पगारवाढ मागायला भीती वाटते? मग तुमचं नुकसान अटळच! 

सोमवार, 20 मे 2019

पगारवाढ असो वा कामाच्या बाबतीतील चर्चा, खालील चार मुद्दे लक्षात ठेवले तर तुमची अडचण बऱ्यापैकी दूर होऊ शकते... 

मार्च-एप्रिल-मे महिना म्हणजे बहुतांश कंपन्यांमध्ये अप्रायझल आणि त्या अनुषंगाने बाकीच्या घडामोडींचा असतो. नोकरदारांच्या दृष्टीने हे दोन-तीन महिने म्हणजे थोडा उत्सुकतेचा आणि बराचसा टेन्शनचा काळ असतो. टेन्शनचा याचसाठी, की अप्रायझलच्या त्या कालावधीमध्ये कधीही तुमच्या वरिष्ठांनी चर्चेसाठी बोलावणं धाडलं, की पगाराची आपली अपेक्षा आपण मांडूच शकत नाही. तीही निव्वळ भीतीपोटी! 

सोसायटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट या संस्थेने नोकरी आणि अप्रायझल यासंदर्भात एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यातील एका आकडेवारीनुसार, आत्मविश्‍वासाने आणि ठामपणे पगारवाढीची चर्चा न केल्याने एका व्यक्तीचे आयुष्यभरात किमान पाच ते दहा लाख डॉलर इतके नुकसान होते. विशेष म्हणजे, महिला कर्मचाऱ्यांमध्ये या भीतीचे प्रमाण अधिक आहे. 

पगारवाढ असो वा कामाच्या बाबतीतील चर्चा, खालील चार मुद्दे लक्षात ठेवले तर तुमची अडचण बऱ्यापैकी दूर होऊ शकते : 

1. तुमचे कौशल्य काय आहे आणि त्या कौशल्याचे मूल्य काय याची जाणीव असू द्या 
तुमचा अनुभव, शिक्षण, इतर विशेष प्रशिक्षण आणि अंगभूत कौशल्य याची पूर्ण माहिती स्वत:ला असू द्या. या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधत तुम्हाला किती मानधन मिळणे अपेक्षित आहे, याबद्दल स्वत:च्या मनात स्पष्टता असू द्या. पेस्केल.कॉम या वेबसाईटवरून याबद्दल काही प्रमाणात अंदाज येऊ शकतो. 

2. कंपनीच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रीत करा 
नोकरी मिळण्यापूर्वीची मुलाखत असो वा पगारवाढीची, त्यामध्ये स्वत:च्या कौशल्यांची व्यवस्थित जाहिरात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कंपनीच्या गरजांनुसार तुम्ही तुमचे कौशल्य कसे वापरू शकता, हे सिद्ध करून दाखविण्याची गरज असते. तुमचा अनुभव आणि जमेच्या बाजू ठामपणे मांडणेही आवश्‍यक असते. 

3. मानधनाबद्दल ठामपणे बोला 
कामाचे स्वरूप आणि त्यातील जॉब सॅटिसफॅक़्शन वगैरे महत्त्वाचे असतेच; पण अजूनही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे हीच आहे. नोकरी मिळताना कबूल केलेले बोनस, पगारवाढ आणि अप्रायझलची पद्धत वगैरेंविषयी आधीच नीट माहिती घ्या. नोकरी किंवा अप्रायझल स्वीकारतानाच प्रत्येक रुपयाला महत्त्व द्या. कारण तुमची बचत, खर्च आणि एकूण गुंतवणूक हे याच पगारावर अवलंबून असेल. 

4. पगाराची अपेक्षा विचारली, तर.. 
अनेकदा मुलाखतीमध्ये तुमची पगाराविषयीची किंवा पगारवाढीविषयीची अपेक्षा विचारली जाते. असे झाले, तर स्पष्टपणे आणि न बिचकता बोला. त्यासाठी अर्थातच तुमच्या मनात ही मागणी स्पष्ट हवी. तसेच, काही वेळा मुलाखत घेणारा अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसतो. मग तो त्याच्या वरिष्ठांना विचारून यासंदर्भात निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्या निर्णयाची वाट पाहण्याइतका संयम तुमच्याकडे हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four tips for what salary should you ask for in a job