अमनाथात अघटित घडू नये म्हणून...

saransh.
saransh.

""सायेब पोलिसांनी आम्हाला आताच सोडून दिलं गावात. गाडी गेली परत. गावात गुडूप अंधार आहे. सामसूम दिसते. आम्ही घरात पोहोचलो आता.'' रात्री 12 वाजता शीलाताई शिंदेचा फोन आला. मी "ओके' म्हणालो. दहा मिनिटांत पुन्हा मोबाईल वाजला. ""सायेब गावात उजीड दिसून राह्यला घरात. लोकांची हालचाल दिसून राह्यली. कसं करावं. पोलिसांची गाडीबी गेली.'' दबक्‍या आणि घाबरेल्या स्वरात शीलाताई बोलत होत्या. मी म्हणालो, ""गाडीवाल्या पोलिसांना फोन करा, त्यांना बोलावून घ्या.'' शीलाताई म्हणाल्या, ""मेन सायाबाले फोन केला; पण त्यांचा मोबाईल लागून नाही राह्यला सायेब.'' मी म्हणालो, ""मला नंबर द्या. दारं लावून घ्या. घर पक्कं आहे ना?''
गेल्या शनिवारी रात्रीची ही घटना. शनिवारी दिवसा शीलाताईचा फोन आला होता. ""गावातल्या काही लोकांनी माझ्या बहिणीच्या शेतात जबरदस्तीने अतिक्रमण केले. विहीर बांधणं सुरू केली. आम्ही विरोध केला. तर शिवीगाळ केली. मारण्याची धमकी दिली. कुरुंदा पोलिस स्टेशनमध्ये सकाळपासून बसलो. तर अजून रिपोर्ट नाही घेतली आमची. मी बबनराव गोरामन, मतीन भोसले आणि नामदेव जाधव यांना बी फोन केल्ता. माझ्या बहिणीच्या मालकीची पन्नास एकर शेती आहे. सात-बाराही नावावर आहे. तिच्या घरचे लोक बाहेर गेले, तर लॉकडाउनमुळे तिकडेच अडकले. आता आम्ही बाया आणि लहान पोरंच आहोत.'' न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही पारधी समाजाची जमीन बळकावण्यावरून बीड जिल्ह्यात एका पारधी कुटुंबाचे हत्याकांड झाले. ते प्रकरण ताजे असतानाच जमिनीवरून पुन्हा पारधी कुटुंब आणि गावातील काही लोकांचा होणारा हा वाद विकोपाला जाणार तर नाही, अशी पाल चुकचुकली.

त्यांनी दिलेल्या मोबाईलवर कॉल केला. परंतु, तो "स्विच ऑफ' दाखवत होता. मध्यरात्री शीलाताईच्या बहिणीचे अख्खे कुटुंब तिच्या झोपडीत. गावातली झुंड तिच्या घरावर अचानक हल्ला तर करणार नाही ना? या विचाराने मीही हादरलो होतो. मी तडक गुगलवर हिंगोली पोलिस स्टेशनची वेबसाइट उघडली. वसमत तालुक्‍यातील कुरुंदा पोलिस स्टेशन सर्च करून तातडीने नंबर मिळविला. लागलीच कॉल केला. मी त्यांना कुठून बोलतो ते सांगितले. ""अहो, तुमच्या गाडीने ज्या कुटुंबाला अमनाथाला सोडले ते धोक्‍यात आहे. तुमची गाडी गेल्याबरोबर गावातले लोक जागे झाले. तुमची गाडी जवळपासच असेल. फोन करून पाठवा. वाचवा त्या कुटुंबाला.'' तिकडून थंडपणे हो म्हटले. लगेच मी शीलाताईला फोन करून ही माहिती दिली. आता अघटित होणार हे निश्‍चत. पाचच मिनिटांत शीलाताईचा कॉल आला. ""सायेब, गाडी काही आली नाही. आम्ही आता निघालो आहोत सर्व लेकर घेऊन.'' एक मोठी घटना टळली, या विचाराने मला हायसे वाटले. माझी झोप मात्र उडाली होती. आदिवासी आणि भटके विमुक्तांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्याकडून बळकावण्याच्या अनेक घटना डोळ्यांसमोर तरळल्या.
जिवती पहाडावर कोलाम समाजाचे 42 गुडे आहेत.
शतकांपूर्वी पहाडावरील दगड फोडून जमिनी उजवल्या. शेती करून गुजराण केली. परंतु, पुढे त्यांची शेती बाहेरून आलेल्या लोकांनी हडपण्याचा सपाटा सुरू केला. बाहेरचा माणूस दिसला की, कोलाम पळून जायचे. कोलामांची अशी शेकडो नव्हे, तर हजारो एकर जमीन बळकावली गेली. तहसील कार्यालये मॅनेज करून आपल्या नावावर करून घेतली. आताही बळकावणे सुरूच आहे. मातीच्या खाणीसाठी कंत्राटदारांनी जमिनी बळकावल्यानंतर खडकी, रायपूर आणि कलिगुडा येथील नागरिकांचा लढा सुरू आहे. कोरपना तालुक्‍यातील धोपटाळा येथील रावजी शेरकुरे आणि भालचंद्र शेरकुरे एक दिवस सकाळी उठून त्यांच्या शेतात गेले. तर त्यांच्या सात एकर शेतीत प्लॉट टाकलेले दिसले. रात्रीच्या रात्री चंद्रपूरच्या एका बिल्डरने जमीन बळकावली. राजुरा तालुक्‍यातील लक्कडकोट येथील अडीच एकर जमिनीवर वसलेली अख्खी पारधी वस्ती एका बड्या धेंड्याने तहसील कार्यालय "मॅनेज' करून विकून टाकली. भटक्‍या-विमुक्तांच्या आणि गरीब आदिवासींच्या शेतजमिनी बळकावण्याच्या घटना सर्वत्र आहेत. जे लोक त्याविरोधात आवाज उठवतात त्यांचा आवाज कधी सरकारी यंत्रणेचा "अर्थ'पूर्ण वापर करून, तर कधी अन्वन्वित अत्याचार करू दाबण्यात येतो. बीड जिल्ह्यात ज्यांची हत्या करण्यात आली त्यांनी तर न्यायालयात त्यांची लढाई जिंकली होती. जमीन मिळाली; परंतु अमानुषतेपुढे त्यांना त्यांचे प्राण गमावावे लागले. प्रत्येकच शोषिताचे प्रकरण उघड होते, असेही नाही. प्रत्येकच शोषितांचा आवाज कुणी ऐकतो, असेही नाही. धर्मेद्र शेरकुरे आणि रोमिनदास भोसले यांनी लक्कडकोटचा अत्याचार "सकाळ'कडे आणला नसता, तर कदाचित त्या वस्तीचा सफाया झाला असता. नागपूर जिल्ह्यातील राजुलवाडी पारधी बेड्याची मोक्‍याची जागा बळकविण्याचा शिक्षणमाफियाचा डाव "सकाळ'ने व्यवस्थित मांडला नसता, तर समाजिक कार्यकर्ता पन्नालाल राजपूत यांच्यासह सर्वच कुटुंबांना तेथून परागंदा व्हावे लागले असते. भंडारा जिल्ह्यातील गिरोला वडार वस्तीचा लढा "सकाळ'पर्यंत पोहोचला नसता, तर ती वस्तीही नेस्तनाबूद झाली असती. परंतु, अशी मोजकीच उदाहरणे आहेत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील जिथे माणूस हरला आणि अत्याचार जिंकला. असंख्य घटनांची तर नोंदही होत नाही. अमनाथा येथील सुनीता उल्फेराव शिंदे हिचा लढा तिचीच बहीण असलेल्या शीलाताई शिंदे यांनी स्वतःच्या शिरावर घेतला आहे. शीलाताई नांदेड जिल्ह्यातील पिपरी महिवाल या गावच्या. त्या कसत असलेली 15 एकर शेती तेथील लोकांनी बळकविण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याविरोधात त्यांनी जीवाची पर्वा न करता संघर्ष केला. बबनराव गोरामन यांनी तिच्या संघर्षाला बळ दिले. "सकाळ पेंडॉल'मधूनही अधिवेशनापुढे तिचा आवाज मांडला. या संघर्षात त्यांनी कायदेशीर विजय संपादन केला. परंतु, गावाने त्यांच्यावर बहिष्कारचे शस्त्र उगारले आहे. गावातील दुकानातून त्यांना काही खरेदी करता येत नाही. गावातील कोणत्याही वाहनात त्यांना बसू देण्यात येत नाही. तेथून सात किलोमीटर चालत गेल्यावर वाहन मिळते.
शनिवारी अख्खी रात्र शीलाताई त्यांची बहीण सुनीताची तीन मुले कृष्णा, कन्हैया आणि गोपी तसेच मुली वंदना आणि करुणा यांच्यासह चालत होत्या. वंदना आणि करुणाच्या कडेवर त्यांच्या बाळांना घेऊन सपासपा पाय पुढे फेकत होत्या. सध्या त्यांचा जीव वाचला. परंतु, गावात गेले, तर झुंडीची मानसिकता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते हादरलेलेच आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी शांतता समितीची बैठक घेऊ, असा विश्वास त्यांना दिल्याची माहिती शीलाताई यांनी कॉल करून दिली. अमनाथासारख्या असंख्य गावात अघटित घडू नये म्हणून प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हातात काय आहे? सांगा जरा...  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com