भावना यंत्राच्या ताब्यात!

मानव कृत्रिम बुद्धिमत्तेच्याही पुढे जाऊन काही उपकरणे तयार करेल ज्याचा वापर करून दुसऱ्याच्या मेंदूमध्ये आपले विचार पेरता येतील, असे तत्त्वज्ञानाचा अभ्यासक युवाल हरारी यांनी सांगून ठेवले होते.
elon musk neuralink brain chip what scientists think control human
elon musk neuralink brain chip what scientists think control humanSakal

- डॉ. नानासाहेब थोरात

मानव कृत्रिम बुद्धिमत्तेच्याही पुढे जाऊन काही उपकरणे तयार करेल ज्याचा वापर करून दुसऱ्याच्या मेंदूमध्ये आपले विचार पेरता येतील, असे तत्त्वज्ञानाचा अभ्यासक युवाल हरारी यांनी सांगून ठेवले होते. त्याच अनुषंगाने मानवी मेंदूत चिप बसवून त्यावर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे.

युवाल हरारी हा इस्रायली लेखक आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासक जगातील बहुतांश तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना माहीत असलेली व्यक्ती; पण सर्वसामान्यांना अपरिचित असे नाव. २०१४ मध्ये त्यांनी एकदा सांगितले होते, की २०५० नंतर माहिती आणि तंत्रज्ञानाचे जग बदलून माहिती आणि त्या माहितीवरील अधिकाराचे होईल.

म्हणजेच एखाद्याकडे असणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करून तो जगासमोर घेऊन येईल आणि त्यातून नवीन मालकी हक्क तयार होतील. हेच अनेक उद्योजकांनी हेरले आणि तेव्हापासूनच त्यावर काम करू लागले.

या जगात माहिती अमर्याद आहे; पण त्यावर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान मर्यदित नाही. ते काही लोकांच्याच मालकीचे आहे. मात्र एक गोष्ट अशी आहे जिच्यावर अजूनही पूर्णपणे अधिकार गाजवता आला नाही, ती म्हणजे मानवी मेंदू.

याच मानवी मेंदूकडे अमर्याद स्वरूपात असणाऱ्या माहितीची प्रक्रिया करून नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्याची अमर्याद ताकदही आहे; पण एका व्यक्तीला त्याचा मेंदू वापरून या माहितीचे रूपांतर तंत्रज्ञानात करता येत नाही, त्यासाठी हजारो लोकांचे मेंदू एकत्र यावे लागतात.

पण बहुधा हे मेंदू कुणा एकाची आज्ञा पाळायला तयार होत नाहीत आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून दुसऱ्याच्या मेंदूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून होत आहे. त्यात अश्मयुगीन टोळीचे म्होरके, रोमन राजे ते भारतात आलेले इंग्रज आणि आताचे आधुनिक राजकारणी किंवा उद्योगपती यांचा समावेश होतो.

हजारो वर्षांपासून हे होत असताना त्याच्याबरोबर ज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही विकसित किंवा बदलत गेले. मात्र एखादे उपकरण वापरून मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवण्यात आजपर्यंत तरी यश आले नव्हते.

आता मात्र ते शक्य होताना दिसून येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. जगातील मोठमोठ्या आणि भविष्याचे वेध घेऊन नवनवीन तंत्रज्ञान जगासमोर आणणाऱ्या उद्योगपतींमधील शीतयुद्ध किंवा मी इतरांच्या पेक्षा कसा अधिक नवनवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतो आणि त्यावर माझी मालकी सांगू शकतो, हा अहंभाव कारणीभूत आहे.

सर्वसामान्य लोकांना किंवा भारतीय उद्योजकांना युवाल हरारी कोण हे माहीत नसेलही, त्यांची पुस्तके कधी हातातही घेतली नसतील. मात्र युरोप-अमेरिकेतील उद्योगजगताला ते चांगलेच परिचित आहेत. एवढेच नाही; तर बराक ओबामा, बिल गेट्स आणि एलॉन मस्कपासून अनेक राजकारणी आणि उद्योजक त्यांचे चाहते आहेत.

वारंवार इथे युवाल हरारींचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ते त्यांच्या पुस्तकात भविष्याचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानावर लिहीत असतात. त्यातून प्रेरणा घेऊन हे उद्योजक नवनवीन क्षेत्रात गुंतवणूक करतात.

त्यांनीच काही वर्षांपूर्वी हे लिहिले होते की मानव कृत्रिम बुद्धिमत्तेच्याही पुढे जाऊन अशी काही उपकरणे तयार करेल, ज्याचा वापर करून दुसऱ्याच्या मेंदूमध्ये आपले विचार पेरता येतील आणि त्याच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम करवून घेता येईल.

हाच भविष्याचा वेध घेऊन अमेरिकन उद्योगजगतात सुप्त स्पर्धा सुरू झाली. मानवी मेंदूमध्ये छोटीशी चीप बसवून त्यातून मानवी विचार, मानवी हालचाल, त्यावर असणारे मेंदूचे नियंत्रण याची माहिती मिळवता येते का, यावर काम सुरू झाले.

सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या स्टार्ट-अप कंपन्यांनी प्रयत्न केले. त्यामध्ये सुरुवातीला २०२३ मध्ये स्वित्झर्लंडमधील विद्यापीठातील शास्त्रज्ञांना एक उपकरण तयार करण्यात यश आले. हे यंत्र अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला फक्त विचार करून चालण्यास सक्षम करत होते आणि ते उपकरण त्यांनी काही रुग्णांवर यशस्वीपणे वापरले; पण ते मानवी मेंदूत स्थापित करायचे नव्हते,

तर बाहेरूनच मेंदूमधील विद्युतीय क्रियांना पुनर्स्थापित करत होते. त्यामध्ये खरी स्पर्धा सुरू झाली, जेव्हा जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी जाहीर केले की आमची कंपनी ‘न्यूरालिंक’ अशी चीप तयार करील जी मानवी मेंदूमध्ये बसवल्यानंतर गंभीर अर्धांगवायू असलेल्या व्यक्तीला संगणक,

रोबोटिक आर्म, व्हीलचेअर किंवा इतर उपकरणांवर केवळ विचार करून नियंत्रण मिळवण्यास मदत करील. सुरुवातीला हा प्रयोग खूप उत्साहित करणारा होता; पण हळूहळू त्याच्यामागचा वेगळा हेतू जगासमोर येत गेला. हे वरकरणी रुग्णांना नवसंजीवनी देणारे उपकरण वाटत असले, तरी भविष्यातील त्याचे मोठे धोके शास्त्रज्ञांना आणि विचारवंतांना दिसून आले. त्यामध्ये युवाल हरारीही होते.

‘हे संशोधन खरे तर गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंददायक, डॉक्टरांसाठी नावीन्यपूर्ण आणि सर्वसामान्यांना रोमांचक वाटणारे आहे. कारण मानव म्हणून आपण जे काही अनुभवतो... मग ते पाहणे, ऐकणे, भावना किंवा विचार असो...

हा सर्व मानवी मेंदूतील विद्युतीय क्रियांचा परिणाम असतो. ज्या वेळी या नैसर्गिक विद्युतीय क्रियांमध्ये बिघाड होतो तेव्हा अर्धांगवायू, बहिरेपणा, आंधळेपणा, अल्झायमर, स्मृतिभ्रंश, फेफरे येणे यासह अनेक आजार होतात. बऱ्याचदा हे मेंदूतील विद्युतीय क्रियांमधील बिघाड नैसर्गिकरीत्या किंवा औषधे वापरून दुरुस्त होत नाहीत आणि हे रुग्ण आयुष्यभर असेच राहतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो

. ‘न्यूरोलिंक’चे तंत्रज्ञान मेंदूमधील याच बिघडलेल्या विद्युतीय क्रियांना सक्षम करणारे आहे आणि त्यासाठी ते उपकरण मेंदूमध्ये अनैसर्गिक पद्धतीने वीज निर्माण करणार आणि त्यातून बिघडलेल्या भागाची दुरुस्ती करणार. तत्त्वतः जर सर्व काही व्यवस्थित असेल तर मेंदूशी संवाद साधण्याचे आणि त्यात वीज घालण्याचे कोणतेही कारण नसते आणि ते अनावश्यक आणि धोकादायक आहे;

परंतु जर एखादी समस्या असेल, उदाहरणार्थ अंधत्वाच्या बाबतीत किंवा कनेक्शन असल्यास वीज आणि हाताच्या क्षेत्रामध्ये काही कारणास्तव नुकसान झाले असेल आणि तुमच्याकडे कृत्रिम अवयव आहे, तर ही एक अतिशय महत्त्वाची क्षमता आहे. यामुळेच ‘न्यूरालिंक’ने या दिशेने आपली वाटचाल सुरू केली.

‘न्यूरालिंक’चा क्रांतिकारी दृष्टिकोन दोन पातळ्यांवर अस्तित्वात आहे. पहिला म्हणजे, आजपर्यंत मेंदूच्या या जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर किंवा सर्जन यांना बराच वेळ लागायचा. ‘न्यूरालिंक’ने एक नावीन्यपूर्ण रोबोटिक तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे या शस्त्रक्रिया स्वतः करू शकते.

यामध्ये कृत्रिमरीत्या आपोआप काही प्रमाणात मेंदूच्या एका विशिष्ट भागात वीज योग्यरीत्या पाठवली जाते; पण त्यासाठी त्या रुग्णाच्या मेंदूमधील न्यूरल कोड म्हणजेच मेंदूच्या आतील क्रियांचा आराखडा माहीत असणे आवश्यक आहे.

जेणेकरून जेव्हा वीज जाईल तेव्हा ती योग्य ठिकाणी जाईल आणि फक्त अर्धांगवायू झालेल्या रुग्णाच्या एका बाजूच्या जखमी हाताला किंवा पायाला हलवेल, दुसऱ्या बाजूच्या नाही. हे खूप क्लिष्ट आहे आणि इथेच पुढचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, ज्याद्वारे तुम्ही हात उजवीकडे, विरुद्ध हात डावीकडे हलविण्यासाठी न्यूरॉन्सच्या समूहामध्ये विशिष्ट विद्युत पॅटर्न काय आहे हे जाणून घेऊ शकता.

फक्त जाणूनच नाही तर मेंदूमधील या सर्व माहितीवर नियंत्रणही मिळवू शकता आणि त्यासाठी दुसऱ्या उपकरणाची गरज लागणार नाही. तीच मेंदूत बसवलेली चीप सर्व माहिती गोळा करून संग्रहित करेल किंवा ब्लू टूथ, वायफायद्वारे बाह्यजगातील उपकरणात साठवली जाईल. मग ते लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल.

इथेच खरा धोका दिसून येतो. या माहितीचा गैरवापर झाला तर? किंवा कदाचित भविष्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये बसवलेल्या चीपवर ब्ल्यू-टुथ किंवा वायफायवरून दुसरेच कोणीतरी नियंत्रण मिळवेल आणि तोच त्या रुग्णाला इतर गोष्टी करण्यासाठी आज्ञा देईल.

जेव्हा डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ लोकांच्या मेंदूत डोकावून पाहतात तेव्हा त्यांना समजते की त्यांची विद्युत क्रिया इतरांपेक्षा वेगळी असते. मेंदूमध्ये एक विशिष्ट क्षेत्र असते जे उदासीन लोकांमध्ये उजव्या बाजू आणि डाव्या बाजूला असंतुलित असते.

एका बाजूला खूप; तर दुसऱ्या बाजूला कमी क्रियाकलाप असतो. समजा अशा लोकांच्या मेंदूत ही चीप बसवली तर ते लोक उत्तेजित होऊ शकतात आणि त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडले जाऊ शकते. सैद्धांतिकदृष्ट्या या तंत्रज्ञानात आपल्या मनःस्थितीवरदेखील परिणाम करण्याची येथे प्रचंड क्षमता आहे.

लोक क्षणात दुःखी बनवता येतील आणि पुढच्या एका तासात त्यांना आपण आनंदी स्थितीकडे घेऊन जाऊ शकतो. हे विज्ञान कल्पनेसारखे वाटते. हे तंत्रज्ञान पूर्णपणे नवीन काहीतरी तयार करेल. हेच खरे तर भीतीदायक असू शकते.

भविष्यात लाखो निराशावादी लोक या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या स्वतःच्या भावनांवर यंत्राद्वारे नियंत्रण ठेवतील. त्यांना हे खूप आनंदी वाटेल. त्यांचा अनुभव ते निरोगी लोकांना सांगतील. निरोगी लोक याचा प्रयोग स्वतःवर करतील, नंतर त्याच्या आहारी जातील आणि सरतेशेवटी आपल्या भावना, विचार यंत्राच्या ताब्यात देतील.

(लेखक लंडनमध्ये विज्ञान संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com