन मुंबईला आले.
Chand Dei Anand
Chand Dei Anandsakal
Updated on

- एकनाथ आव्हाड, saptrang@esakal.com

साहित्य अकादमीनं साहित्य पुरस्कारासाठी विविध साहित्यिकांची नुकतीच निवड केली. राज्यातून बालसाहित्यासाठी एकनाथ आव्हाड, तर युवा साहित्यिक म्हणून विशाखा विश्‍वनाथ हे मानकरी ठरले. पुरस्कारविजेत्यांचा साहित्य क्षेत्रातला प्रवास कसा झाला, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा, जडणघडण कशी झाली याविषयी या दोघांचं मनोगत...

माझा जन्म नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील दापूरचा. पण वडील नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना घेऊन मुंबईला आले. आई-वडिलांनी तेथे भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबई महापालिकेच्या शाळेत माझे पहिले ते सातवीचे शिक्षण झाले. तेथे मला वाचनाची गोडी लागली. आपण पुढे जाऊन लेखक व्हायचे, असं काही तेव्हा डोक्यात नव्हतं. पण खूप पुस्तकं त्या काळात वाचली. अगदी भाजी विकायला मी बसायचो, तेव्हादेखील माझ्या हातात पुस्तक असायचं. गिऱ्हाईक आलं नाही, तर तेवढ्या वेळात मी ते वाचायचो.

लहानपणी खाऊचे पैसे मिळायचे, त्यात विकत घेता येईल ते पुस्तक मी विकत घ्यायचो. दहावीपर्यंत अशाच पद्धतीने मी वाचत गेलो. ‘डी. एड.’ला शिकायला आलो, तेव्हा मी कथाकथनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. मला गोष्ट रंगवून सांगायला आवडायची आणि श्रोतेही ती रस घेऊन ऐकायचे, हे पाहून माझा हुरूप वाढला. त्यासाठी चांगल्या कथांचा शोध घेताना डॉ. विजया वाड, गिरिजा कीर, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथा सापडल्या. जयवंत दळवी यांच्या ‘चिमण’ या कथेनं माझा कथाकथनाचा प्रवास सुरू झाला.

मी शिक्षक व्हायचे ठरवले, तेव्हाही नोकरी करायची तर महापालिकेच्या शाळेत, हे माझ्या मनाने पक्के केले होते. डी. एड. झाल्यानंतर महापालिकेच्या शाळेत मला नोकरीही लागली. तिथून माझा बालसाहित्याचा प्रवास सुरू झाला. महापालिकेच्या शाळेत दररोज असंख्य नवीन मुलं भेटायची. रोज नवीन गोष्ट, नवीन कविता त्यांना सांगायचो. मग त्यांच्यासाठी आपणच का लिहू नये, या विचाराने मी लिहिता झालो. आपण लिहून पाहू, चांगलं आहे की नाही, ते मुलंच ठरवतील, असा विचार केला आणि लिहू लागलो.

माझ्या वर्गातली एक मुलगी शाळेत येत नव्हती. ती शाळेत यावी, यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. ती का येत नसावी, याचं कारण समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. ती मुलगी शाळेत येऊ लागल्यावर त्यामागची कारणं तिच्या आईने मला सांगितली. तिची कहाणी मी शब्दबद्ध केली आणि त्या वर्गातल्या मुलीवर मी पहिली कविता लिहिली. ‘सविता पटेकर सतत गैरहजर’, असं त्या कवितेचं नावं. ती मुलगी पण पुढे नियमित शाळेत येऊ लागली.

या एका कवितेतून मग अखंड प्रवास सुरू झाला. मुलांसाठी दररोज नवीन गोष्ट, नवीन कविता मी लिहू लागलो. मुलांसाठी म्हणून काही काव्यकोडी लिहिली, नाट्यछटाही लिहिल्या. चेंबूरला एक ‘स्वाधार’ नावाची संस्था आहे. ती संस्था मुलींसाठी शैक्षणिक प्रकल्प राबवायची. त्या प्रकल्पातील मुलींसाठी नाट्यछटा, नाटुकली, समूहगीतं असं बरंच लिखाण केलं. त्यातच मला सदरलेखनाची संधी मिळाली.

‘बोध कवितांचा’ अशा नावाचं ते सदर होतं. मुलांना मोठमोठ्या गोष्टींची पुस्तक वाचण्याचा अनेकदा कंटाळा येतो. म्हणून मग बोधप्रद अशी गोष्ट कवितेतून मांडायची, असा या सदराचा आकृतिबंध होता. ते सदर अतिशय लोकप्रिय झालं. पालक आणि शिक्षकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे जवळपास दीड-दोन वर्ष ते सदर चालू होतं. त्याच सगळ्या कवितांचं ‘बोधाई’ हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.

त्या वेळी या पुस्तकाच्या एका महिन्यात एक हजार प्रती संपल्या, याचे आज समाधान वाटते. हे पुस्तक आकाराला येण्यासाठी लता दाभोळकर, राजेश दाभोळकर आणि डॉ. विजया वाड यांची खूप मदत झाली. त्यावेळी विजया वाड विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय नव्हता, पण कविता हाच दोघांना जोडणारा समान धागा होता.

माझ्या कविता त्यांना अतिशय आवडल्या. या कविता लवकरात लवकर मुलांच्या हाती पडाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी आवर्जून या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली. या पुस्तकातून खऱ्या अर्थाने माझा साहित्यिक प्रवास सुरू झाला.

या दरम्यान पहिलीची मुलं जोडाक्षरं वाचताना अडखळतात, असं मला लक्षात आलं. या मुलांना गतिशील वाचनाचा आनंद मिळावा, म्हणून मी जोडाक्षरविरहित बालकवितांचा एक प्रयोग केला. या प्रयोगालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘गंमतगाणी’ असं त्या पुस्तकाचं नाव. राज्य सरकारचा पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. दुसऱ्याच पुस्तकाला महत्त्वाचा पुरस्कार लाभल्याने आपला मार्ग योग्य आहे आणि आपण लिहीत राहायला हवं, याची मनाला खात्री पटली.

मुलांसाठी लिहिताना आत्ताची मुले डोळ्यांसमोर ठेवून लिहिले पाहिजे, हे माझ्या सतत डोक्यात असायचे. कारण आपल्या लहानपणी बालसाहित्य म्हणून जे असायचं, ते आजच्या मुलांना आपलसं वाटणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे आजची मुलं ज्या भौगौलिक, सांस्कृतिक वातावरणात मोठी होत आहेत, त्याचा विचार करून मी लिहित गेलो. कोडी, कविता, गोष्टी, नाट्यछटा यांसोबतच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं चरित्र लिहिलं. ते पुस्तकही छान झालं. आजवर एकूण ३१ पुस्तकं झाली आहेत.

या काळात मी नेहमी माझे सुट्ट्यांचे दिवस, रविवार असा सगळा वेळ खास मुलांसाठी राखूनच ठेवतो. या वेळात मुलांसाठी कार्यक्रम असतील, त्यांच्यासाठीचे लिखाण असेल किंवा तत्सम काहीतरी, पण तो वेळ फक्त बालसाहित्यासाठीच द्यायचा, असा माझा नेम होता आणि आजही आहे. मुलं आणि त्यांचा आनंद, हीच माझ्या या सातत्यामागची प्रेरणा आहे.

मुलांची आनंदाची बाग आपल्या साहित्यामुळे फुलत असेल, तर आपण ते करत राहावं, हा माझा त्यामागचा विचार आहे. आजवर अनेक पुरस्कार मिळाले. पण त्यातही एक रुपयांच्या कॉईनबॉक्सच्या फोनमधून मुलांनी आनंद व्यक्त करण्यासाठी केलेला फोन, या पुरस्काराचं मोजमाप कशाचीच होऊ शकत नाही.

साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेकदा माझं नाव येत होतं. अंतिम सात व्यक्तींमध्ये नाव असायचं, पण पुरस्कार मिळायचं नाही. आपलं पुस्तक दिल्लीपर्यंत पोहोचतं आहे, याचा आनंद असायचा. परंतु, यंदा पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याने त्यात आनंदाचा भाग तर आहेच. त्यासह एक जबाबदारी वाढली आहे, याचीही मला जाणीव आहे. मुलांसाठी नव्या उत्साहाने नवं काहीतरी लिहिण्यासाठी मिळालेली ही प्रेरणा आहे, असं मी मानतो.

मुलांसाठी लिहिणं खरंतर सगळ्यात कठीण असतं. कारण सोपं लिहिणं, हे आव्हान असतं. पण हे आव्हान पेलण्यासाठी मी कायम मुलांच्या प्रतिसादाकडे पाहत गेलो. मी काहीही लिहिल्यावर ते मुलांपुढे सादर करतो. मुलं अतिशय निर्मळ असतात, ते अगदी प्रांजळ प्रतिसाद देतात. त्यांना आवडलं, तर आपण लिहिलेलं उत्तम आहे, असं समजावं. नाही आवडलं, तर तेही स्वीकारावं, असं धोरण मी अवलंबलं.

मराठीतील बालसाहित्यात आज दर्जेदार लिखाण करणारी अतिशय मोजकी माणसं आहेत. बालसाहित्य संख्यात्मक दृष्टीने मोठं आहे, पण गुणात्मकदृष्ट्या अजूनही मागे आहे. आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून, त्यांचं भावविश्व लक्षात घेऊन आणि नेमका वयोगट लक्षात ठेवून मुलांसाठी लिहिलं जावं. मराठी बालसाहित्यात मुलांच्या बदलत्या भावविश्वाचं प्रतिबिंब पडण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com