

Family Importance
esakal
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यक्तिस्वातंत्र्य, करिअर, तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली यांना वाढते महत्त्व मिळत असले, तरी माणसाच्या मूल्यव्यवस्थेतील ‘कुटुंब’ या संस्थेचे स्थान अजूनही अत्यंत भक्कम आहे. ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ने प्रसिद्ध केलेल्या विश्लेषणातून ही बाब जगभरातील आकडेवारीच्या आधारे स्पष्ट होते. यासाठी युरोपियन व्हॅल्यूज स्टडी आणि वर्ल्ड व्हॅल्यूज सर्व्हे या मोठ्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांतील माहितीचा वापर करण्यात आला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोक कुटुंबाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे मानतात. राज्यातील संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या एका कौटुंबिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरते.
आर्थिक विकास, शहरीकरण, आधुनिकीकरण आणि सामाजिक बदल यांमुळे कुटुंबव्यवस्था कमकुवत होत असल्याची चर्चा सातत्याने होत असताना या निष्कर्षांना अधिक महत्त्व येते. मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणातील लोकांच्या मूल्यांवर नजर टाकली असता चित्र वेगळे दिसते. व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ कितीही बदलले तरी भावनिक आधार, सुरक्षितता, आपलेपणा आणि परस्पर जबाबदारी यांसाठी कुटुंबाची गरज कायम आहे. ‘तुमच्या आयुष्यात कुटुंब किती महत्त्वाचे आहे?’ या प्रश्नाला ‘अत्यंत महत्त्वाचे’ किंवा ‘बऱ्यापैकी महत्त्वाचे’ असे उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण बहुतेक देशांमध्ये अत्यंत मोठे आहे. ‘कुटुंब अजिबात महत्त्वाचे नाही’ असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे.