शोध सांस्कृतिक श्रमाच्या शोषणाचा

गेल्या वर्षी ‘कलरीपय्यट्टु’ नावाची केरळी युद्धकला शिकण्याची संधी मला मिळाली. ही कला मुळात तिथल्या कडथनाड भागातली.
book the edge of time
book the edge of timesakal
Updated on

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com

गेल्या वर्षी ‘कलरीपय्यट्टु’ नावाची केरळी युद्धकला शिकण्याची संधी मला मिळाली. ही कला मुळात तिथल्या कडथनाड भागातली. त्यामुळं या निमित्तानं माझ्या मूळ स्वभावानुसार मलबार प्रांताच्या उत्तर विभागात भटकंती करण्याची संधी मी काही सोडली नाही. या भटकंतीत मला अनेकदा आश्चर्याचे धक्के बसले. मला असं आढळलं, की परस्परांना अगदी लागून असलेल्या दक्षिण आणि उत्तर मलबार प्रदेशातील सांस्कृतिक चालीरीतींमध्ये मात्र खूपच तफावत होती.

तत्त्वज्ञ असूनही जमिनीवर पाय असणाऱ्या माझ्या पुण्यातल्या मित्राशी याबद्दल चर्चा करत असताना त्यानं या प्रदेशाबद्दल अधिक वाचायला तर मला सांगितलंच पण त्यालाच लागून असलेल्या कर्नाटकाच्या किनारपट्टीवर जाऊन तिथली जीवनपद्धती मी समजून घ्यावी असंही त्यानं सुचवलं. तो म्हणाला, की केरळचा उत्तर मलबार प्रदेश आणि कर्नाटकाची दक्षिण किनारपट्टी यांच्यात अधिक सांस्कृतिक साम्य आहे. तेथील लोकांच्या चालीरीती जवळपास सारख्याच आहेत. विशेषत: तेथील पंबाडा नावाच्या दलित समुदायातील लोकांच्या ‘भूत आराधना’ या धार्मिक विधीचं सखोल निरीक्षण करण्याची सूचना त्यानं मला केली.

अभ्यास दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून एका लेखकाचं नाव त्यानं मला सुचवलं. साहित्यिक म्हणून हे नाव मला अगदीच अपरिचित होतं पण राजकारणी म्हणून मात्र देशभर विख्यात होतं. धक्काच बसला मला ते नाव ऐकून. डॉ. वीरप्पा मोईली ! चकित होऊन मी मित्राने सुचवलेल्या ‘थेंबरे’ नावाच्या त्यांच्या कन्नड पुस्तकाचा शोध घेऊ लागलो. त्याच्या इंग्रजी आवृत्तीचं शीर्षक होतं, ‘द एज ऑफ टाइम’

या पुस्तकात एका विशिष्ट धार्मिक-सांस्कृतिक पूजाविधीचं अत्यंत तपशीलवार वर्णन करत वीरप्पा मोईली आपल्याला ‘भूत आराधना’ नावाच्या अद्‍भुत जगात घेऊन जातात. ही कादंबरी म्हणजे दोन भिन्न मार्ग निवडणाऱ्या दोन भावांची कहाणी आहे. एक भाऊ शिक्षणाचा मार्ग निवडतो. नैसर्गिक आणि व्यावहारिक असे हेतूनिष्ठ ध्येय स्वतःसमोर ठेवतो. उच्चतर जाणीव प्राप्त करू पाहतो. तर दुसरा भाऊ कुटुंबाची वंशपरंपरागत वहिवाट स्वीकारतो. गावातील लोकांसाठी ‘भूत आराधना’ पार पाडू लागतो. जातीवर आधारलेले, परंपरेने चालत आलेले हे सांस्कृतिक श्रमशोषण तो स्वीकारतो.

दरबारी उदारमतवादी आधुनिकता आणि सनातन धार्मिकता यांच्यामधील प्रखर द्वंद्वात्मक नाट्य ही कादंबरी आपल्यासमोर ठेवते. केवळ दोन परस्परविरोधी विचारप्रणालींचे सरळसोट कथन तिच्यात नाही. तर त्या विचारांच्या तळाशी असलेल्या अधिकथनांच्या आश्चर्यकारक स्वरूपाचे दर्शन ही कादंबरी घडवते. त्यातून अत्यंत गुंतागुंतीच्या वास्तवाचं चित्रण ती करते.

या कादंबरीतील मला सर्वांत भावलेला भाग म्हणजे त्यांच्या बहिणीनं अंगीकारलेली वाट. धड शिक्षणसुद्धा पूर्ण होण्यापूर्वीच लहान वयात तिचं लग्न लावून दिलं जातं. स्त्रीच्या लैंगिकतेला ताब्यात ठेवू पाहणाऱ्या पुरुषप्रधान समाजरचनेच्या चरकात तिला ढकललं जातं. साहजिकच नवऱ्याकडून होणारी पुरुषी दडपशाही तिच्याही वाट्याला येते.

परंतु तिच्या या कहाणीतून उदारमतवाद्यांच्या दुभंगलेल्या आधुनिकतेचीही प्रचिती येते. तिच्या सुशिक्षित भावाच्या रूपानं अशा दुटप्पीपणाचं दर्शन आपल्याला होतं. योग्य विचारसरणी बाळगणारी पण कृतीची वेळ आली की भोवतालचा समुदाय आणि एकंदर समाज यांना घाबरून वस्तुनिष्ठ अस्तित्ववादी भूमिका घेण्यात अळंटळं करणारी एक जमात आपल्याला भारतभर दिसते. हा भाऊ त्या जमातीचे प्रतिनिधित्व करतो.

स्वतःला लाभलेल्या सुरक्षिततेच्या नशेत ही जमात चूर असते. त्यांच्या भूमिका स्वतःच्या “त्या त्या वेळच्या” हितानुकूल सतत बदलत असतात. या कादंबरीत या भूमिका विषमतेनं ग्रस्त असूनही रोमँटिक बनवलेल्या आणि जात जाणिवेने थबथबलेल्या ग्रामीण सामाजिकतेला कवटाळत असलेल्या दिसतात. त्यामुळंच अल्पवयीन बहिणीच्या लग्नास कारणीभूत ठरणाऱ्या पारंपरिक पुरुषप्रधान समुदायवादी शक्तींचा कोणताच प्रतिकार सरकारी अधिकारी असलेला तिचा भाऊ करू शकत नाही.

सनातनी परंपरेसमोर तो हतबल झालेला दाखवला आहे. नंतर ही बहीण लग्नाचे बंधन झुगारून देते आणि मुक्त होऊन पुरुषप्रधान व्यवस्थेच्या कोणत्याही आधाराशिवाय स्वत:चे स्वातंत्र्य स्वतः मिळवते. ती स्वबळावर शिकते आणि वकील बनून पुरुषप्रधान रूढींविरुद्ध कायदेशीर लढा देते. या तिच्या आत्म विकासासाठी, सबलीकरणासाठी “पुरुषासारखे पुरुष” असलेल्या तिच्या भावांचा आधार तिच्या मुळीच कामी येत नाही. तिचे शिक्षणच तिच्यासाठी वाट तयार करून देते.

अपहाराच्या बळावर पुष्ट होणाऱ्या सनातनी सांस्कृतिक चालीरीती, तसेच स्त्रिया आणि दलित यांच्या सांस्कृतिक श्रमातून अतिरिक्त नफा शोषणाऱ्या जाचक, जुलमी चालीरीती यांच्या सत्य स्वरूपाचे मर्मभेदी चित्रण ही कादंबरी करते. वरवर पाहता ज्या गोष्टी दैवी, अतीव सुखदायी किंवा ईश्वरी करणी असल्यासारख्या भासतात, त्या साऱ्या म्हणजे खरोखर माणुसकीच्या इथॉस, पॅथास आणि लोगोस यांची निव्वळ थट्टा आहे. यावरून लुईसा मुरारो सारखे स्त्रीवादी म्हणतात, त्याची आठवण होते.

त्यांच्या मते गोष्टींच्या मुळालाच प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांचे उगमस्थानच तपासून पाहिले पाहिजे. शेवटी ही व्यवस्था या साऱ्या सनातनत्वाचे आणि पुरुषप्रधान चालीरीतींचे ओझे स्त्रिया आणि खालच्या दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या जातींच्याच खांद्यावर टाकते. म्हणून ही कादंबरी वाचत असतानाच आपण ‘पवित्र’ किंवा ‘शुद्ध’ किंवा ‘प्रदूषित’ अशा शिक्क्यांच्याच पावित्र्यावर प्रश्न उपस्थित करू लागतो.

हे विचार आपल्या मनात घुसळत असतानाच आपण या प्रदेशाची समाजशास्त्रीय घडणही तपशीलवार न्याहाळू लागतो. अशा परंपरा कशामुळे जोपासल्या गेल्या याची कारणे शोधू लागतो. या चालीरीतींमागील राजकीय अर्थव्यवस्थेचा फायदा नेमका कोणत्या घटकाला मिळतो याचा विचार करू लागतो. पोर्तुगिजांचे आगमन आणि ख्रिश्चनिटीच्या प्रसारामुळे हे घडलं? की खरोखर याच्या उलट झाले?

मोईली यांची ही संहिता वाचताना मी वारंवार थबकत राहिलो. पुरुषप्रधान दंडकांची दमदाटी सोसावी लागलेल्या असंख्य अदृश्य गार्गींच्या बलिदानाचे विचार माझ्या मनात रेंगाळत राहिले. कालिदासाच्या नाटकातील स्त्रीपात्रे संस्कृत मुळीच बोलत नाहीत यामागचे कारण मी शोधू लागलो. मुक्ताबाई, सोयराबाई, अक्कमहादेवी, कान्होपात्रा, आंडाल, आम्मैयार या क्रांतिकारक स्त्रियांची महत्ता मी मनोमन उगाळत राहिलो.

त्यांनीच महात्मा फुले आणि त्यांच्या साथीदार सावित्रीबाई तसेच फातिमा शेख यांना आत्मिक बळ दिले. डॉ आंबेडकर यांनी मांडलेला या संदर्भातील सिद्धांत मी आठवू लागलो. पुस्तक तर संपलं पण त्यानं मला पुरतं बदलून टाकलं होतं. त्यामुळं भोवतालचं सगळं जग कांतारा या कन्नड चित्रपटाबद्दल भरभरून बोलत होतं, त्यात मला रस वाटेना. सांस्कृतिक चालीरीती म्हणजे आपल्या परंपरांचं मूर्त रूप आहेत याच एका दृष्टीने मला त्यांच्याकडं पाहता येईनासं झालं. आपण त्यांना नेहमीच मान दिला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे असं मला वाटत नाही.

मोईलींनी मला या चालीरीतींबद्दल शंका उपस्थित करायला, प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं. जे समोर दिसतं त्याच्या पलीकडं पाहत, पावित्र्य आणि विधी यांच्या नावे पुरुषप्रधानतेचा झेंडा उंचावणाऱ्या अदृश्य शक्तींचा शोध घ्यायला उद्युक्त केले. पुस्तक वाचून झाल्यावर मी माझ्या तत्त्वज्ञ मित्राला पुन्हा भेटलो. आणि मला जे जे आतून वाटलं ते त्याला सांगितलं. माझ्या प्रयत्नांचं कौतुक करून त्याने मला या रूढींबद्दल अधिक माहिती दिली.

वास्तवातली आणखी अनेक उदाहरणे देऊन सांस्कृतिक श्रमाचं शोषण मला समजावून दिले. याचवेळी त्याने मला दुसऱ्या एका प्रतिभाशाली लेखकाच्या दुसऱ्या एका उत्कृष्ट पुस्तकाची ओळख करून दिली. या वेळी हा महान लेखक मला पश्चिम घाट क्षेत्रात आणखी आत आत घेऊन गेला. त्यानं मला मालनाडचा परिसर दाखवला. त्याबद्दल सगळं मी तुम्हाला यानंतरच्या लेखात सांगेन.

(अनुवाद: अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

(लेखक हे आयआयटी दिल्ली इथं मानद व्याख्याते असून सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.