संत चावरा : एक कर्मयोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saint chavara kuriakose elias
संत चावरा : एक कर्मयोगी

संत चावरा : एक कर्मयोगी

- फादर डॉ. विजू पी. देवस्सी

केरळमध्ये सामाजिक सुधारणा करून, गोरगरीब आणि दीनदलितांमध्ये शिक्षणाची गोडी लावणारे संत चावरा कुरियाकोस एलियास. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रचली. त्याच रचलेल्या पायावर केरळची ख्याती आज शिक्षणात पुढारलेले राज्य म्हणून सर्वदूर पोहचली आहे. संत चावरा एलियास यांना जाऊन दीडशे वर्षें उलटली. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण...

संत चावरा कुरियाकोस एलियास (१० फेब्रुवारी १८०५-३ जानेवारी १८७१) हे दूरदृष्टी असलेले १९ व्या शतकातील केरळमधील एक थोर सामाजिक-धार्मिक सुधारक. शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, कवी म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्यामुळे केरळमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रचली गेली. विविध जातीपंथाच्या लाखो लोकांना त्याचा फायदा झाला, त्यांचे जीवन पालटले.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे आज केरळ मानवी विकास निर्देशांकात उत्तम कामगिरी करतोय. केरळच्या विकासात शैक्षणिक प्रगल्भता हा मुख्य आधार आहे. त्यात संत चावरा यांचे मोठे योगदान आहे. केरळमध्ये ज्यावेळी शिक्षण केवळ उच्चवर्णीय, अभिजात वर्गापुरते मर्यादित होते, त्या काळात संत चावरा यांनी ‘पल्लिककूम’ ही चळवळ राबवली. या अंतर्गत चर्चच्या आवारात शाळा उभारण्याचे काम झाले आणि केरळमध्ये शिक्षणाचे दरवाजे वंचितांसाठी उघडले गेले. केरळमधील सायरो-मलबार ख्रिश्चनाचे प्रतिनिधी म्हणून संत चावरा यांनी आपल्या अख्यत्यारीतल्या सर्व चर्चेसमध्ये शाळा उघडण्याचे आदेश दिले. शाळा न उभारल्यास चर्च बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय आपुलकी होती.

दलित, वंचितांसाठी शिक्षणाची पहाट

केरळमध्ये त्या काळात जातीभेद, अस्पृश्यतेची अमानुष प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. त्या काळी शाळांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. या परिस्थितीत अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळेची दारे खुली करण्याचा संत चावरा यांचा निर्णय एक मोठ क्रांतिकारक आणि सामाजिक परिवर्तनाचे पाऊल होते. संत चावरा यांच्या या निर्णयामुळे पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या शेकडो दलित विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. त्यांचे आयुष्य बदलले.

गरीब आणि दलित विद्यार्थ्यांचे शाळागळतीचे प्रमाण जास्त असल्याचे संत चावरा यांच्या लक्षात आले. ते प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी शाळेमध्ये माध्यान्ह भोजन देण्याची योजना सुरू केली. सोबत गरीब विद्यार्थ्यांना शाळेचा ड्रेस आणि पुस्तके मोफत दिली. याकरिता संसाधनं उभारण्यासाठी त्यांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबांकडून पिडियारी (मूठभर तांदूळ) आणि ताईथ (वार्षिक उत्पन्नानातील एक दशमांश वाटा) देणगी म्हणून स्वीकारण्याची अभिनव संकल्पना सुरू केली. त्यांच्या या सामाजिक सुधारणांना केरळमध्ये सर्वच वर्गातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.

मिड डे मिलचे जनक

देशभरात आज सर्वच सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र १७५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा संत चावरा यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला होता. २६ नोव्हेंबर १९३६ रोजी, त्रावणकोरचे तत्कालीन दिवाण सी. पी. रामास्वामी अय्यर यांनी त्रावणकोरच्या महाराजांना केरळमधील सर्व सरकारी शाळांमध्ये संत चावरा यांनी सुरू केलेली माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्याची शिफारस केली. त्यानंतर स्वतंत्र भारतातील अनेक सरकारांनी संत चावरा यांच्या मिड डे मिलच्या उपक्रमाची अंमलबजावणी केली. शिक्षण क्षेत्रातील या अत्यंत प्रभावी उपायाचे खरे सूत्रधार संत चावरा होते.

संस्कृत शाळा ते महिला बोर्डिंग स्कूल

१८४६ मध्ये त्यांनी केरळमधील मान्नानम इथे संस्कृत शाळा स्थापन केली. या उपक्रमामुळे सामान्य लोकांना हिंदू साहित्याचा अभ्यास करता आला. या उपक्रमामुळे सामान्य लोकांना पवित्र धर्मग्रंथ आणि धार्मिक परंपरा समजून घेता आल्या. त्याचा सारासार विचार करण्याची संधी मिळाली. मात्र त्यामुळे वर्चस्ववादी जातव्यवस्था आणि त्यातील अनिष्ट प्रथा बदलवण्यासाठी एक चेतना मिळाली.

संत चावरा यांनी १८३१ मध्ये पुरुषांसाठी देशातील पहिली स्वदेशी कॅथोलिक धार्मिक संस्था, तर महिलांसाठी १८६६ मध्ये संस्था स्थापना केली. संत चावरा यांच्या हयातीत त्यांनी उभारलेल्या शाळा आणि संस्था चालवण्यासाठी समर्पित आणि कुशल कर्मचारी या संस्थांमधून उपलब्ध झाले. त्यांचे सामाजिक काम नेटाने पुढे चालवण्यात मदत झाली. त्यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात महिलांसाठी बोर्डींगची व्यवस्था असलेल्या शाळा उभारल्या. महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी हे अंत्यत क्रांतिकारी पाऊल होते. पुढे देशभरात शिक्षणाचे जाळे उभारून, संत चावरा यांच्या विचाराप्रमाणे सार्वत्रिक आणि सामान्यांना परवडणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ख्रिस्त ही स्वायत्त विद्यापीठ त्यामध्ये अग्रेसर आहे.

२० डिसेंबर १९८७ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी संत चावरा यांच्या योगदानाचा गौरव केला. संत चावरा यांनी शिक्षणाला गरिबांच्या, दलितांच्या उन्नतीचे साधन मानले. त्यांनी शाळा हरिजनांसह सर्व समुदायांसाठी खुल्या केल्या होत्या. एका अर्थाने सर्वसमावेशक भारतीयत्वाची व्याख्या संत चावरा यांनी केली होती. ज्यामध्ये वंचितांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, दू:ख दूर करण्यात आणि आपल्या लोकांमध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण करण्याचे काम केले होते.

प्रिंटिंग प्रेसची स्थापना

१८४६ मध्ये त्रावणकोरचे महाराज स्वाती थिरुनल रामा वर्मा यांची परवानगी घेऊन आणि तत्कालीन ब्रिटिश रहिवासी मेजर जनरल विल्यम कुलेन यांची मदत घेऊन, संत चावरा यांनी मध्य केरळमधील मान्नानम इथे वुड ब्लॉक प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. या प्रिंटिंग प्रेसमध्ये सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य प्रकाशित केले. मुद्रित माध्यम हे शिकण्याच्या प्रक्रियेचे एक शक्तिशाली माध्यम आहे. याची त्यांना एवढी खात्री होती, की छापखाना कधीही न पाहता त्यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याचा विचार केला. या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून त्यांनी मल्याळम भाषेतील ज्ञान प्रसाराला हातभार लावला. सोबत प्रकाशन क्षेत्रात असलेल्या इंग्रजांच्या मक्तेदारीला आव्हान दिले. ‘दीपिका‘ नावाचे सर्वात जुने मल्याळम वृत्तपत्र १८८७ मध्ये याच प्रिंटिंग प्रेसमधून सुरू झाले. हे वृत्तपत्र आजही सुरू आहे.

संत चावरा यांनी त्यांच्या गावी, कैनाकरी इथे १८६९ मध्ये हाऊस ऑफ चॅरिटीची स्थापना केली. या ठिकाणी वृद्ध, घरातून टाकून दिलेले आणि आजारी लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली. भारतीय चर्चच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच धर्मदाय उपक्रम मानला जातो. परदेशी मिशनऱ्यांच्या बिलकूल विरुद्ध संत चावरा यांनी सामाजिक कामे सुरू ठेवण्यासाठी भातशेती आणि देशातील व्यक्तींच्या योगदानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उत्पन्न आणि इतर संसाधने निर्माण केली.

उत्कृष्ट साहित्यिक, भाषातज्ज्ञ

संत चावरा हे बहुमुखी भाषातज्ज्ञ होते. त्यांचे मल्याळम आणि संस्कृत या भाषेवर विशेष प्रभुत्व होते. त्यांनी मल्याळम भाषेतील उत्कृष्ट साहित्यांची निर्मिती केली. त्यांची ‘मार्टर्डम ऑफ अनस्तास्ययुडे’ (१८६२) ही कविता मल्याळम भाषेतले पहिले खंड काव्य मानले जाते. आत्मानुतापम (हृदयाचे संयोग) हे महाकाव्य शैलीत त्यांनी लिहिले. त्यात अत्यंत सूक्ष्मतेने आणि साधेपणाने अंतर्मनातील आध्यात्मिक शोध घेणारा त्यांच्यामधील कवी दाखवला आहे. ‘ओरू नल्ल अप्पंटे चावरुल’ (प्रेमळ पित्याचा करार, १८६८) यामध्ये संत चावरा यांनी मुलांचे संगोपन, कौटुंबिक वाद मिटवणे आणि इच्छापत्र लिहिण्याचे महत्त्व विषद केले आहे. चांगले पालकत्व मनुष्याच्या वैयक्तिक वाढीवर सकारात्मक परिणाम करते, या माध्यमातून समाजाचा विकास अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्गाने होईल, असे त्यांचे ठाम मत होते.

सामाजिक सौहार्दाचे प्रतीक

संत चावरा कुरियाकोस एलियास हे शांतता आणि धार्मिक सौहार्दाचे प्रतीक होते. ते अत्यंत लोकप्रिय आणि सर्वमान्य असल्यामुळे अनेक स्थानिक वाद आणि सामाजिक तणाव दूर करण्यात त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यांच्या आत्मचरित्रात (नालागमम - क्रॉनिकल्स) मान्नानम इथला मठ स्थापन करण्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांनी मिळून कसे परिश्रम केले याचे वर्णन केले आहे.

संत चावरा हे आध्यात्मिक विश्वासाने एक तपस्वी जीवन जगले. त्याच्यासाठी अध्यात्म म्हणजे ईश्वराशी स्नेहपूर्ण आणि संबंध प्रस्थापित करणे असा होता. ईश्वराचा गौरव मानवाच्या महानतेवर अवलंबून आहे. हे संत चावरा यांना समजले होते. त्यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य याची साक्ष देतात. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी चावरा यांना कॅथोलिक चर्चमध्ये संत म्हणून घोषित करण्यात आले. संत चावरा हे खरे कर्मयोगी होते, त्यांनी आजन्म लोकांना अज्ञान, दारिद्र्य आणि आजारपणाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

(लेखक ‘ख्रिस्त'' या स्वायत्त विद्यापीठाचे संचालक, अधिष्ठाता आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
loading image
go to top