Jai Shriram
Jai Shriramsakal

श्रीराम : काश्मीरचं सांस्कृतिक संचित

काश्मिरी भाषेत इंद्रधनुष्याला राम दून म्हणतात. राम दून म्हणजे रामाचं धनुष्य. इथले रजई विणणारे कारागीर कापूस पिंजण्यासाठी धनुष्याची जी दोरी वापरतात तिलाही दून असंच म्हणतात.

- फैसल शाह, i.shahfaesal@gmail.com, On @shahfaesal

काश्मिरी भाषेत इंद्रधनुष्याला राम दून म्हणतात. राम दून म्हणजे रामाचं धनुष्य. इथले रजई विणणारे कारागीर कापूस पिंजण्यासाठी धनुष्याची जी दोरी वापरतात तिलाही दून असंच म्हणतात. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या जवळच असणाऱ्या एका शांत- निवांत खेड्यात मी लहानाचा मोठा झालो. अक्रोडाच्या वनराईतून आम्ही सारी मुलं या मायावी कमानींचा मागोवा घेत फिरायचो. त्या अद्‍भूत सौंदर्यानं तर आम्ही मोहून जात असूच पण राम दून या शब्दानं माझ्यावर टाकलेली मोहिनी त्यापेक्षा जास्त जबरदस्त होती.

इतकं सुंदर रंगीबेरंगी धनुष्य स्वत:जवळ बाळगणारा हा राम कोण बरं असेल? आणि या नैसर्गिक कमानीला हे असलं गूढ नाव कसं काय पडलं असेल ? की याचा कुणा पिंजाऱ्याशी काही संबंध असेल ? अशा अनेक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती मी माझ्या वडिलांवर करायचो. माझे वडील एक शिक्षक होते आणि अनेकविध भाषा त्यांनी स्वतःच प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेल्या होत्या.

पण असे प्रश्न मी विचारले, की दरवेळी एका काश्मिरी अंगाईतील “राम राम भद्रेन बूनी” अशी सुरुवात असलेल्या दोन ओळी ते म्हणत असत. आणि मग लगेच शिक्षकाच्या भूमिकेत शिरून या इंद्रधनुष्यातील तानापिहिनिपाजा असा रंगांचा विशिष्ट क्रम मला सांगत. पुढे ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी असे ओळीने सारे रंग मला समजावून देऊ लागत. आमची ही गाडी शेवटच्या रंगावर आली, की माझ्या प्रश्नातल्या रामाची चर्चा आता पुन्हा केव्हातरी करावी लागेल हे मी मनोमन समजून चुकत असे.

अति प्राचीन काळापासून काश्मीरमध्ये अद्वैतवादी शैवपंथाचं प्राबल्य आहे. परंतु इस्लामचं आगमन होण्यापूर्वीच्या काळात भगवान श्रीराम आणि रामायणही काश्मिरी जाणिवेत तितकेच खोलवर रुजलेलं आहे, हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. कल्हणरचित राजतरंगिणी हे बाराव्या शतकातील एक ऐतिहासिक इतिवृत्तात्मक काव्य आहे. काश्मीरचा राजा दुसरा दामोदर यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा कल्हणानं त्यात तो सांगितलेला आहे.

श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला दामोदर करेवा असं नाव दिलेलं आहे ना, तोच हा राजा. कल्हण सांगतो, की एकदा या राजा दामोदरानं धर्मधुरिणांना भोजन द्यायला नकार दिला. त्या वेळी संतप्त झालेल्या त्या धुरिणांनी त्याला तू सर्प होशील असा शाप दिला. मात्र या शापाला एक उ:शापही होता. राजा दामोदर यानं संपूर्ण रामायण एकाच दिवसात श्रवण केलं तर मात्र हा शाप निष्फळ ठरेल, असा तो उ:शाप होता. प्राचीन आणि मध्ययुगीन काश्मिरात रामायणाचं पठण अतिशय लोकप्रिय होते, याचा हा अत्यंत स्पष्ट पुरावा होय.

तरीही आता इतकी शतके उलटून गेल्यावर आणि इतक्या ऐतिहासिक उलथापालथी झाल्यानंतर आजही राम हा काश्मिरींच्या जाणिवेचा भाग उरला आहे का, हा प्रश्न येतोच. सांस्कृतिक प्रवाहाचं सातत्य म्हणता येईल असं काही खरोखरच अस्तित्वात असतं काय ? काश्मिरी मुस्लिमांच्या पिढ्यांमागून पिढ्यांनी भगवान रामाचा वारसा आपल्या सुप्त मनात कसा काय जपला असेल ? या आणि अशा इतरही काही बाबी समजून घेण्याची माझी इच्छा होती.

आमच्या गावात पंडितांची बरीच घरे होती. ते सारे बाजार भागात राहत. आम्ही टेकड्यांच्या बाजूला राहायचो. पण मी सहा वर्षाचा झालो तेव्हा आमच्या शेजारी राहणारे सारे पंडित दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळं गाव सोडून निघून गेले. त्या काळातलं फारसं काही मला आता आठवत नाही. पण एक गोष्ट मला आजही स्पष्ट आठवते. हिवाळ्यातले थंडगार वारे संध्याकाळी धुरकटून येत.

आमच्या घराच्या कुंपणावरून अंगणात राख येऊन पडत होती. वाऱ्याच्या झोताबरोबर अर्धवट जळलेले कागदही येत होते. गावच्या पूर्वेला दूरवर उफाळलेल्या भयानक ज्वाळा आम्ही पाहतच राहिलो होतो. दहशतवाद्यांनी सगळ्या पंडितांना जम्मूकडे निघून जायला भाग पाडलं होतं. त्या दहशतवाद्यांचे काही सहानुभूतीदार होतेच गावात. ते रोज एक अशा नेमाने पंडितांची मोकळी घरे एकेक करून पेटवून देत होते.

निर्मनुष्य झालेल्या त्या घरांमधून अर्धवट जळालेल्या वह्या, कपड्यांच्या जळक्या चिंध्या आणि अक्रोड वृक्षांची काळवंडलेली पाने गावभर विखरून पडत होती. इतिहासाचे निषिद्ध अवशेष ज्वाळांच्या मुखातून वारा जणू खेचून बाहेर आणत होता. आख्खं काश्मीर त्या काळात वैश्विक जिहादी केंद्र बनत चालले होते. अशा काळरात्री कुणी आमच्याशी राम आणि रामायणाच्या गोष्टी करेल, अशी सुतराम शक्यता नव्हती.

या गोष्टीला बरीच वर्षे उलटल्यावर एक परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी म्हणून मी जिल्हा प्रशासनाचा अनुभव घेत असताना बालपणी पडलेल्या त्या प्रश्नांचा भुंगा पुन्हा माझ्या कानात भुणभुण करू लागला. एकदा माझ्या कामाचा भाग म्हणून काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील सुथरण नावाच्या एका खेड्यात मी गेलो होतो. रामायणाच्या कथेची या गावातील आवृत्ती ऐकून मी थक्कच झालो.

जिथं पाहावं तिथं हिरवीगार कुरणं आणि पाईन वृक्षांची राई दिसत असलेलं सुथरण किंवा सीताहरण नावाचं हे गाव अतिशय मोहक दिसत होतं. धरतीवर जणू स्वर्गच अवतरला होता. पण त्या काळात या दुर्गम गावी जायला पक्का रस्ता नव्हता. तिथल्या लोककथेनुसार याच गावातून रावणानं सीतामाईचं अपहरण केलेलं होतं. त्या लोकांनी मला गोड्या पाण्याचा एक खळाळता झरा दाखवला. जवळच एक विशाल खडक होता.

त्यांनी मला सांगितलं, की श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण आपल्या १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात एके दिवशी अगदी याच ठिकाणी आले होते. जवळच कांच्छेतपूर नावाचं आणखी एक छोटेसं गाव होतं. काश्मिरी भाषेत कानछेत म्हणजे कान तुटलेली. यात नक्कीच रावणाची बहीण शूर्पणखा हिचा संदर्भ उघड दिसत होता. वाल्मिकी रामायणानुसार लक्ष्मणानं तिचंच नाक आणि कान छाटून टाकले होते.

चौदाव्या शतकात काश्मिरात इस्लामचं आगमन झाले. काश्मिरातील बहुसंख्य लोकांनी हा नवा धर्म स्वीकारला. पण शैव पंथ आणि सुफी इस्लामची वैश्विकता काश्मिरी जाणिवेत सदासर्वकाळ घट्ट रुजलेलीच राहिली. लल्लेश्वरी ऊर्फ लाल देद आणि शेख उल आलम यांच्या शिकवणुकीमुळं मुस्लीम प्रजा हिंदू आणि मुस्लीम यात भेद न करणारी बनली.

संघटित धर्मातील दृढ कट्टरतेपेक्षा समन्वयवाद आणि अतींद्रिय आध्यात्मिक अनुभूतीच काश्मिरी लोकांनी अधिक मोलाची मानली. सांस्कृतिक निर्मितीचा भाग म्हणून विविध कला, काव्य, संगीत, वास्तुकला, कारागिरी, उत्सव आणि धार्मिक परंपरांची निर्मिती झाली. त्या सर्वांनी इस्लाम, हिंदू आणि बौद्ध मतांचं मीलन घडवून आणले आणि काश्मीरला शांततापूर्ण सहजीवनाचं एक अनन्यसाधारण उदाहरण बनवलं.

असं असलं तरी भगवान शिवाचा अंमल असलेल्या प्रदेशात रामाचं भ्रमण होणं ही बाब मला बराच काळ चक्रावून टाकत राहिली. पण मग आणखी एका ठिकाणाची माहिती मला मिळाली. हे ठिकाण सुथरणपासून १५० किमी अंतरावर होते. कूपवाडा जिल्ह्यातील फर्किन नावाचे गाव होतं ते. उंच टेकड्यांमधली ती एक चिमुकली वस्ती होती.

सुथरण गावाशी तिचा सुतराम संबंध नव्हता. त्याही गावात “राजा राम की लादी” नावाचं एक स्थळ होतं. सुथरणसारखीच एक आख्यायिका या स्थळाशीही निगडित होती. या स्थळाजवळही एक गोड्या पाण्याचा झरा आहे. तो सीता सर या नावानं ओळखला जातो. रामाच्या वनवास काळात सीतामाई या झऱ्यापाशी येऊन गेल्या असं सांगितलं जातं.

कूपवाड जिल्ह्यातले फर्किन आणि मध्य प्रदेशातील ओरछा या दोन्ही ठिकाणात एक साम्य दिसतं. तिथंही भगवान राम राजाराम याच नावानं ओळखले जातात. संपूर्ण भारतात रामाला राजाराम म्हणणारी अशी फारच थोडी ठिकाणं सापडतात.

भगवान राम हे इंडोनेशियापासून थायलंडपर्यंत आणि कोरियापासून कूपवाडापर्यंत उसळत वाहत राहिलेल्या भारताच्या आध्यात्मिक प्रवाहाचे समृद्ध चिरस्रोत आहेत. काश्मिरी जाणिवेत, भाषेत, म्हणीत, वाक्प्रचारात, लोककथांत, आख्यायिका आणि मिथकात, कलाप्रकारांत, विचारपद्धतींत, स्थळांच्या नावात आणि लिखित सामग्रीत भगवान राम गेली हजारो वर्षे ध्रुवीय ज्योतीप्रमाणं प्रकाशत राहिले आहेत.

एक मुस्लीम या नात्यानं भले मी आज एका भिन्न धर्माचं आचरण करत असेन पण माझी ओळख, माझा इतिहास आणि माझा वारसा श्रीरामाचं स्तवन करतो. ख्यातनाम उर्दू कवी डॉ. इकबाल यांनी श्रीरामाचं वर्णन इमाम ए हिंद (हिंदनायक) आणि भारताचं भूषण अशा शब्दांत केलंय. भारतीय या नात्यानं भगवान रामाच्या काश्मीर यात्रेची स्मृती आम्ही काश्मिरी लोक आमच्या सांस्कृतिक संचिताचा हिस्सा म्हणून भक्तिभावानं जतन करतो.

म्हणून आता २२ जानेवारीला भगवान श्रीराम अयोध्येतील आपल्या बहुप्रतीक्षित पुनरागमनाचा अंतिम चरण गाठत असताना काश्मीरच्या नभांगणातील इंद्रधनुष्यं आपल्या भूमीवरील त्याच्या कृपाकारी मुक्कामाचा स्मरणजागर नक्कीच उत्साहानं साजरा करतील.

(लेखक हे मूळचे जम्मू-काश्मीरमधील ‘आयएएस’ अधिकारी असून सध्या केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com