पहिल्याच भेटीत झाली मैत्री

शब्दांकन - काजल डांगे
Saturday, 8 June 2019

समीधाचा बोलका अभिनय तिच्या चाहत्यांना अधिक भावला. दुसरीकडे समीधाची मैत्रीण सोनम निशाणदार अभिनय क्षेत्रात नवखी आहे.

जोडी पडद्यावरची- समीधा गुरू आणि सोनम निशाणदार
अभिनेत्री समीधा गुरूने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय समीधाचा बोलका अभिनय तिच्या चाहत्यांना अधिक भावला. दुसरीकडे समीधाची मैत्रीण सोनम निशाणदार अभिनय क्षेत्रात नवखी आहे. ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनमनं अभिनयक्षेत्राकडं आपला मोर्चा वळवला. समीधा-सोनम गेली बरीच वर्षं एकमेकींना ओळखतात. दोघींमध्ये घट्ट मैत्रीही आहे. आता या दोघी मैत्रिणी ‘मोगरा फुलला’च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. समीधा म्हणते, ‘‘स्वप्नील जोशीच्या घरी मी गणपतीनिमित्त गेले होते. तिथं सोनमही आली होती. तेव्हाच मी सोनमला पहिल्यांदा भेटले. खरंतर पहिल्याच भेटीमध्ये आमच्यात मैत्री झाली. विशेष म्हणजे तिचा पहिलाच चित्रपट आणि त्या चित्रपटाचा मीही एक महत्त्वाचा भाग आहे, याचाच मला प्रचंड आनंद झाला.’’

सोनमलाही पहिल्याच भेटीमध्ये समीधाचं बोलणं, तिचा प्रेमळ स्वभाव आवडला. नंतर या दोघींच्या भेटी वाढत गेल्या. दोघींमध्ये मैत्रीचं एक सुंदर नातं निर्माण झालं. सोनमसाठी कॅमेरा, सेटवरील वातावरण, इतर तांत्रिक बाबी सगळंच नवीन होतं. पण समीधानं तिला उत्तम साथ दिली. समीधाविषयी सोनम म्हणाली, ‘‘समीधा आणि मी सेटवर खूप गप्पा मारायचो. अभिनयातील काही बारकावे ती मला समजावून सांगायची. माझी या चित्रपटामधील भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. यामुळेच समीधानं मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, की तू तुझ्या खऱ्या आयुष्यात जशी राहतेस तशीच कॅमेऱ्यासमोर वावरताना राहा. तिने सांगितलेल्या बऱ्याच टिप्स माझ्या कामी आल्या. माझ्या संपूर्ण टीमनेच मला पाठिंबा दिला.’’ 

समीधा सांगते, ‘‘सोनमनं पहिल्यांदाच कॅमेऱ्याचा सामना केला असला तरी ती करत असलेलं काम कौतुकास्पद होतं. सोनम एक उत्तम डान्सर आहे. बहुतेक त्यामुळेच तिला प्रत्येक गोष्ट परफेक्‍ट लागते. सोनमचं अभिनयाच्याबाबतीतही अगदी तसंच आहे. तिनं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. सोनम या चित्रपटाचा निर्माता कार्तिक निशाणदारची पत्नी आहे. पण निर्मात्याची पत्नी म्हणून तिनं सेटवर कधीच मिरवलं नाही. कमीपणा न घेता काही समजलं नाही तर सगळ्यांना विचारून तिनं पुढचं पाऊल उचललं. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनममध्ये मेहनत करण्याची ताकद आहे.’’ स्वप्नील जोशी, नीना कुळकर्णी, सई देवधर, चंद्रकांत कुलकर्णी यांसारखे कलाकार ‘मोगरा फुलला’मध्ये आहेत. या सगळ्या कलाकारांसमोर काम करणं म्हणजे सोनमसाठी मोठं आव्हान होतं. तिने हे आव्हान उत्तमरीत्या पेललं. 

‘‘समीधा सेलिब्रिटी असली तरी ती सगळ्यांना समान वागणूक देते. ती कामाबरोबरच कुटुंबालाही तितकाच वेळ देते. ती एक उत्तम व्यक्तीही आहे. सेटवर अगदी वेळेत हजर असायची. कितीही व्यस्त असली तरी ती तिच्या मुलीसाठी आवर्जून वेळ काढते. एकाच वेळी ती अभिनेत्री आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळते,’’ सोनम समीधाबद्दल भरभरून बोलत होती. पण समीधाच्या बोलण्यातूनही तिच्या मनात सोनमविषयी असणारा आदर जाणवतो. समीधा-सोनम अभिनयक्षेत्रात कार्यरत तर आहेत; पण त्याचबरोबरीने दोघीही त्यांच्या खऱ्या आयुष्यात आईची भूमिका चोख पार पाडत आहेत. या पुढेही सोनम-समीधाला रुपेरी पडद्यावर एकत्रित काम करण्याची इच्छा आहे. 

(शब्दांकन - काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship was the first visit