

Finding Happiness
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
किती साधीशीच गोष्ट होती, पण किती आनंद झाला होता तिला! आनंद मिळवायचा असेल तर कशातूनही मिळतो, आणि नसेल मिळवायचा तर मग तो कशातूनही मिळत नाही म्हणजे नाही, असा काहीतरी विचार माझ्या डोक्यात चमकून गेला.
माझी मुलगी सहा वर्षांची असतानाची गोष्ट. कधीकधी हरवून आणि हरून गेल्यासारखं वाटतं. आपण आयुष्यात जे काही करत असतो, ते योग्य आहे ना? ते आपण का करतो आहोत? त्याने आपल्याला काय मिळणार आहे? पुढे आपलं काय होणार? असे बेसिक प्रश्न पडू लागतात आणि या प्रश्नांच्या कोलाहलात मन पुरतं भंडावून जातं. मी अशाच काहीशा फेजमध्ये होतो तेव्हा. जरा मोकळ्या हवेत जाऊ या, बरं वाटेल असा विचार करून मुलीला घेऊन जवळच्याच बागेत गेलो. एका बाजूला हिरवळ असलेली मध्यम आकाराची खेळायची जागा. एका बाजूला कारंजं, छोटंसं तळं आणि त्याला लागूनच जंगल जिम, झोपाळे, घसरगुंड्या इत्यादी खेळांची जागा. चालायला किंवा जॉगिंग करायला वर्तुळाकृती ट्रॅक.
मी काहीशा विमनस्क मनोवस्थेत बागेतल्या एका बाकड्यावर जाऊन बसलो. समोर मुलगी खेळत होती. बॉल टाकत होती. पळत होती. माझ्या मनात पुन्हा तेच विचार... काय चालूये आपलं? योग्य ट्रॅकवर आहोत का आपण... मी तिच्याकडे पाहत होतो, पण खरंतर मला ती दिसत नव्हती. मी माझ्या विचारांत हरवून गेलो होतो. काही मिनिटं झाली असतील नसतील, तिच्या स्पर्शाने माझी तंद्री भंगली.