esakal | माडिया समाजातील पहिले वकील लालसू नागोटी
sakal

बोलून बातमी शोधा

lalasu.

जनतेचा आणि ग्रामसभेचा उमेदवार म्हणून लालसू जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला. भारतातील अशी पहिलीच निवडणूक असेल जेथे कुठल्याही पार्टी शिवाय आणि जनतेने उभे केलेले उमेदवार निवडून आलेत. याच काळात जनतेने व ग्रामसभेने निवडलेले काही उमेदवार पंचायत समितीवर निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आदिवासींची अस्मिता आणि अस्तिव यावर लालसूने काम सुरु केले.

माडिया समाजातील पहिले वकील लालसू नागोटी

sakal_logo
By
अनिकेत आमटे संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा जुवी गावातील रहिवासी असलेले लालसू सोमा नोगोटी हे माडिया अति-असुरक्षित समाजातील पहिले वकील आहेत. लालसूचा जन्म १९७८ चा. वडील जन्मापूर्वीच वारले. आईने जन्म दिला पण नंतर दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या गावाला राहायला निघून गेली. छोट्या लालसूला जुवी गावात त्याच्या इतर नातेवाइकांनी वाढवले. ज्यांच्या घरी राहत असे त्यांच्या शेतात पाखरे हाकलण्याचे काम किंवा गुरं चरायला नेण्याची कामे केली. कामे करूनही पोटभर जेवण मिळत नव्हते. त्याच्या सोबत त्याचा भाऊ आणि लहान बहीण राहायची.

वयाच्या ६-७ व्या वर्षी गावकऱ्यांनी त्याला डॉ. प्रकाश आमटे यांची कर्मभूमी असलेल्या हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेत आणून सोडले. लालसूने शिकावे म्हणून नाही तर त्याला शाळेत चांगले जेवण मिळेल म्हणून. पण लालसूने संधीचे सोने केले. त्याने मन लावून अभ्यास केला. बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने लोक बिरादरी आश्रमशाळेत घेतले. दहावीमध्ये त्याचा शाळेत दुसरा नंबर आला. पुढे त्याला प्रकाश आमटे यांनी आनंदवनला आनंद निकेतन कॉलेजमध्ये शिकायला पाठवले. आनंदवनमध्ये त्याची राहण्याची सोय झाली.

अकरावी, बारावी आणि BA प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण त्याने आनंदनिकेतन महाविद्यालयात पूर्ण केले. एकदा आनंदवनमध्ये पुण्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. धैर्यशील शिरोळे आले होते. तेव्हा डॉ. भारती विकास आमटे यांनी लालसूची ओळख त्यांच्याशी करून दिली. शिरोळे काकांच्या मदतीने पुढे लालसूला पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तसेच विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये राहायची सोय झाली. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये राहत असताना त्यांच्या नियमाप्रमाणे काम करावे लागत होते. कामाचा थोडाफार मोबदला त्याला मिळत असे. त्यातून त्याचा खर्च निघत असे. पुण्याचे आगाशे काकांनी लालसूला बरीच मदत केली. लालसूला श्रमदानाची सवय शाळेपासूनच होती. आनंदवनमध्ये श्रमदान करायला जावे लागत असे. त्यामुळे विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये राहणे आणि शिक्षण घेणे त्याला सोपे गेले.

आदिवासी बांधवांचे जीवन खडतर आहे. हा भाग संवेदनशील आहे. आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे म्हणून लढणारे वकील अगदीच कमी आहेत. म्हणून पदवी मिळविल्यावर लालसूने पुढे पुणे येथेच ILS law कॉलेज मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. काही महिने नागपूरमध्ये प्रॅक्टिस केली. तिथे मन लागले नाही. मग भामरागडला राहण्याचा निर्णय घेतला. पुढे आदिवासी गावातील ग्रामसभा सक्षम करण्यासाठी असणारा पेसा कायदा, जंगलावरील आदिवासींची मालकी सिद्ध करणारा वनहक्क कायदा, संयुक्त वन व्यवस्थापन कायदा या सर्वांची माहिती त्याने विविध संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून मिळवली. या सगळ्या कायद्यांचा अभ्यास केला आणि सातत्याने गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे काम सुरू केले.

मातृभाषा माडिया असल्याने उत्तम प्रकारे तो गावकऱ्यांना मार्गदर्शन करतो. दरम्यान २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. पेसा कायद्यामुळे आदिवासींमधील पारंपरिक पंचायत व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले होते. अशावेळी भामरागड इलाका पारंपरिक गोटुल समितीच्यावतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले.

गावाचे जल जंगल जमीन या वरील हक्कांचे संरक्षण, अन्याय-अत्याचार विरुद्ध आवाज आणि बेकायदेशीर खाणकामाला विरोध या तीन मुद्यांवर आदिवासींचा आवाज मंत्रालयपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. ग्रामसभांनी मिळून लालसूला उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत उभे केले. निवडणुकीसाठी लागणारा खर्च अगदीच कमी होता. जनतेने प्रत्येक घरातून एक मूठ तांदूळ आणि दहा रुपये जमा करून निवडणुकीचा खर्च केला.

जनतेचा आणि ग्रामसभेचा उमेदवार म्हणून लालसू जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला. भारतातील अशी पहिलीच निवडणूक असेल जेथे कुठल्याही पार्टी शिवाय आणि जनतेने उभे केलेले उमेदवार निवडून आलेत. याच काळात जनतेने व ग्रामसभेने निवडलेले काही उमेदवार पंचायत समितीवर निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आदिवासींची अस्मिता आणि अस्तिव यावर लालसूने काम सुरु केले.

गावातील गोटुल समितीच्या माध्यमातून सामूहिक निर्णय प्रक्रिया व लोकशाही संवाद प्रक्रिया बळकट व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. मतदार क्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांमध्ये जाणे आणि तेथे सभा घेऊन तेथील समस्या ऐकून त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडणे व तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करणे अशी कामे सुरू आहेत. त्याच्या प्रयत्नाने काही ठिकाणी आरोग्य केंद्रे सुरू झालीत. काहींना विहिरी बांधून मिळाल्या. स्थलांतरित शेती करणाऱ्या बांधवाना कृषी विभागाच्या योजना मिळवून दिल्या.

लालसूच्या मार्गदर्शनात तेंदूपत्ता संकलनात ग्रामसभेने मोठ्या प्रमाणात तेंदूची विक्री केली. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना लालसूने पुण्याला शिक्षणासाठी पाठविले आहे. चांगले मार्क मिळालेले आदिवासी विद्यार्थी असतील तर दहावी, बारावीनंतर पुण्याच्या विविध कॉलेजला प्रवेश मिळविण्यासाठी तो प्रयत्न करतो. राहण्याची सोय निःशुल्क व्हावी म्हणून आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून त्याचे प्रयत्न सुरू असतात. त्याच्या प्रयत्नाने अनेक आदिवासी बांधव चांगल्या कॉलेजमधून पदवीधर झालेत. अनेकांना नोकऱ्या मिळाल्या.


माडिया समाजातील असूनही लालसूचे मराठीवर चांगले प्रभुत्व आहे. तो चांगला लीडर आणि उत्तम वक्ता आहे. त्याचा जनसंपर्क खूप मोठा आहे. समाज माध्यमाचा उपयोग करून त्याचे स्वतःचे काम आणि आदिवासींचे जीवन सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा उत्तम प्रयत्न तो करीत असतो. त्याच्या या यशात अनेक आदिवासी बांधवांचे व शहरातील मित्रांचे तसेच पांढरकवडा येथील सृजन संस्थेचे अजय व योगिनी डोळके यांचे पण योगदान आहे.

लालसूला Diplomacy Training of Indigenous People’s Human Rights and advocacy programme for indigenous, conducted by University of New South Wales, Australis and Human Rights Commission of Philippines in Baggio city Philippines in २०११ आणि Participated in Geneva based training programme by United Nations on International Human Rights Mechanism and Indigenous issues from १९ June to १४ July २०१७ या दोन ठिकाणी आयोजित परिषदांसाठी परदेशात जाता आले. अनेक ठिकाणचे पुरस्कार त्याला मिळाले आहेत.


लालसूचे लग्न या भागातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. मालू बोगामी यांच्या उज्ज्वला या मुलीशी झाले. उज्ज्वला एक उत्तम जिल्हा परिषद शिक्षिका आहे. त्यांना एक नील नावाचा गुणी मुलगा आहे. तो सध्या दहाव्या वर्गात नवोदय विद्यालयामध्ये शिकत आहे. लालसूकडून आदिवासी जनतेची खूप अपेक्षा आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता भविष्यात त्याने अजून चांगले काम करावे म्हणून त्याला खूप शुभेच्छा.