‘त्या’ दरवाज्यामुळे टिकला आमचा ५५ वर्षाचा संघर्ष

Feeling of couple towards old door of their home in Karmala
Feeling of couple towards old door of their home in Karmala

सोलापूर : तुझा जन्मही झाला नव्हता. तेव्हा आम्ही रानात राहत होतो. शेतात थोडंफार पिकत होतं पण त्यावर घर चालत नव्हत. लग्न झाल्यापासून ते पाटलाच्या मळ्यातच कामाला होते. तेव्हा आपलं छपराचे घर होते. त्याला दरवाजा कसा करायचा हा प्रश्‍न होता. त्यावर आमच्या जवळ्याच्या दादांनी हा पत्रा दिला होता. तोच दरवाजा आजपर्यंत आम्ही चुलीच्या घराला वापरत होतो. किती दिवस असल्यात राहणार? आता जरा परिस्थिती बरी झाली म्हणून पत्र्याच शेड करतोय... पण या दरवाज्याला नाही विसरलो आम्ही... डोळ्यात पाणी आणत ७० वर्षाची ‘माऊली’ नातवंडासमोर त्यांच्या ३१ वर्षाच्या मुलाला जगण्याचा संघर्ष सांगत होती. यावेळी त्यांचे पतीही उपस्थित होते. आपली पत्नी जुन्या आठवणी मुलांना सांगत आहे, हे निशब्द होऊन ते डोळ्यात पाणी आणून ऐकत होते. एखाद्या चित्रपटाला शोभणारी ही कहाणी आहे बिटरगाव (श्री) (ता. करमाळा) येथील वैजंता मुरुमकर व रामभाऊ मुरुमकर यांच्या जगण्याची!

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. ‘घरातच बसा, बाहेर फिरु नका’, असं आवाहन सरकार करत आहे. त्यात ग्रामीण भाग सुद्धा मागे नाही. जूनमध्ये पावसाळा सुरु होतो. पावसापूर्वी खेड्यात घर, शेतीची कामे करुन घेतली जातात. पावसाळ्यात घर गळू नये म्हणून मेमध्येच घराची दुरुस्ती करतात. काहीजण नवीन घरे बांधतात. ज्यांची जशी परस्थिती आहे. त्याप्रमाणे कामे करुन घेतली जातात. ‘सैराट’ चित्रपटाने बिटरगावचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. बिटरगाव म्हटलं की नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ चित्रपट आठवतो. अनेकांना प्रश्‍न पडतो की हे बिटरगाव असेल कसे. काहीजण पाहण्यासाठी सुद्धा येतात. मुळात करमाळा तालुक्यात दोन बिटरगाव आहेत. एक बिटरगाव (श्री) व दुसरे बिटरगाव (वा) मात्र, सैराटपासून या बिटरगावमध्ये अनेक लोकांनी भेटी दिल्या आहेत. सिना नदीच्या काटावर करमाळ्यापासून १० किलोमीटरवर हे गाव आहे. बिटरगाव (श्री) येथील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. कै. नामदेवराव जगताप यांचे विश्‍वास सहकारी भगवानराव शिंदे यांचे गाव म्हणून या गावाला ओळखले जाते. या गावात पूर्वीपासून पाटील आणि शिंदे यांचा मोठा घराना आहे. अनेकांचे संसार त्या काळात त्यांनी उभे केले. त्यांचे उपकार असल्याचे आजही अनेकजण सांगतात. (यावर स्वतंत्र लेख होईल.) 
वैजंता मुरुमकर म्हणाल्या, माझं लग्न झालं. त्यानंतर काही वर्षानंतर आम्ही शेतात राहण्यास गेलो. गावापासून एक किलोमीटरवर आमची शेती आहे. सीना नदीच्या कडेलाच शेती. शेतीची बांदबंदीस्ती केलेली नव्हती. त्यासाठी खर्च करावा लागणार होता. ते पैसे कोठून आणायचे. घर चालवणे अवघड होते. पती घर चालावं म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करत होते. तेव्हा सालानी जावे लागत होते. त्यातून ज्वारी आणि काही थोडेफर पैसे मिळायचे. पैशापेक्षा वर्षभर खायाला काय मिळेल हे महत्त्वाचे होते. सकाळी गेल्यानंतर ते तिकडेच राहायचे. काही दिवस तर आम्ही तिकडेच राहण्या गेलो. मात्र, पुन्हा आम्ही आपल्याच रानात राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा छप्पर बांधायचे होते. त्याला सुद्धा आवश्‍यक साहित्य नव्हते. मेडी, वासे, तुराट्या, पास्टी हे सगळं दुसऱ्याकडूनच आणले होते. मध्ये तीन लाकडाच्या मोठ्या मेडी, बाजूला आठ लहान मेडी त्यावर आडू, वासे आणि तुराट्या पास्टी टाकून छप्पर तयार केले. त्याच्याबाजूने तुराट्याचा कुड घेतला जात. त्याला बांधायला तार सुद्धा मिळत नव्हती. जुन्या साड्या फाडून बांधले जायचे. त्यातून निवारा केला जात होता. घर कसे तरी व्हायचे पण त्याला दरवाजा कसा करायचा हा प्रश्‍न निर्माण झाला. त्याला काहीच पर्याय नव्हता. अनेकदा तुराट्याचाच कुड केल्याचा सारखा दरवाजा केला जात. पण त्यातून कुत्रे, मांजर येत जात. अनेकदा कुत्र आत गेल्यानंतर भाकरी खाल्या. त्यानंतर आम्हाला उपाशी राहवं लागलं. पुन्हा भाकरी करायला पीठ नसायचं. मांजर तेल सांडायचं. पुन्हा आठ- दहा दिवस तेल आणायला पैसेच नसायचे. असे खूपवेळा झाले. खूपवेळा त्याचा राग यायचा पण काय करणार. दिवसभर काम करायचे आणि रात्री कुत्र्या- मांजराने केलेले वाटोळे पाहून डोळ्यात पाणी यायचे. दरवाजा असावा म्हणून अनेकांना मागितलां पण, त्याला पैसे लागत होते. तेवढा पैसा नव्हता. येथे खाण्याचं अवघड होत. त्यात त्याला कोठून पैसा आणायचा?  पुढे बोलताना त्या म्हणाल्या, माझं माहेर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळ आहे. बिटरगावपासून आठ किलोमीटरवर हे गाव. तेव्हा आम्ही चालत जात. दरवाजाबद्दल मी वडीलांना विचारले. त्यावर त्यांनी पत्रा दिला होता.
त्या पत्र्याला छिद्र पाडून एका बाजूला साखळी लावली. दुसऱ्या बाजूला लाकडाला बसवला. त्यामुळे तो दरवाजा बंद करता येऊ लागला व उघडताही येऊ लागला. आम्ही मोल- मजुरीला जाताना तो दरवाजा लाऊन जात. पुढे अनेकदा छप्पर बदलले पण दरवाजा मात्र तोच आहे. 
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, काही दिवसांनी आम्ही गावात राहायला आलोत. गावात पाण्याच्या टाकी शेजारी जोगी सामाजाच्या घरात आम्ही राहायला होतो. भगवानराव शिंदे यांनीच आम्हाला राहण्यासाठी ती जागा दाखवली. त्यांची पत्राची ती घरं होती. आम्हाला खूप समाधन वाटले तेव्हा. मात्र ते घर घरकुलातील असल्याने खूप छोटं होते. घरातली माणसं त्यात बसत नव्हती. म्हणून पुढे आम्ही एक छोट घर केले होते. त्यालाही तोच पत्रा वापरला. आता आम्ही थोडं चांगल पत्र्याचं शेड उभा केले. त्या घरालाही तोच पत्रा दरवाजा म्हणून लावला आहे. काल आम्ही पुन्हा पत्र्याचे शेड वाढवलं आहे. तेव्हा दुसरे रेडीमेड दोन दरवाजे आणले पण या दरवाजाची आठवणी विसरलो नाहीत. डोळ्यात पाणी आणून दोघे पती- पत्नी आपल्या मुलासह नातवांडाना दरवाजाची आठवण सांगत जीवानाचा संघर्ष सांगत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com