तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवतो का? मी नापास झालो तर!

exam failure fear
exam failure fear

परीक्षेच्या दिवसांमध्ये तुम्हाला... 

* आपलं मन ब्लॅंक झालं असं वाटतं का? 
* म ला जमणार नाही. मी करू शकणार नाही. मूर्ख, नालायक आहे असे विचार मनात येतात का? 
* छातीतील धडधड वाढून श्‍वास घ्यायला त्रास होतो का? 
* मनाचे दरवाजे आतून बंद झाले आहेत असं वाटतं का? 
* पेपर सोडवून परत आल्यावर अचानक प्रश्‍नांची उत्तरं आठवू लागतात का? 
* घरी पेपर्स सोडवताना मिळाले असते त्यापेक्षा कमी मार्कस्‌ प्रत्यक्ष परीक्षेत मिळतील असं वाटतं का? 
* प्रत्यक्ष पेपर देताना तुमचं मन विचलित होतं का? 
* मनावर दडपण येतं का? 
* लिहिताना काही महत्त्वाचे मुद्दे सुटून जातात का? 
* नेमकं आता काय करायचं आहे याचा विसर पडतो का? 
* आपण नापास होऊ. आपल्याला खूप कमी मार्कस्‌ मिळतील असे अपयशाचे विचार मनात येतात का? 
* वर्षभर आपण घेतलेल्या मेहनतीच्या मानाने आपला परीक्षेतील परफॉर्मन्स खूप कमी राहणार असं वाटतं का? 


जर वरील प्रश्‍नांपैकी काही प्रश्‍नांची तुमची उत्तरं होय अशी असतील तर तुमच्या मनात परीक्षेबाबत, तुमच्या परफॉर्मन्सबाबत खूप चिंता, ताणतणाव आहेत असं स्पष्ट होतं.


सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी, परीक्षेच्या दरम्यान किंवा परीक्षेच्या नंतर काही प्रमाणात चिंता, ताणतणाव जाणवत असतात. खरं पाहिलं तर हाच ताण आणि चिंता माणसाला परिश्रम करण्याकरिता, अधिक चांगला परफॉर्मन्स देण्याकरिता प्रवृत्त करीत असतात. पण, काही विद्यार्थ्यांच्या मनावरचा हा ताण आणि चिंता इतकी वाढते की, त्यांचा परफॉर्मन्स वाढण्याऐवजी कमी होऊ लागतो, त्यांच्या करिअरमध्ये असंख्य समस्या निर्माण होऊ लागतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये या चिंतेची लक्षणं दिसू लागतात. 

मनातल्या मनात अभ्यास किंवा परीक्षेची अतिशय भीती वाटू लागते. राग, चिडचिड, उदासीनता वाढते. रडू आवरत नाही. मनामध्ये टाळण्याची, दिरंगाई करण्याची प्रवृत्ती वाढते. आपण वर्षभर केलेली पूर्ण मेहनत वाया गेली, आपलं मन अगदी ब्लॅंक झालं असं वाटू लागतं. अभ्यासावर लक्ष एकाग्र होत नाही. सतत नकारात्मक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःची तुलना हे विद्यार्थी इतरांसोबत करू लागतात. विचारांवरचं संतुलन पूर्णपणे निघून जातं.

परीक्षेबाबतची ही अतिरिक्त चिंता निर्माण होण्यामागे अनेक कारणं आहेत. आधी झालेल्या एखाद्या परीक्षेचा वाईट अनुभव मनात रुजला असेल. त्यावेळी परीक्षा देताना आठवलं नसेल, त्यावेळी खूप भीती वाटली असेल, मार्कस्‌ कमी मिळाले असतील, तर हा अनुभव अंतर्मनात खोलवर रुजतो व दरवेळी परीक्षेच्या काळात तशीच लक्षणं दिसू लागतात. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते. परीक्षा जवळ आली की, चिंता व भीतीचा स्वीच ऑन होतो व परीक्षेची पूर्वतयारी करण्याच्या प्रक्रियेवरदेखील त्याचा परिणाम होऊ लागतो. 
वर्षभरात नीट अभ्यास न करणं, पुरेशी तयारी न होणं हादेखील चिंता वाढण्यामागचा एक महत्त्वाचा घटक आहे.

वेळेचं नियोजन करता न येणं, अभ्यासाच्या प्रक्रियेत सुसूत्रता नसणं यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरचं दडपण वाढतं. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी मुलं घोकंपट्टी करतात, त्यांच्यातदेखील आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यापेक्षा जे विद्यार्थी आधीच नीट नियोजन करून रिव्हिजन करतात, ते जास्त आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जातात. असे विद्यार्थी, परीक्षेत नेमकं काय विचारलं जाणार आहे, कुठले मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत या सर्व गोष्टींचा विचार आधीच करतात. त्या अनुषंगाने स्वतःची तयारी करतात. त्यामुळे परीक्षेबाबतचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होत जातो. 

आत्मविश्‍वासाचा अभाव, नापास होण्याची भीती, नकारात्मक विचार करण्याची लागलेली सवय यामुळेदेखील परीक्षेबद्दलची अवास्तव चिंता व ताणतणाव वाढतो. 

तू मेरिटमध्ये आलंच पाहिजे, प्रत्येक बाबतीत तू परफेक्‍ट असलाच पाहिजे. तुझ्या हातून एकही चूक व्हायला नको, तुला जर चांगले मार्कस्‌ मिळाले नाहीत तर आम्हाला समाजात तोंड दाखवायला लाज वाटेल. ही परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची परीक्षा आहे. यात तुझा परफॉर्मन्स्‌ घसरणं किंवा तू अपयशी होणं म्हणजे तुझा व आमचा सत्यानाश. ...अशा वाक्‍याचं, विचारांचं दडपण जर मुलांवर येत असेल तर यामुळेदेखील परीक्षेची तीव्र भीती त्यांच्या मनात निर्माण होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com