
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
प्राण्यांच्या कथा असणारे ॲनिमेशनपट म्हटलं, की बरेच चित्रपट डोळ्यासमोर येतात; मात्र यातील बहुतांशी चित्रपटांमध्ये आढळणारा एक गुणधर्म म्हणजे अँथ्रोपोमॉर्फिजम. मानवेतर सजीवांनीदेखील माणसांप्रमाणे वागण्या-बोलण्याची पद्धत म्हणजे अँथ्रोपोमॉर्फिजम. विशेषतः, अमेरिकन चित्रपटसृष्टीत २००२पासून बनत असलेले ‘आइस एज’ मालिकेतील चित्रपट, ‘रॅटटुई’ (२००७), २०१६पासून सुरू असलेली ‘झूटोपिया’ फ्रँचाइझ इत्यादी उदाहरणे देता येतील. गिन्ट्स झिलबलॉडिस या लाट्वियन दिग्दर्शकाचा ‘फ्लो’ (२०२४) मात्र अजिबातच अशा पद्धतीचा अवलंब करीत नाही. येथील प्राणी माणसांसारखे न वागता-बोलता प्राण्यांसारखेच वागतात. त्या-त्या प्रजातींची वैशिष्ट्ये, आपसातील संवाद असं सारं काही नेमकेपणाने येतं.