esakal | चाळीसच्या दशकातील हिरोचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

ashok-kumar_

कुंदनलाल सहगल हा तसा पहिला गायक-नायक म्हणता येईल आणि त्याला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी स्टार केले. त्याचा आवाज भुरळ घालणारा होता. कुंदनलाल सहगल यांनी आपल्या गाण्याने वेड लावले होते. त्यांचे करिअर तसेच खूप छोटे होते. कारण वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे मुख्य कारण होते दारूचे अतिसेवन.

चाळीसच्या दशकातील हिरोचा प्रवास

sakal_logo
By
आशीष उबाळे

आपल्या चित्रपटातल्या हिरोचा प्रवास सुरू आहे. आता आपण ४० च्या दशकातील हिरोंचा प्रवास बघू या. ‘आलमआरा‘नंतर चित्रपटाचे स्वरूप बदलले. चित्रपटाला आवाज आला आणि प्रेक्षकांमध्ये या कलेविषयी उत्सुकता वाढू लागली. नायक नायिका प्रेक्षकांचे आकर्षण झाले आणि मग इथून तसा नायक ते हिरो हा प्रवास सुरू झाला.

कुंदनलाल सहगल हा तसा पहिला गायक-नायक म्हणता येईल आणि त्याला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी स्टार केले. त्याचा आवाज भुरळ घालणारा होता. कुंदनलाल सहगल यांनी आपल्या गाण्याने वेड लावले होते. त्यांचे करिअर तसेच खूप छोटे होते. कारण वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे मुख्य कारण होते दारूचे अतिसेवन.

त्यानंतर खरा पॉप्युलर म्हणता येईल असा चेहरा झाला तो अशोक कुमार यांचा...आपले दादामुनी. खरं तर त्यांच्या करिअरची सुरुवात चित्रपटाच्या लॅबमधील एक कामगार म्हणून झाली. अशोक कुमारांच्या वडिलांची इच्छा होती की यांनी वकील व्हावे. पण अशोक कुमारांना वकील व्हायचे नव्हते म्हणून ते मुंबईला आपल्या बहिणीकडे आले. खरे तर ते लॉच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले म्हणून मुंबईला आले. त्यांच्या बहिणीचे पती शशधर मुखर्जी तेव्हाच्या बॉम्बे टॉकिजमध्ये वरिष्ठ पदावर होते. अशोक कुमारांनी त्यांना काही काम मिळाले तर माझा खर्च मी काढू शकेन असे सुचवले. शशधर मुखर्जी यांनी लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला लावले.

अशोक कुमार त्या कामात रमले आणि अचानक त्यांच्या आयुष्याने वळण घेतले. १९३६ साली बॉम्बे टॉकिज ‘जीवन नग्मा‘ नावाचा चित्रपट तयार करत होते. त्यात देवीका राणी आणि नज्म उल हसन ही नायक नायिकांची जोडी होती. काही कारणाने त्यांच्यात वाद झाला.हे प्रकरण बॉम्बे टॉकिजचे मालक आणि देवीका राणीचे पती हिमांशू राय यांच्याकडे गेले. त्यांनी हसनला सिनेमातून काढून टाकले आणि अशोक कुमारला काम करायला सांगितले.

त्यावेळी देवीका राणी स्टार नायिका होती आणि अशोक कुमार पदार्पण करणारे. अशोक कुमारांसाठी हा सुखद धक्का होता. हा चित्रपट दिग्दर्शक फ्रान्झ ओस्टेन यांचा विरोध डावलून झाला. मोठे बॅनर, मोठे प्रॉडक्‍शन हाउस जे म्हणतील तसे याला तेव्हाच सुरुवात झाली होती असे म्हणायला हरकत नाही. इथून अशोक कुमारांचा चित्रपटात हिरो म्हणून प्रवेश झाला. चित्रपट बऱ्यापैकी चालला. त्यानंतरचा त्यांचा ‘अछुत कन्या‘ हा चित्रपट आला देवीका राणी सोबतच. हा चित्रपट खूप गाजला. मग अशोक कुमार-देवीका राणी ही जोडी हिट झाली. या दोघांनी एकत्र १२ की १५ चित्रपटांमध्ये काम केले. अशोक कुमार लोकप्रिय होत गेले. या लोकप्रियतेचा कळस झाला तेव्हा त्यांचा ‘किस्मत' चित्रपट १९४३ साली आला.

या चित्रपटाने तेव्‍हा एक करोड मिळवले. तुम्ही विचार करू शकता तेव्‍हाचे एक करोड आत्ताचे किती आणि अशोक कुमार यांची लोकप्रियता किती वाढली असेल. असे म्हणतात की तेव्‍हा अशोक कुमार चुकून रस्‍त्‍यावर उभे दिसले किंवा ते आले असे कळले की लोक प्रचंड गर्दी करायचे. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना बऱ्याच वेळेला लाठीमार करावा लागला. त्यांना खऱ्या अर्थाने पहिला सुपरस्‍टार म्हणता येईल.

म्हणजे कुंदनलाल सहगलची लोकप्रियता मोठी होतीच. पण लाठीमारपर्यंतचा प्रकार अशोक कुमार यांच्यापासून सुरू झाला. अशोक कुमार हा एक सामान्‍य चेहरा होता नायकाचा. दिसायला चांगले होते. सामान्‍य प्रेक्षकांना अशोक कुमार हे आपल्यातले वाटले. पहिल्‍या चित्रपटापासून त्यांची लोकप्रियता वाढीस लागली ती शेवटपर्यंत कायम होती. अशोक कुमार ते दादामुनी हा प्रवास बघितला तर अशोक कुमार हे आपल्याच घरचे आजोबा काका, वाटायचे. हे खरे यश म्हणता येईल.

‘अछूत' कन्‍या सारखा चित्रपट जाती भेदावर आधारित प्रेम कथाच म्हणता येईन. अशोक कुमार एक ब्राम्हण नायक -प्रताप आणि देवीका राणी दलित कस्‍तुरी. बालपणीचे मित्र. नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. समाज या प्रेमाला मान्यता देत नाही. मग दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होतात. शेवटी कस्‍तुरी प्रतापला वाचवण्यासाठी स्‍वतःचा जीव देते. साधारण कथा अशीच आहे. या कथेत त्यावेळेच्या समाजाचे चित्रणच रंगवले आहे. तेव्‍हा दलित, ब्राह्मण हा वाद विकोपाला गेला होता. हा चित्रपट खूप गाजला कारण प्रेक्षकांच्या मनातला विषय होता. प्रेम करणारी व्‍यक्ती ही कुठल्‍या जातीची आहे हे न बघता दोघांच्या प्रेमाचा आदर करावा हीच भावना चित्रपटात होती. आजही वरकरणी पुरोगामी दिसणारा आणि स्‍वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष समजणारा समाज पूर्णपणे बदलला नाही. जाती भेदाची पाळेमुळे अजून आहेच.
किंबहुना सध्या तर छोटे छोटे समूह तयार झाले आहेत. जाती पोटजातीचे आणि ते स्‍वयंभू रक्षक आहेत. आपल्या जातीचे आणि मग एखादा चित्रपटाची कथा त्यांना आवडली नाही किंवा त्यांच्या बुद्धीला वाटले की हा आपल्या जातीचा, समाजाचा अपमान आहे. मग सुरू होत आंदोलन. ‘अछुत कन्या‘ हा चित्रपट साधारण, १९३६, १९३७ च्‍या आसपासचा. आज २०२० मध्येही स्थिती फारशी बदलली नाही. चित्रपट हा समाजाचा चेहरा असतो. तो लोकांना बघायला आवडतो पण बदल करायला नाही. ही खंत आहे. शोकांतिका आहे.
 

loading image