ग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथा (एकनाथ खिल्लारे)

book review
book review

अलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्‌मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा "पाणक्‍या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. "पाणक्‍या' या कथासंग्रहातील लोहगावकर यांनी वापरलेली ग्रामीण बोली भाषा, त्यांची शैली मनाला भावते, त्यातली कथा मनाला स्पर्श करून जाते, विचार करायला लावते. संग्रहातल्या सर्व कथा बालमनावर संस्कार करणाऱ्या आहेत.

"वाचाल तर वाचाल' या कथेत लहान मुलांवर वाचनसंस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे, असं ते सांगतात. त्यासाठी त्यांना आपण साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेतत. पुस्तकांची देवाणघेवाण करणं, विचारांचं आदान-प्रदान करणं, वाचनालयं, ग्रंथालयं, ग्रंथप्रदर्शनं, पुस्तक मेळावे इथं घेऊन जाणं, साहित्य संमेलनांना नेणं अशा गोष्टी करण्यामुळं त्या मुलांवर संस्कार घडतात, असं ते मांडतात. अवयवदान ही अगदी वेगळ्या प्रकारची; मनाला हादरा देणारी कथा. गावात असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक अगदी प्रेमळ आणि मितभाषी असल्यानं गावात त्यांचा एक आदर असतो. कोणताही कार्यक्रम असो- मग तो सामाजिक, धार्मिक किंवा अन्य कुठला- त्यात शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावलं जातंच. असे हे माने सर गाववाल्यांचे आदर्श. अशातच अगदी गरीब कुटुंबातला करिम नावाचा मुलगा आजारी पडतो, तो शाळेत येत नाही. त्याची माने सर विचारपूस करतात. करिमची किडनी निकामी झाली आहे, असं कळाल्यानंतर त्याचे आई-वडील हतबल होतात. इलाज करण्यासाठी त्यांच्याकडं पैसाही नसतो; परंतु माने सर त्या करिमला मदत करण्यासाठी पुढं येतात. फक्त मानवता हा धर्म त्यांच्यापुढं असतो, म्हणून ते त्या मुलाला आपली एक किडनी दान करतात आणि त्याला जीवनदान देतात. या कथेचा मनावर खोलवर परिणाम होतो. सर्वांनी सलोख्यानं वागलं पाहिजे, असं लेखकाला वाटतं.

लेखकानं ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण "नदीकाठचा शिवार' या कथेत केलं आहे. प्राणी, पक्षी, वनस्पती, वेली, नद्या, पर्वत हिरवंगार रान, झाडंझुडपं आमराई यांच्या वर्णनामुळं जणू काही आपण त्या शिवारातच आहोत, असं वाटायला लागतं. गडद निसर्गवर्णनामुळं ही कथा बालमनाला आनंद देऊन जाते. कथा म्हणण्यापेक्षा निसर्गवर्णनात्मक लेखन असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. "पाणक्‍या' ही लघुकथा मनाला चटका लावून जाते. सालगडी असलेला पाणक्‍या. त्याच्याच जीवावर इनामदाराची शेती असते. तो इनामदाराचा विश्‍वासू सालगडी असतो. पेरणी, नांगरणी, कोळपणी, वखरणी, अन्‌ घरी पाणी भरण्याचंही काम करतो, इतका तो विश्‍वासू असतो. परंतु, त्याच्यावर चोरीचा आरोप होतो, त्याला हाकलून दिलं जातं. इतर सालगडी त्याच्यावर आरोप लावतात. त्याच्या संसारावर कुऱ्हाड कोसळते. त्याची पत्नी सगुणा घर सांभाळण्याचा प्रयत्न करते. शेवटी एका शेतात औतावरच पाणक्‍याचा अंत होतो, अशी ही हृदयद्रावक कथा. "सुगीचे दिवस', "वृक्ष आपला मित्र' आदी वर्णनात्मक लेखनातून बालमनाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य दिसतं. "व्यर्थ न हो बलिदान' ही कथा मनाचा ठाव घेते. एकूणच वाचकांच्या भावनांना साद घालण्याचं काम या कथा करतात.

पुस्तकाचं नाव : पाणक्‍या
लेखक : अयूब पठाण लोहगावकर
पानं : 72, किंमत 70 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com