सत्यासाठी, जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढूच! - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
रविवार, 26 मे 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोमाने आणि पूर्ण ताकदीने आम्ही लोकसभा निवडणूक लढलो. प्रचंड मेहनत घेतली. पण, निकाल पाहता कदाचित जनतेची नस ओळखण्यात कमी पडलो, असेच म्हणावे लागले.

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच समविचारी पक्षांच्या मतविभागणीचा फायदा विरोधी पक्षाला मिळू नये म्हणून एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. समविचारी पक्षांशी चर्चा केली. राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, जोगेंद्र कवाडे यांच्यासह विविध छोट्या-मोठ्या अशा छप्पन्नपेक्षा जास्त पक्ष, संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबरही चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवरही चर्चा झाली, त्यांना हवा तसा प्रस्ताव बनवण्यासही सांगितले. जागावाटपावरही चर्चा झाली; पण त्यांच्या मागण्या अवास्तव होत्या. कदाचित त्यांना आमच्याबरोबर यायचेच नव्हते, असे दिसते. वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला फटका बसला हे तर निकालावरून दिसतेच आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोमाने आणि पूर्ण ताकदीने आम्ही लोकसभा निवडणूक लढलो. प्रचंड मेहनत घेतली. पण निकाल पाहता कदाचित जनतेची नस ओळखण्यात कमी पडलो, असेच म्हणावे लागले. पाच वर्षांपासून आम्ही विरोधी पक्षात आहे. या कालावधीत नेहमीच जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला. विधानसभेत आणि सभागृहाबाहेरही आवाज उठवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दूध दराचा प्रश्न, महागाई, जीएसटी, कुपोषण, शिक्षकभरती इतर नोकरभरतीच्या प्रश्नावरही आम्ही सरकारला जाब विचारला. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली. सरकारला अनेकदा सळो की पळो करून सोडले. राज्यातील भाजप सरकार सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीस तयार नव्हते. पण काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले, संघर्ष यात्रेद्वारे राज्य पिंजून काढले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सरकारवर दबाव आला आणि त्यांना कर्जमाफी देण्यास भाग पाडले. हे काँग्रेसच्या संघर्षयात्रेमुळेच शक्‍य झाले. मात्र, सरकारने जनतेचा विश्वासघात केला, फसवणूक केली. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरही आम्ही पुराव्यासह आरोप केले, पण सरकारने त्यांना पाठीशीच घातले. जनतेचे प्रश्न मांडण्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करू आणि सत्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी या पुढेही लढा कायम ठेवू.

(शब्दांकन - संजय मिस्कीन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight for public questions says ashok chavan