महिलांमध्ये फुटबॉल लोकप्रिय

युरोप, अमेरिका या देशांमध्ये पुरुषांप्रमाणंच महिला फुटबॉलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
football Popular in women
football Popular in womensakal

- हेन्‍री मेनेझीस, henryymenezes@gmail.com

युरोप, अमेरिका या देशांमध्ये पुरुषांप्रमाणंच महिला फुटबॉलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. भारतामध्ये पुरुषांच्या फुटबॉलची क्रेझ आधीपासूनच होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये महिला फुटबॉलही प्रगतिपथावर आरूढ होत आहे. यंदा तर महिला खेळाडूंच्या नोंदणीत १३८ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.

या वर्षी मार्च महिन्यांपर्यंतच्या आकडेवारीनुसार २७ हजार ९३६ महिला खेळाडूंनी नोंदणी केली आहे. २०२२ मधील जून महिन्यात ही आकडेवारी ११ हजार ७२४ इतकी होती. यावरूनच भारतात महिला खेळाडूंचा ओढा फुटबॉल या खेळाकडं वाढू लागला आहे, हे प्रकर्षानं दिसून येत आहे.

महिला खेळाडूंची पावलं फुटबॉल या खेळाकडं वळण्याची दोन मुख्य कारणं आहेत. भारतामध्ये दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. ‘फिफा’ या जागतिक फुटबॉल संस्थेकडून १७ वर्षांखालील मुलांचा विश्‍वकरंडक व १७ वर्षांखालील मुलींचा विश्‍वकरंडक या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजनाचा मान भारताला देण्यात आला.

या स्पर्धा आयोजनानंतर सगळं गणितच बदललं. मुलांचा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक २०१७ मध्ये, तर मुलींचा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक २०२२ मध्ये पार पडला. या मानाच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही भारताचं प्रतिनिधित्व केलं. अनिकेत जाधव मुलांच्या संघामधून खेळला, तर काजोल डीसोझा मुलींच्या संघामधून खेळली.

केंद्रीय क्रीडा मंत्रालय, ऑलिंपिक संघटना, राज्य संघटना व अखिल भारतीय फुटबॉल संघटना यांनी १७ वर्षांखालील दोन्ही विश्‍वकरंडकाच्या यशस्वी आयोजनासाठी कंबर कसली. जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये या स्पर्धांचा प्रसार व प्रचार करण्यात आला.

१७ वर्षांखालील महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्तानं पश्‍चिमेपासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत महिला खेळाडूंचा शोध घेण्यात आला. भारतामध्ये विविध वयोगटांतील स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे आपसूकच भारतातील युवा मुलींची पावले फुटबॉल या खेळाकडे वळू लागली.

भारतीय पुरुषांपेक्षा महिला संघ फिफा क्रमवारीत प्रगती करताना दिसत आहे. भारतीय पुरुष संघ सध्या १२१ व्या स्थानावर आहे. मात्र भारतीय महिला संघ ६६ व्या स्थानावर आहे. एवढेच नव्हे तर आशिया खंडातील क्रमवारीवर लक्ष देता भारतीय महिला संघ १३ व्या स्थानावर आहे. ही खरोखरच उल्लेखनीय अशी बाब आहे.

आशियाई स्पर्धेचा थरार

दोन विश्‍वकरंडकांच्या आयोजनानंतर भारतामध्ये एएफसी आशियाई करंडकाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ही स्पर्धा महाराष्ट्रातील तीन स्टेडियम्समध्ये खेळवण्यात आली. मुंबईतील फुटबॉल अरीना, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील व पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धेच्या लढती पार पडल्या. कोरोना महासाथीच्या काळातही महिला स्पर्धेचं यशस्वी आयोजन भारतीयांनी करून दाखवलं. पण भारतीय संघातील बहुतांशी खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे यजमान संघाला यामधून माघार घ्यावी लागली. मात्र या स्पर्धेनं भारतात महिला फुटबॉलची क्रेझ निर्माण केली.

प्रशिक्षण व सुविधा

भारतामध्ये जवळपास पाच ते सहा हजार प्रशिक्षक उपलब्ध आहेत. देशभर अकादमी चालवण्यात येत आहेत. या अकादमींमध्ये महिला खेळाडूंसाठी सुविधा पुरवण्यात येत आहेत. महिला खेळाडूंच्या दृष्टिने ड्रेसिंग रूम, चेजिंग रूम यांसारख्या सुविधा आवश्‍यक असतात. अकादमीत याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

चार जणींची झेप

बाला देवी, अदिती चौहान, डांगमेई ग्रेस व मनीषा कल्याण या चार भारतीय महिला फुटबॉलपटूंनी मोठी झेप घेतली आहे. परदेशातील क्लबसोबत करार करण्यात आलेली बाला देवी ही भारताची पहिलीच महिला फुटबॉलपटू ठरली. रेंजर्स एफसी संघाकडून ती खेळली. स्कॉटिश प्रीमियर लीगमध्ये तिने रेंजर्स एफसी संघाचे प्रतिनिधित्व केले. अदिती चौहान ही भारतीय महिला संघाची गोलरक्षक.

आइसलँडमधील हमार वेरागेरडी या क्लबमधून ती खेळली. डांगमेई ग्रेस ही परदेशातील लीगमध्ये सहभागी झालेली भारताची तिसरी महिला खेळाडू ठरली. उझ्बेकिस्तानच्या एफसी नसाफ या क्लबमधून तीने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. मनीषा कल्याणने या तिघींच्या एक पाऊल पुढे टाकले.

महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभागी झालेली ती भारताची पहिलीच महिला फुटबॉलपटू ठरली. सायप्रस देशातील अप्पोलोन एफसी क्लबसोबत ती करारबद्ध झाली. २०२१ मधील एका मैत्रीपूर्ण सामन्यात तिने भारताचे प्रतिनिधित्व करताना बलाढ्य ब्राझीलविरुद्ध दमदार गोल करीत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या होत्या.

भारतात महिला फुटबॉलला मोठी उंची गाठण्यासाठी सरकार तसेच संघटनेकडून पाऊल उचलणे गरजेचे आहे. बेबी लीग सुरू करण्यात आली आहे. इंडियन वुमेन लीगही सुरू आहे. आणखी स्पर्धांचे आयोजन करायला हवे. खेळाडूंसाठी संधी निर्माण करायला हवी. महिला खेळाडूंचा खेळ सर्वांना दिसायला हवा. युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळाल्यास खेळही मोठा होणार आहे. पैसा व करिअर या दोन्ही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष दिल्यास महिला फुटबॉल झेप घेईल.

भारतात क्रिकेट हा पहिल्या क्रमांकाचा खेळ आहे. त्यामुळे या खेळातील खेळाडूंना सर्व काही उपलब्ध होते. बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी यांसारख्या इतर खेळांमधील खेळाडूंसमोर नोकऱ्यांचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सतावत नाही. भारतीय पुरुष फुटबॉल संघातील खेळाडूंचीही सध्या आर्थिक स्थिती समाधानकारक आहे.

पण भारतातील महिला फुटबॉलपटूंच्या करिअरकडे लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वे, बँक, ओएनजीसी यांसारख्या ठिकाणांहून नोकऱ्या उपलब्ध होतात. कॉर्पोरेट सेक्टरकडून महिला खेळाडूंच्या नोकऱ्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भविष्यात असे झाल्यास फुटबॉलमध्ये असंख्य प्रमाणात महिला खेळाडू येऊ शकतील.

संस्कृतीचा फरक

युरोप व अमेरिका येथे पुरुषांप्रमाणे महिला फुटबॉलला अग्रस्थान प्राप्त आहे. भारतात महिला फुटबॉलला मोठे स्थान प्राप्त होण्यासाठी अवधी लागणार आहे. कारण युरोप व अमेरिका येथे फुटबॉलची संस्कृती आहे. भारतामध्ये अद्याप फुटबॉलची संस्कृती रुजलेली नाही. भारतातील सर्व विभागात महिला फुटबॉल रुजायला वेळ लागणार आहे.

पण भविष्यात आपण ते नक्कीच साध्य करू. त्यासाठी भारतीय महिला खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष द्यायला हवे. परदेशी लीगमध्ये आपल्या खेळाडू खेळायला हव्यात. आपल्या येथील स्पर्धांमध्ये परदेशी खेळाडू खेळायला यायला हव्यात. या सर्व बाबींमुळे भारतीय महिलाही अग्रेसर होऊ शकतील.

पालकांचाही मोलाचा वाटा

सध्या पालकही आपल्या मुलांना किंवा मुलींना फुटबॉलसह इतर खेळांमध्ये खेळण्यासाठी पुढाकार घेत आहेत. फुटबॉलमुळं आपल्या मुलांची मानसिक व शारीरिक क्षमता वाढते. तंदुरुस्तीही कायम राहते. याकडं पालकांचे विशेष लक्ष असतं. यामुळं त्यांच्याकडून मुलांना खेळण्यापासून रोखण्यात येत नाही. भारतात क्रीडा संस्कृती रुजू लागली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

(लेखक हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि भारतीय फुटबॉल संघटनेच्या तांत्रिक समितीचे माजी उपाध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com