बालकांचं शहाणपण... (फ्रान्सिस दिब्रिटो)

बालकांचं शहाणपण... (फ्रान्सिस दिब्रिटो)

डिजिटल माध्यमाच्या बाबतीत लहान मुलं स्मार्ट झाली आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. या माध्यमाच्या अतिवापरामुळं मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती काही पालकांना सतावत असते. ती भीती रास्त नाही, असं नाही. काही शस्त्रं ही दुधारी असतात. त्यांचा वापर करताना अंगी कसब असणं आवश्‍यक असतं. तोच न्याय या डिजिटल माध्यमाच्या वापरालाही लागू आहे. योग्य नियमन केलं तर मुलं आधुनिक माध्यमातून खूप काही शिकू शकतात. त्यांची एरवीची निरीक्षणशक्तीही अधिक पैलूदार बनायला मदत होऊ शकते.

मी नवा मोबाईल घेतला, तो थोडासा गुंतागुंतीचा होता. सराव नसल्यामुळं कदाचित मला तो वापरायला अधिक जटील वाटत असावा. मोबाईलवरून संदेश (मेसेज) पाठवण्याचा मी प्रयत्न करत होतो. माझी चाललेली झटापट पाहून तिसरीतली एक मुलगी माझ्या मदतीला धावली. ती पटापट कळ दाबत गेली आणि तिनं झटकन संदेश पाठवून दिला. मी तिच्याकडं पाहतच राहिलो. परवा घरी गेलो होतो. माझी पुतणी रिया बुद्धिबळाचा डाव मांडून बसली होती. मी जवळ जाऊन बसलो. ती पटापट प्यादी हलवत होती. मला बुद्धिबळात गती नाही. ती मला म्हणाली  ः ‘हे डोक्‍याचं काम आहे...’ आणि मिश्‍किलपणे हसली.

डिजिटल माध्यमाच्या बाबतीत लहान मुलं स्मार्ट झाली आहेत, ही चांगली गोष्ट नाही का? मुलांना कसं आवरावं, ते काही पालकांना समजत नाही. जुनी-जाणती माणसं तर त्यांच्यासमोर हतबल होतात. या माध्यमाच्या अतिवापरामुळं मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती काही पालकांना सतावत असते. ती भीती रास्त नाही, असं नाही. काही शस्त्रं ही दुधारी असतात. त्यांचा वापर करताना अंगी कसब असणं आवश्‍यक असतं. तोच न्याय या डिजिटल माध्यमाच्या वापरालाही लागू आहे. योग्य नियमन केलं तर मुलं या आधुनिक माध्यमातून खूप काही शिकू शकतात.
***

एड्रियन हा माझ्या पुतणीचा मुलगा. वय वर्षं सहा. अतिशय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीवर तो आपलं मत विचारपूर्वक मांडतो. एखादी गोष्ट त्याला पसंत पडली नाही तर तो स्पष्टपणे त्याविषयीची नाराजी व्यक्त करतो. एकदा पुतणी त्याला चर्चमध्ये घेऊन आली होती. बोलण्याच्या ओघात ती मला म्हणाली ः ‘‘एड्रियन घरी खूप मस्ती करतो. सारखा टीव्ही पाहत असतो...’’

एड्रियनचा चेहरा एकदम पडला. उजव्या हाताची तर्जनी उंचावत त्याच्या मम्मीला तो रागानं म्हणाला ः ‘‘हे मला बिलकूल आवडलं नाही!’’ वास्तविक, त्याचं म्हणणं बालमानसशास्त्राला धरूनच होतं. आई-वडिलांनी आपल्या मुलांची तक्रार गुरुजनांकडं करता कामा नये. तसं केलं तर मुलं पालकांवर तर रागावतातच; परंतु ज्यांच्यासमोर त्यांची तक्रार केली जाते, त्यांच्यासंबंधीही मुलांच्या मनात अढी निर्माण होते. आजकाल मुलांनासुद्धा आत्मभान आलेलं आहे. त्यांच्या स्वायत्ततेचा मान राखला गेला पाहिजे.
***

एड्रियन रिक्षात बसून शाळेत जातो. रिक्षात मुलांची दाटी असते. त्याच्या बाजूला त्याच्या शेजारच्या घरची मुलगी बसते. तिला एड्रियन खूप आवडतो. ती त्याच्याबरोबर लाडीगोडी करण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो काही तिला दाद देत नाही. त्यानं सरळ मम्मीकडं तक्रार केली! म्हणाला ः ‘‘ती जॉयसी मला अगदी खेटून बसते. मी जागा बदलली तरी माझ्याजवळच येते कशी.’’ - मम्मीनं त्याची समजूत घातली. अगदी पहिली-दुसरीतल्या मुलांनाही आता आपला ‘चॉईस’ कळू लागला आहे.
एड्रियन दुसरीत गेला तेव्हा जेसलिन नावाच्या मुलीशी त्याची ओळख झाली. तिच्याशी मात्र त्याची  मैत्री जुळली. घरी परतल्यावर तो जेसलिनचं भरभरून वर्णन करू लागला. ‘ओपन डे’ रोजी तिची मम्मी एड्रियनच्या मम्मीला भेटली. एड्रियन-जेसलिन यांच्या मैत्रीबद्दल दोघी मनसोक्त बोलल्या. ‘‘तीसुद्धा घरी त्याची सारखी आठवण काढत असते,’’ जेसलिनच्या मम्मीनं एड्रियनच्या मम्मीला सांगितलं. प्रश्‍न पडतो ः हे बंध कुण्या जन्माचे?
***

निसर्गदत्त प्रवृत्ती आदिम काळापासून माणसाच्या स्वभावात आहेत. पूर्वी कुटुंबं मोठी होती. मुलं रानातल्या फुलांसारखी फुलायची. त्यांच्याकडं फारसं लक्ष द्यावं लागत नसे. शिवाय, त्यांच्यासाठी असा खास वेळ कुणाकडं होता? आता छोट्या कुटुंबांचा जमाना आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला भरपूर वाव मिळण्याचा हा काळ. त्यांना हवं तसं फुलायला मिळतं. आपण काही बोललो तर मोठ्यांच्या भुवया उंचावणार नाहीत, याची आजच्या मुलांना शाश्वती असते. मर्यादित कुटुंबाचा हा एक लाभ आहे.
निरागस बालकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मैत्री पाण्यासारखी निर्मळ आणि प्रवाही असते. भेटल्यावर एकमेकांत गुंगून जातील आणि पाठ फिरली की पुन्हा स्वतःच्या जगात मग्न! त्यांच्यांत नात्याचा चिकटपणा आणि वासनेचा डंख नसतो. वाऱ्यासारखं वाहायचं, सुगंधासारखं परिमळ वाहत नेत नेत पुढं पुढं जायचं. जाता जाता सगळं विसरून जायचं. नव्यानं डाव मांडायचा. वेळ येताच तो मोडायचाही. जीवनातलं किती मोठं तत्त्वज्ञान या वागण्यामागं दडलेलं आहे! जे घडतं ते सगळं वर्तमानकाळात...त्याच वेळी ते अनुभवयाचं अगदी पूर्णपणे, समग्रपणे! न शिकवताही मुलांना The power of NOW ची कला सहजसाध्य झालेली असते.

प्रभू ख्रिस्तानं सांगून ठेवलं आहे ः ‘तुम्हाला स्वर्गराज्यात प्रवेश करायचा असेल तर लहान मुलांसारखे व्हा!’एकदा प्रभूच्या अपरोक्ष त्याच्या शिष्यांमध्ये अधिकारपदाबद्दल खडाजंगी झाली. प्रभूला त्याचा सुगावा लागला. प्रभूनं एका छोट्या मुलाला उचललं आणि त्याला शिष्यांच्या पुढ्यात ठेवून प्रभू त्यांना म्हणाले ः ‘‘तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर या मुलासारखे लीन व्हा.’’ शिष्य खजील झाले. वास्तविक, छोटी मुलं हीच आपले खरे गुरू असतात.
***

एड्रियन दुसरीतून तिसरीत गेला. नव्या वर्षात दोघांच्या तुकड्या बदलल्या. क्‍लासचं वेळापत्रक बदललं. गाठ-भेट दुर्मिळ झाली. ‘‘तुला भेटते का आता तुझी मैत्रीण जेसलिन?’’ मी त्याला एकदा विचारलं. तो संकोचत म्हणाला ः ‘‘नाही भेटत; परंतु कधी कधी कवायतीच्या तासाला जाताना ओझरती दिसते...’’ ‘‘...आणि तिला तू दिसतोस का?’’ या माझ्या प्रश्‍नावर तो मिश्‍किलपणे हसून म्हणाला ः ‘‘हो.’’
विधात्यानं माणसाच्या काळजाच्या कुपीत प्रीतीच्या अत्तराचे काही थेंब ओतलेले आहेत. त्या रसायनात अद्भुत जादू भरलेली असते. त्यामुळं माणसाला जीवनाच्या प्रवासात ठाई ठाई ओॲसिसचं दर्शन होतं. ते ओॲसिस माणसाला जगण्यासाठी बळ देत असतं, त्याच्या जगण्याला अर्थ देत असतं. तिथं वयाचा हिशेब फिजूल असतो. कुणाला कुणीतरी आवडतं ही शुभवार्ता आहे. त्या कलिकांना एक दिवस बहर येईल...कळ्यांची फुलं होतील... फुलांची बीजं होतील...एका चिरंतन यात्रेचा प्रवास सुरूच राहील...अखंडित.
***

घरातल्या संभाषणाकडं एड्रियनचं बारीक लक्ष असतं. त्याचे कान तीक्ष्ण आहेत. कधी तो मूकपणे सगळं ऐकत असतो नि मनात साठवून ठेवतो आणि कधी वेळ आलीच तर तो आपली ‘पोतडी’ मोकळी करतो नि ठेवणीतले मुद्दे बाहेर काढतो. एड्रियनची ताई ॲनेट ही नऊ वर्षांची झाली आहे. चर्चच्या नियमांप्रमाणे या वर्षी तिला ‘फर्स्ट कम्युनियन’ (पवित्र भाकर) दिलं जाईल. त्यासाठी मुलांना धार्मिक प्रार्थना शिकवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून तिला ‘बायबल’मधल्या दहा आज्ञा (द टेन कमांडमेंड्‌स) शिकवल्या जात होत्या. ‘व्यभिचार करू नका,’ ही ‘बायबल’मधली सहावी आज्ञा आहे. तिचा अर्थ ॲनेटला काही समजला नाही.

तिनं तिच्या डॅडींना विचारलं ः ‘‘डॅडी, व्यभिचार म्हणजे काय?’’ आता हिला काय व कसं समजावून सांगावं, असा प्रश्‍न तिच्या वडिलांना पडला. खूप विचार करून ते तिला म्हणाले ः ‘‘हे बघ, तुझी मम्मी ही माझी बायको आहे. तिच्याशिवाय मी दुसऱ्या स्त्रीचा विचार नाही करायचा.’’ तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. धाकटा एड्रियन शांतपणे ते स्पष्टीकरण ऐकत होता.
आठवड्याभराची गोष्ट. घरात गप्पागोष्टी चालल्या होत्या. नात्यातली एक स्त्री आजारी पडली होती. ‘‘आपली सुनीता आजारी असून, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे...’’ एड्रियनच्या वडिलांनी घरी सांगितलं. त्यांनी आपलं बोलणं संपवण्याआधीच एड्रियननं त्यांना थांबवलं व तो ओरडला ः ‘‘व्यभिचार...व्यभिचार...तुम्ही दुसऱ्या स्त्रीचा विचार करत आहात...’’
यावर सगळे जण खळखळून हसले.
परमेश्वरानं आज्ञा कुणासाठी दिली होती आणि कोण त्याचं काटेकोरपणे पालन करत होतं! खलील जिब्रान यांनी म्हणून ठेवलं आहे ः ‘‘तुमच्या मुलांचे आत्मे भवितव्याच्या महालात वास करत असतात. तिथं तुम्ही स्वप्नातही जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करा. मात्र, त्यांना तुमच्यासारखे करू नका...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com