पर्यावरणाच्या प्राचं रण अन् ‘व्याकरण’

पर्यावरणानुकूल विकास'' किंवा ‘पर्यावरण रक्षणासह विकास’ अशा संकल्पना सभा-संमेलनं आणि परिषदांमधून अलीकडं वारंवार ऐकायला मिळतात.
book
booksakal

निरंजन आगाशे

‘पर्यावरणानुकूल विकास'' किंवा ‘पर्यावरण रक्षणासह विकास’ अशा संकल्पना सभा-संमेलनं आणि परिषदांमधून अलीकडं वारंवार ऐकायला मिळतात. त्या आकर्षक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात विकास आणि पर्यावरण या दोन्हींतील अंतर्विरोधाचा दाह सध्या दिवसेंदिवस तीव्र होताना जाणवतो आहे.

कोट्यवधी जनतेच्या जीवनमानाच्या धुमारलेल्या आकांक्षा हा राजकारणातील एक मध्यवर्ती मुद्दा बनलेला असताना पर्यावरणीय ऱ्हासाची धोक्‍याची घंटा वाजवत राहणे हे सोपे नाही. हे काम गेली अनेक वर्षे करीत असलेल्या संतोष शिंत्रे यांची ‘जागल्या’ची भूमिका या पुस्तकातही अधोरेखित होते.

या विषयाची तळमळ, अभ्यास आणि वास्तववादी दृष्टिकोन ही वैशिष्ट्ये पुस्तक वाचताना जाणवतात. यातील बहुतेक लेख ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.त्या लेखनाला तात्कालिक संदर्भ असले तरी त्यातील विवेचन तात्कालिकतेच्या पलीकडे जाणारे आहे. ऊर्जासघन आणि धातूसघन विकासाच्या प्रतिमानाचा पर्याय काय असू शकेल, याविषयी काही मांडणी भविष्यात त्यांच्याकडून केली जाईल, अशी अपेक्षा निर्माण करणारे हे पुस्तक आहे.

शिंत्रे पर्यावरणाचे वेगवेगळे विषय हाताळताना नियम, कायदे, सरकारची घोषित उद्दिष्टे याचाच उल्लेख करून त्या त्या बाबतीत सरकारपुढे आरसा धरतात. सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीचा अर्थ समजावून देतात. संकल्प आणि त्याचा अंमल यातील खोल दरीकडे वाचकांचे लक्ष वेधतात. ही मांडणी केवळ अंमलबजावणीतील ढिसाळपणाचेच परीक्षण नाही. लेखक विकासाच्या सध्याच्या प्रतिमानावरच आक्षेप नोंदवतात.

गोंगाटाच्या उपद्रवापासून वन्यजिवांच्या रक्षणापर्यंत कितीतरी प्रश्नांची ओळख या निमित्ताने वाचकाला होते. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या सांभाळासाठी सरकार आणि समाजाला सूचना करताना कोणतेही विधान पुरेशा आधाराशिवाय ते करीत नाहीत. हे आधार शास्त्रीय माहितीचे, अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या आकडेवारीचे किंवा प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे असतात.

इलेक्‍ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांसाठी लागणारे लिथियम, स्कॅंडियम हे धातू मिळवण्यासाठी सागरी तळाचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होणार, या धोक्‍याकडे केवळ निर्देश करून ते थांबत नाहीत. या समस्येचे अक्राळविक्राळ स्वरूप दाखविणाऱ्या नेमक्या संख्या उद्‌धृत करतात.

लेखाला शीर्षक देतात, ‘सागराचा (च) प्राण तळमळला''.अशी अर्थवाही आणि गोळीबंद शीर्षके या पुस्तकातील अनेक लेखांना लाभली आहेत. ‘गोंगाटी निज शांततेस जपणे...'', ‘पाम, दाम, दंड, भेद!’, ‘निथळणारे बाजार, पसरणारे बाजार'', ‘जिथे सागरा प्लास्टिक मिळते’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ लेखक केवळ आकडे उद्‌धृत करतात असे नाही, तर या संख्यांकडे नेमके कसे पाहायचे, याचेही दिग्दर्शन करतात. ‘भारतात निसर्ग पर्यावरण पोरकेच!’,‘प्रवाहो जनांचा, लंबक धोरणांचा'' ही काही प्रकरणे या दृष्टीने महत्त्वाची. पर्यावरणाबद्दल सजग आणि संवेदनशील असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक या विषयाचा आवाका किती आहे, याची नेमकी कल्पना तर देईलच; पण कृतिप्रवणही करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com