संसदेतील (अ)भारतीयत्व

ब्रिटनमध्ये लंडनच्या अनेक भागांत खासदारांना निवडून यायचे असेल तर हिंदू मंदिरांच्या फेऱ्या करायला लागतात, ही वस्तुस्थिती आहे.
fact that in Britain London if MP wants to be elected they start visiting Hindu temples
fact that in Britain London if MP wants to be elected they start visiting Hindu templesSakal

- वैभव वाळुंज

ब्रिटनमध्ये लंडनच्या अनेक भागांत खासदारांना निवडून यायचे असेल तर हिंदू मंदिरांच्या फेऱ्या करायला लागतात, ही वस्तुस्थिती आहे. ब्रिटनच्या इतिहासात प्रसिद्ध झालेल्या अनेक नेत्यांमध्ये भारतीय वंशाच्या खासदारांचा समावेश होतो आहे. याचा अभिमान बाळगावा की फक्त काळाचा महिमा आहे, हा मोठाच प्रश्न आहे.

इंग्लंडच्या संसदेत तसेच इतरत्र भारतीयांनी या संस्थेवर टाकलेला मोठा प्रभाव जाणवतो. याची अनुभूती त्यांच्या वास्तुशास्त्रातूनही झळकताना दिसते. एकेकाळी जगाची राजधानी बनलेल्या या लंडनमधील इमारतीची अनेक ठिकाणी वाताहतही झाली आहे.

अनेक वेळा डागडुजी करून आणि दुरुस्त्या करूनही संसदेवरील वाढता खर्च गगनाला भिडला आहे. म्हणून वर्षातील कोणत्याही वेळी संसदेत गेले तरी कुठे ना कुठे दुरुस्तीचे काम सुरूच असते व अनेक ठिकाणी पडझड रोखण्यासाठी केलेले उपाय पुरेसे न ठरल्याचेही दिसते; पण एका बाबतीत या संसदेने आघाडी घेतली आहे ती म्हणजे विविध वंशांच्या, रंगांच्या आणि गटांच्या लोकांचे असलेले प्रतिनिधित्व.

याचा नेमका किती फायदा त्या वंशाच्या लोकांना होतो, हा वादाचा विषय असला तरी वरदेखल्या प्रतिनिधित्वाचा तोरा मात्र इंग्लंडची संसद मिरवू शकते. सध्याच्या संसदेत भारतीय वंशाचे १५ खासदार आहेत. विविध पक्षांसोबत असलेल्या या खासदारांकडे वेगवेगळ्या प्रकारची कामे येतात आणि आपल्या वेगवेगळ्या विचारधारेसाठी तसेच काम करण्याच्या पद्धतीसाठी ते प्रसिद्धही झाले आहेत.

संसदेत खासदारांसाठी असलेल्या बैठक खोल्यांकडे जाताना भारतीय वंशाचे अनेक खासदार तसेच त्यांचे मदतनीस आपल्या नजरेस पडतात. संसदेच्या आवारात काही भारतीय भाषा तुमच्या कानावर पडतील याचीही दाट शक्यता असते.

याची पायाभरणी अर्थातच मजूर पक्षाने केलेली असली तरी सुरुवातीच्या काळात यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत व्यापारी वर्गाचा भरणा होता. १९४०च्या दशकानंतर इंग्लंडमध्ये युद्धाच्या व त्यानंतरच्या काळात काम करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली, ज्याचा पुरवठा करण्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात मजुरांना इंग्लंडमध्ये नेले गेले.

मँचेस्टरच्या कापड गिरण्यांमध्ये तसेच वीटभट्ट्यांमध्ये पंजाबी मजूर मोठ्या प्रमाणात कामाला लागले. यातील अनेक नागरिकांनी तेथे आपापल्या कामगार चळवळी उभारल्या. यातून भारतीयांमध्ये मजूर पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि अनेक भारतीय स्थानिक मजुरांचेही प्रतिनिधित्व करू लागले. यातूनच भारतीयांच्या संसदेतील सक्रिय राजकीय सहभागाला सुरुवात झाली.

दुसऱ्या बाजूला हळूहळू हुजूर पक्षानेदेखील इंग्लंडमध्ये आलेल्या श्रीमंत भारतीयांना हाताशी धरायला सुरुवात केली. इंग्लंडमधील अनेक मतदार सुरुवातीच्या काळात विविध योजनांसाठी आपल्या आवडत्या नेत्याला निवडत; मात्र तिथे गेलेले भारतीय वंशांचे मतदार हे साधारणतः आपल्या समुदायाच्या कलानुसार एकगठ्ठा मते देत.

म्हणून ब्रिटिश खासदारांना भारतीय मतांचे मोल मोठ्या प्रमाणात समजून आले. यातूनच १९८७ नंतर भारतीयांचा संसदेत होणारा शिरकाव वाढत गेला. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर नगर परिषद आणि कौन्सिल निवडणुका लढायला सुरुवात केली.

या पदांवर तुलनेने कामाचा बोजा फार जास्त असतो व यातून मानधनही कमी मिळते; मात्र भारताच्या तुलनेत हा पैसा प्रचंड असल्याने अनेक नागरिकांनी आपले नेतृत्व गुण दाखवत स्थानिकांचे प्रतिनिधित्व केले. लंडनच्या कामगारांनी भरलेल्या उपनगरांमध्ये भारतीय तरुणांनी नगरसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली.

म्हणूनच आजच्या घडीला हुजूर पक्षांमध्ये तब्बल सत्तरहून अधिक नगरसेवक भारतीय वंशाचे आहेत. २०१० मध्ये पहिल्यांदा हुजूर पक्षातर्फे ही भारतीय वंशाचे तीन खासदार एकाच वेळी संसदेत गेले.

हुजूर पक्षाने नंतरच्या काळात भारतीय नेत्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी वाव दिला याचे कारण म्हणजे अनेक रूढीपरंपरागत आणि अन्यायकारक कायदे लागू करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याक समुदायापासून मदतीची गरज होती.

त्यामुळे अनेक अन्यायकारक कायदे व लोकप्रिय नसणारे कठोर नियम राबवण्यासाठी भारतीय वंशाच्या खासदारांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. सुरुवातीच्या काळात ज्यू समुदायाने यासाठी मोलाची मदत पुरवली. पण उत्तरार्धात ही मदत कमी पडू लागल्यानंतर यात हिंदू नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

आजच्या घडीला हुजूर पक्षाला पुरवल्या जाणारा पैशांपैकी बहुतांश मानधन हे इस्रायल आणि रशियापाठोपाठ भारतातून दिले जाते. भारतीय जनता पक्षाचे इंग्लंडमध्ये सत्तेत असणाऱ्या हुजूर पक्षाशी जवळचे संबंध आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उजव्या गटाचे पक्ष एकत्र येऊन एकमेकांना मदत करत आहेत.

ब्रिटिश संसदेत लॉबिंग अर्थात राजवकालत करण्याची परंपरा जुनी असून, त्याला तिथे कायदेशीर मान्यताही आहे. त्याच्याशी जोडलेला नकारात्मक अर्थ इतर देशांप्रमाणे इंग्लंडमध्ये घेतला जात नाही.

यातही भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली आहे. आपल्या विविध व्यवसायांची जपणूक करण्यासाठी तसेच सरकारकडून अधिकाधिक सवलती मिळवण्यासाठी भारतीय उद्योजकांनी यात वाढता सहभाग घेतला आहे.

सामान्य लोकांनीदेखील आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विविध खासदारांनी संस्थांच्या माध्यमातून वाढता संपर्क ठेवला आहे. हिंदू नागरिकांच्या हिताची रक्षा करण्याकरिता संसदेमध्ये संसदीय हिंदू गटाची स्थापना झाली असून, दुसरीकडे इंग्लंडमध्ये गेलेल्या दलित नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणाकरता सर्वपक्षीय दलित संसदीय गटाचीही मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये लंडनच्या अनेक भागात खासदारांना निवडून यायचे असेल तर हिंदू मंदिरांच्या फेऱ्या करायला लागतात, ही वस्तुस्थिती आहे. हुजूर पक्षाने या सर्व घडामोडींना अतिशय किळसवाणे आणि टोकन म्हणून भारतीय वंशाचा वापर करून घेण्याचे स्वरूपही दिले आहे.

ब्रिटनच्या इतिहासात प्रसिद्ध झालेल्या आणि अनेक अर्थांनी कुप्रसिद्ध झालेल्या नेत्यांमध्ये भारतीय वंशाच्या खासदारांचा समावेश होतो आहे. याचा अभिमान बाळगावा की वाईट वाटावे, की फक्त काळाचा महिमा आहे,

असे म्हणून याकडे पाहावे हा मोठाच प्रश्न आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या प्रीती पटेल, ऋषी सुनक आणि सुएला ब्रेव्हमन यांनी तसेच इतर पक्षांच्या वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, कुलदीप सिंग असे अनेक खासदार मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com