चित्रपटातील पात्रांचा वास्तवाशी संबंध असतोच

film
film

मुंबई-पुणे प्रवास... नेहमीप्रमाणे अंधेरीहून व्होल्वो बसने पुण्यासाठी निघालो.  माझ्या सीटवर एकटाच होतो. पुढे बांद्राला एक साधारण 45/47 वर्षांची व्यक्ती बसमध्ये चढली. डोक्‍यावर केस नावाला. म्हणजे "गॉन केस' प्रवास होता. माझ्या बाजूला ती व्यक्ती बसली. बसल्या बसल्या मोबाईलवर कुठला तरी इंग्रजी चित्रपट सुरू. त्यात फोनही सुरू होते. फोनवर जोरात बोलणे आणि हावभाव असे की, मला फोनवर बोलणारी व्यक्ती माहीत आहे असे. तेवढ्यात माझा फोन वाजला आणि बोलण्यावरून त्याने अंदाज बांधला की, मी चित्रपटक्षेत्रात आहे आणि तो माझी फोन ठेवायची वाटच बघत होता. तुम्ही चित्रपटक्षेत्रात आहात का? माझे उत्तर यायच्या आत, मला तुमच्याकडे बघून वाटलेच तुम्ही याच क्षेत्रात असाल, असे म्हणाला. जे मला ओळखतात किंवा ज्यांनी मला बघितले त्यांना दुरूनसुद्धा मी फिल्मवाला वाटत नाही. पण, याने ओळखले आणि सुरू झाला. आजचे चित्रपट, त्यातला रोमान्स, कलाकार वगैरे. मी त्याला थोडं शांत करायला म्हटले, मी फक्त स्टोरी लिहितो. मात्र, माझी आयडिया माझ्यावर उलटली. तो म्हणाला, तुम्ही writer म्हणजे ग्रेट माणसे. अनुभव असल्याशिवाय माणूस लिहूच शकत नाही. वाचन, अनुभव दांडगा लागतो... लेखन ग्रेटचं.. किती वेगवेगळे विषय हाताळता तुम्ही लेखक (मी मनातून सुखावलो) पण, मला काही प्रश्‍न पडतात. आता तुम्ही भेटलाच तर विचारून टाकतो. मी हो-नाही म्हणायच्या आतच तो सुरू झाला. काय हो, तुम्ही फिल्म लिहिता म्हणजे नक्की काय करता? मी उडालोच. काय बोलावे हे कळलं नाही. तसे काही उत्तर द्यायच्या आत त्याचा दुसरा प्रश्‍न... म्हणजे तुम्हाला नक्की सुचतं कसं कथानक? नुसतं सुचत नाही; पण तुम्ही सविस्तर अगदी बारकाईने लिखाण करता. खरंच ग्रेट... मी परत काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात त्याची प्रश्‍नावली सुरू. तुम्ही ते रोमान्सवाले सीन कसे लिहिता? मी गमतीने म्हणालो, अनुभवाने लिहिता येतं... त्यावर हसला आणि म्हणाला, बेडरूम सीन पण मस्त असतात- काय? वेगवेगळा प्रकार असतो त्या रोमान्समध्ये... व्वा... व्वा... अनुभव ना? म्हणत स्वत:च जोरात हसला... आणि म्हणाला, या इंग्लिश writer ची पण कमाल असते. काय बेडसीन लिहितात. मी एकदम चूप... तसा त्यांना अनुभव असतो अशा गोष्टीत... एकदम दांडगा... त्यांची संस्कृती तशीच ना... पण, काय हो, तुम्ही ते बलात्काराचे सीन कसे लिहिता... प्रेमाचे सीन एकवेळ लिहिणे सोपे; पण बलात्काराचे... कठीण. मी त्याला इथेच अडवत म्हणालो, बलात्काराचे प्रसंग कठीणच असतात. माझा विनोद त्याला कळला नाही. तो म्हणाला, हो ना बलात्कार कसा करायचा, हे लिहिणं कठीण अनुभव. मी रागाने बघितले, तर म्हणाला, म्हणजे याचा अनुभव नसताना असे लिहिणे. मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, सिनेमात ते प्रसंग एक मिनिटाचे असतात. ती मुख्य कथा नसते. तो लगेच म्हणाला, ते तर आहेच. पण, तुमी व्हिलनचे रूप खरे दाखवता. काय असतात व्हिलन. त्यांचा गेट-अप, क्रूरता... एकदम मस्तच. मी त्याच्या या एकदम मस्तच या वाक्‍यावर उडालोच. याला नक्की काय म्हणायचं हे कळलं नाही... पण, एकंदरीत चित्रपटाची कथा म्हणजे रोमान्स, बलात्कार आणि व्हिलन एवढेच याला कळले. किंवा त्याला तेवढेच कळून घ्यायचं होतं, हे जाणवलं.
एकंदरीत त्याची विचारसरणी किंवा मानसिकता ही थोडी विकृत, निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त दिसली आणि सध्या समाजात याचच प्रतिबिंब दिसतंय. या वाईट गोष्टी म्हणजेच चित्रपटाची कथा नसते. पण, बघणारा प्रेक्षक या मानसिकतेतून चित्रपटाकडे बघतो, हे ठरवता येत नाही. त्याचाच परिणाम समाजावर होत असतो. त्या व्यक्तीची मानसिकता हे दर्शवत होती. पण, तो स्वत:ला सभ्य समजत होता म्हणून त्याच्या हातून काही वाईट कृत्य घडेल, असे वाटले नाही. पण, ज्यांचा स्वत:वर जर ताबा नसेल आणि विकृती बळावली, तर हिंगणघाटसारखे, निर्भयासारखे प्रकार समाजात घडतात आणि परत अशा घटनांवर चित्रपट येतात. कथा तशा लिहिल्या जातात. वर्तुळ पूर्ण होत जातं. खरे तर चित्रपट कथा किंवा तत्सम लिखाण लिहिताना लेखक समाजात घडणाऱ्या सगळ्या घटना बघत असतो. नजरेने अनुभवत असतो आणि त्या नजरेने अनुभवलेल्या अनुभवाने तो लिखाण करता असतो. त्यासाठी त्याला स्वत:च्या अनुभवाची गरज नसते. लेखकाला तो लिहिणाऱ्या प्रत्येक घटनांचा, पात्रांचा, प्रसंगांचा अनुभव नसतो आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातला प्रत्येक अनुभव ही कथा ठरू शकत नाही. कथा-पटकथा लिहिताना लेखकाचा समाजात घडणाऱ्या गोष्टींचा अनुभव पाठीशी असतो. त्याचा प्रत्येक अनुभव ही कथा ठरू शकत नाही. कथा-पटकथा लिहिताना लेखकाच्या पाठीशी समाजात घडणाऱ्या गोष्टींचा अनुभव असतो. त्याची सामाजिक जाणीव आणि मेंदू लिहिताना रसद पुरवत असतात. प्रत्येकात म्हणजे पृथ्वीवरच्या प्रत्येक मानव शरीरात एक व्हिलन, एक विकृतपणा दडला असतो. तसाच सद्‌गुणाचा राम पण असतो. फक्‍त स्वत:वर नियंत्रण नसले की, माणूस नराधम होतो. लेखक हेच हेरून कथा लिहितो. चांगल्या-वाईटाचा मेळ घालतो आणि एक कथा तयार करतो. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा पडद्यावर एकदम सुरुवातीला लिहून येतं की, "या चित्रपटातील पात्रांचा वास्तवाशी संबंध नाही. हा कल्पनाविलास आहे. संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.' यातली शेवटची ओळच महत्त्वाची असते. तो संबंध असतोच असतो. निव्वळ योगायोग नसतो. हुशार प्रेक्षक ते बरोबर ओळखतात आणि कलेला, चित्रपटाला दाद देतात. हेच कथेचं खरं यश असतं आणि हीच खरी कथेची स्टोरी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com