
शशांक शेंडे - saptrang@esakal.com
मला आजवर रंगभूमीबरोबरच हिंदी व मराठीच्या मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. मी अभिनयाची सुरुवात प्रायोगिक रंगभूमीवरून केली. पुण्यात ‘समन्वय’ नावाचा आमचा एक नाट्यग्रुप होता. आम्ही सगळे मिळून नाटकं बसवत होतो व प्रयोग करत होतो. त्या काळात विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, वसंत देव यांसारख्या दिग्गज लेखकांची नाटकं आम्ही सादर केली. मी आजवर केवळ एकच व्यावसायिक नाटक केलं आहे आणि त्या नाटकात मला अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. हळूहळू मला चित्रपटसृष्टीकडून ऑफर्स येऊ लागल्या आणि अभिनयाच्या या नव्या माध्यमाने मला खुणावलं.