लग्नाआधीची ती एक भेट...

अभिनव ब. बसवर
रविवार, 15 सप्टेंबर 2019

लग्नासाठी स्थळ पाहिल्यानंतर त्यानं मुलीसोबत बाहेर भेट व्हावी, असं घरच्यांना सुचवलं. जेणेकरून एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज येईल. मुलीकडच्यांनी अडखळत सहमती दाखवली.

लग्नासाठी स्थळ पाहिल्यानंतर त्यानं मुलीसोबत बाहेर भेट व्हावी, असं घरच्यांना सुचवलं. जेणेकरून एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज येईल. मुलीकडच्यांनी अडखळत सहमती दाखवली. मुलीनं इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेलं. तोही इंजिनियर होता. त्याला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागल्यापासून लग्नासाठी स्थळे येऊ लागलेली. काहीजण तर मुलीचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच साखरपुडा करून टाकूयात, अशी गळ घालायचे. त्याला या सगळ्याची उबग आलेली. एकमेकांना थोडंसुद्धा न ओळखता फक्त एखाद्याची नोकरी बघून आई-वडील कसं काय मुलीचं लग्न लावून देण्यासाठी उतावीळ होतात, म्हणून कधी आश्चर्य वाटायचं तर कधी राग यायचा. 

ठरल्याप्रमाणं तो मुलीला भेटला. बोलण्याची सुरवात थोडी अडखळत झाली. त्याने विचारले, 

‘तू इंजिनियरिंग केलं, मग जॉब का नाही केला’

ती म्हणाली, ‘सहा महिने ट्राय केलं. पण मनासारखा जॉब नाही मिळाला.’ 

‘मनासारखा म्हणजे?’ त्याने चहाचा घोट घेत विचारलं.   

‘मनासारखा म्हणजे चांगला पगार असणारा. सगळ्या ऑफर्स दहा-पंधरा हजारांच्या होत्या. मग घरचे म्हणाले, अजून दोन महिने ट्राय कर, नाहीच झालं तर लग्नासाठी स्थळं बघूयात.’ 

‘तुझ्या मनासारखी नोकरी मिळाली असती तर काय केलं असतं?’ त्याने तिच्या डोळ्यांत डोळे घालून विचारलं.

‘काही नाही एखादं वर्ष जॉब केला असता आणि मग लग्न वगैरे केलं असतं.’ 

‘नवऱ्याबद्दलच्या तुझ्या अपेक्षा काय आहेत?’ 

‘काळजी घेणारा असावा. प्रेम करणारा, समजूतदार असावा...’ 

‘बस्स एवढंच? आपल्या होणाऱ्या बायकोवर बहुतांश मुलं प्रेम करतातच, काळजी घेतात. मग माझं स्थळ निवडावं असं का वाटलं?’ ती अडखळली, तिच्याकडे उत्तर नव्हतं. तो पुढे म्हणाला, ‘मी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करतो हे कारण आहे का?’ 

‘ते एक कारण आहेच, कारण शेवटी भविष्याची सुरक्षिततादेखील महत्त्वाची.’ तिने चहाचा घोट घेतला.  

‘समजा मी उद्या ही नोकरी सोडून दिली किंवा काही कारणास्तव मला ती सोडावी लागली तर, काही काळ तू घराचा आर्थिक भार सांभाळू शकशील?’ तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली,  ‘असं कसं होऊ शकेल? नोकरी सोडली तर कुटुंब कसं चालवणार?’ 

‘काहीही होऊ शकतं. एकसाथ अनेकजणांना नोकरीवरून कमी केलं जाऊ शकतं. कंपनी आर्थिक संकटात असेल किंवा मंदी असेल तर नोकरदार कमी केले जाऊ शकतात. आज ते परदेशी वगैरे पाठवतायत ते त्यांच्या फायद्यासाठी. आपल्या लोकांना परदेशी गेल्याच कुतूहल वाटतं. पण, उद्या तीच कंपनी टाटा-बायबाय करेन तेव्हा काय? तुझे वडील म्हणताहेत त्याप्रमाणे घर बुक करण्यात मला काहीच अडचण नाही. माझा आत्ताचा पगार पाहून प्रशस्त फ्लॅट घेण्यासाठी कोणतीही बँक मला आनंदाने कर्ज देईन. पण उद्या आर्थिक संकट आलं तर ते घराचे हफ्ते कोण फेडणार?’

तिला यातलं काहीच रुचलं नाही. अगदीच फिलॉसॉफिकल किंवा निगेटिव्ह वाटलं. ‘तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का? कमवणारी बायको हवीये का? कमवणारी बायको घरात जेवण वगैरे बनवण्यात लक्ष देत नाही किंवा बाकी तितकं काहीच करत नाही. ते चालणार आहे का?’ तिने थेट प्रश्न विचारले. 

‘एकतर मी सहा वर्षे शिक्षणासाठी बाहेर राहिलो. तिथे कधी मेसला जेवायचो तर कधी रूमवर बनवून खायचो किंवा अगदीच कंटाळा आला तर बाहेर जेवायला जायचो. बायको मला स्वयंपाक किंवा धुणीभांडी करण्यासाठी नकोय. दोघांचं असं किती करावं लागणार. दोघांनी कामे वाटून घेतली की झालं! बायकोने आर्थिक गरजांसाठी माझ्यावर अवलंबून असावं असं मला नाही वाटत. आमच्यात भावनिक बंध असावेत. व्यवहारावर नाती जोडली तर फार काळ त्यात मन रमत नाही. तू तुझी भविष्याची सुरक्षितता माझ्यात पाहणार आणि मी तुझं सौंदर्य, याला काहीच अर्थ नाही. भविष्याची सुरक्षितता वगैरे तू म्हणाली ती कुठल्याच नोकरीत नसते. आयुष्य इतकं प्रेडिक्टेबल थोडीच आहे की, एक नोकरी पकडली आणि आयुष्याची गाडी कायमची मार्गाला लागली. सौंदर्यदेखील कुठे कायम टिकतं किंवा ते रोजच पाहण्यात आलं तर सौंदर्याचं मोलदेखील फिकंच पडतं. मला खंबीर जोडीदार हवा आहे, जो वेळप्रसंगी खांद्याला खांदा लावून उभा राहील. त्यासाठी त्या व्यक्तीची आयुष्याबद्दल काही विचारसरणी असावी. माणूस ठरवलं तर महिना पंधरा हजारांतपण आनंदी राहू शकतो आणि दीड लाखातदेखील. त्यासाठी गरजांवर नियंत्रण लागतं. गरजा वाढतच जाणार असतील आणि अपेक्षांना अंत नसेल तर महिना दीड लाखदेखील कमी पडणार आणि उद्या काही कारणास्तव पैशाचा ओघ थांबला तर माणूस अस्वस्थ होणार. चिडचिड करणार. नात्यातील निष्ठा कमजोर होणार.’

‘म्हणजे मला आयता खाऊ घालणारा नवरा हवा आहे, असं म्हणायचं आहे तुम्हाला? प्रेम, प्रेम असतं ओ, त्यात इतका कोणी विचार करत नसतं. लहानपणापासून माझ्या वडिलांनी माझी प्रत्येक आवड जपलीच की. भारतात अनेक ठिकाणी ट्रिपला गेलो. कपडे, शाळा, कॉलेज फी कधीच नाही म्हणाले नाहीत ते. सगळं काही त्यांनी आनंदाने केलं. का? कारण त्यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रेम होतं.’ आपण जे काही बोललो ते तिच्यापर्यंत पोचलं नाही किंवा तिने त्याचा भलताच अर्थ काढला हे त्याच्या लक्षात आलं. ठीक आहे, आपले विचार वेगळे आहेत म्हणून त्याने विषय थांबवला आणि दोघे रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. ती तिच्या घराच्या दिशेने आणि तो त्याच्या. जाताना तो एकच विचार करत होता, की कदाचित ती तिच्याजागी बरोबर असेल. लहानपणापासून ती ज्या वातावरणात वाढली, जे अनुभव तिच्या वाटेला आले त्यातून माणूस म्हणून तिची काही मते तयार झाली आहेत आणि तसंच माझंही. आमची मते, विचार जुळले नाहीत. दोघेही आम्ही आमच्या मतांबद्दल आग्रही आणि ठाम होतो. किती बरे झाले, की लग्नाआधी आम्ही भेटलो. कोणताही विचार न करता लग्नाला होकार दिला असता तर नव्याची नवलाई ओसरल्यानंतर वाद झाले असते आणि एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादून आम्ही आयुष्याचा हिरमोड करून घेतला असता...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First meeting before the wedding