कथा अरुणाच्या अंत्यसंस्काराची

सर्वोच्च न्यायालयाने केईएमच्या अधिष्ठाता यांना दिलेली आहे. तिचे अंत्यसंस्कार करण्याची आपण परवानगी द्यावी
funeral
funeral sakaत

अरुणा शानबाग हे नाव घेतले, की सर्वांच्या स्मृती जागृत होतात आणि आठवते तिने ३७ वर्षे मृत्यूशी दिलेली झुंज. १९७८-७९ दरम्यान अरुण शानबागवर शारीरिक अतिप्रसंग करून तिची मान आवळल्यामुळे ती वेजिटेटिव्ह स्टेट (कोमासदृश) मध्ये गेली, जिथे स्वतःची जाणीव नाहीशी होते. अशा परिस्थितीत आमच्या परिचारिकांनी तिची जवळपास ३७ वर्षे दिवसरात्र सुश्रूषा केली. आपली एक सहकारी न समजता आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मानून तिच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली; पण आज गोष्ट सांगणार आहे ती तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या नैतिक, धार्मिक आणि कायदेशीर कोंडीची.

केईएम रुग्णालयातील कार्यकाळात माझा अरुणाशी अनेकदा उपचारासाठी संबंध आला होता. शल्यचिकित्सा विभागात कार्यरत असताना अरुणाला काहीही झाले की आम्ही जाऊन उपचार करीत असू. जानेवारी २०१५ मध्ये मी अधिष्ठातापदाची सूत्रे हाती घेतली. मे २०१५ च्या सुमारास आमचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कर्णिक यांचा दूरध्वनी आला की, ‘‘अरुणाची प्रकृती ठीक नाही, तिला अतिदक्षता विभागात आणलेले आहे.’’

अरुणाभोवती प्रसारमाध्यमांचे एवढे वलय होते की, तिला काही झाले की ती बातमी होत असे. अनेकदा पत्रकार आमच्याकडे येऊन तिची चौकशी करीत असत. अनेक पत्रकारांनी तिच्यावर भरभरून लिहिलेही आहे. अरुणाच्या दयामृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा आमच्या परिचारिकांनी आंदोलन केले होते. त्या वेळचे अधिष्ठाता-संचालक डॉ. संजय ओक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन ती केस स्वतः लढले होते आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरुणाच्या सुश्रूषेचे सर्व हक्क अधिष्ठाता-केईम यांना दिले. अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा अरुणा अत्यवस्थ झाली तेव्हा चिंतेचे वातावरण झाले.

एक दिवस सकाळी सहा वाजता मला डॉ. कर्णिक यांचा दूरध्वनी आला की, अरुणाचे निधन झाले. रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे व्यक्ती मृत झाल्यावर साधारण दोन ते तीन तासांनी आम्ही सदर व्यक्ती मृत झाली आहे, हे घोषित करतो. मी सकाळी आठ-साडेआठला जाऊन अरुणाला पाहिले. त्यानंतर तत्कालीन वरिष्ठ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे जाऊन सर्व परिस्थिती स्पष्ट केली. तोपर्यंत माध्यमांना कुणकुण लागली होती. आम्ही दोघे तत्कालीन महापालिका आयुक्त अजय मेहता यांना भेटलो. सर्व वास्तव सांगून म्हटले की, ‘‘इतक्या वर्षांत तिचे कोणी नातेवाईक भेटायलाही आले नाहीत आणि तिची सर्व जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने केईएमच्या अधिष्ठाता यांना दिलेली आहे. तिचे अंत्यसंस्कार करण्याची आपण परवानगी द्यावी.’’ मेहता यांनी पोलिस परवानगी घेऊन पुढे आम्ही सर्व करावे, अशी अनुमती दिली; पण प्रसारमाध्यमांना बातमी द्याल तेव्हा तिचे कोणी नातेवाईक पुढे येतात का, हेसुद्धा बघा, असे सांगितले.

मी सकाळी ११ वाजता केईमला परत आलो. त्या वेळी किमान ३० तरी पत्रकार थांबलेले होते. मी अरुणाच्या निधनाची बातमी दिली. केईएममध्ये वेगळेच दुःखाचे वातावरण होते. अरुणाच्या निधनाची बातमी १०० हून अधिक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. असंख्य पत्रकारांनी त्यात जवळ जवळ ३०-४० अन्य देशांतील पत्रकारांनी अधिष्ठाता कार्यालयात संपर्क साधला. आता पुढे कसे जायचे, हा माझ्यापुढे प्रश्न होता.

माध्यमाद्वारे अरुणाच्या निधनाची बातमी आली तेव्हा दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘आम्ही अरुणाचे मावसभाऊ आणि मावसबहीण आहोत. आम्ही तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलो आहोत. त्या वेळी अनेक परिचारिकांनी येऊन माझ्याशी चर्चा केली की, आम्ही ३७ वर्षे अरुणाला सांभाळले. इतकी वर्षे हे नातेवाईक आले नाहीत, मग आता त्यांच्याकडे तिचा देह का सुपूर्द करायचा?’’ अनेक मंत्री आले. लोक भावनिक झाले होते. वेगळेच वातावरण होते. परिचारिका विरुद्ध तिचे नातेवाईक असा वाद निर्माण होऊ पाहत होता. कोणाच्या स्वाधीन देह द्यावा असा तिढा निर्माण झाला. यात धार्मिक, नैतिक आणि कायदेशीर बाजू होत्या. आम्ही माहिती काढली, त्याप्रमाणे अरुणा हिंदू सारस्वत होती. आम्ही सारस्वत मंडळाशी संपर्क साधला आणि त्यांच्या भटजींना आम्हाला मदत करण्याची विनंती केली.

कोणी काय करायचे हे ठरत नव्हते. भोईवाडा येथे आम्ही अंत्ययात्रा घेऊन गेलो. एका बाजूला सर्व विधी करण्याबाबत परिचारिका ठाम होत्या आणि दुसऱ्या बाजूला तिचे नातेवाईक होते. माझ्या मनात एक विचार आला आणि मी नातेवाईकांना बाजूला घेऊन सर्व परिस्थिती समजावून सांगितली. भाऊ बँकेत काम करणारा समजूतदार व्यक्ती होता. मी त्यांना विचारले, ‘‘आपण सर्वांनी एकत्र विधी केले, तर तुमची काही हरकत आहे का?’’ तो हरकत नाही म्हणाला. मग आम्ही दोघांनी तिथे आलेल्या त्यांच्या भटजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व अंत्यसंस्कार केले. मी व तिच्या मावसभावाने एकमेकांचा हात धरून अरुणाच्या पार्थिव शरीराला अग्नी दिला. या कृतीमुळे वाद टळले. काही अस्थी त्याच्याकडे दिल्या. काही आम्ही समुद्रात विसर्जित केल्या. पुढे अरुणाच्या स्मरणार्थ आम्ही परिचारिकांसाठी एक वाचनालय आणि व्यायामशाळा रुग्णालयात सुरू केली, ज्यामुळे तिची आठवण आमच्या आणि पुढच्या पिढीच्या मनात कायम राहील.

अशा काही प्रकरणात जेव्हा धार्मिक, नैतिक आणि कायदेशीर गुंता असतो तेव्हा नेमके काय करावे, हे कुठेही लिहिलेले नाही; पण एकत्र येऊन सामंजस्याने तोडगा काढला, तर ते सर्वांच्या हिताचे ठरते. पुढे माध्यमांनी आणि समाजधुरिणांनी माझ्या निर्णयाची प्रशंसा केली. एक दु:खी आयुष्य संपताना सर्वजण समजूतदारपणे एकत्र आले आणि अरुणाच्या धर्माच्या रीतीप्रमाणे आम्ही सर्व नीट करू शकलो, याचे मला फार समाधान वाटले. अरुणाची स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे ३७ वर्षे सेवा केल्याबद्दल पुन्हा एकदा केईएमच्या सर्व परिचारिकांचे कौतुक आणि त्यांना मानाचा मुजरा.

अरुणा शानबागची केईएमच्या परिचारिकांनी जवळपास ३७ वर्षे दिवस-रात्र शुश्रूषा केली. तिची सर्व जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने केईएम अधिष्ठातांना दिली होती. जेव्हा तिचे निधन झाले तेव्हा ती रुग्णालयात असताना कुणीही नातेवाईक आले नसल्याने अंत्यसंस्कारही केईएमलाच करायला मिळावेत, अशी आमच्या परिचारिकांची इच्छा होती; पण त्या वेळी अरुणाचे मावसभाऊ आणि मावसबहीण आले. अशा परिस्थितीत सामंजस्याने त्या परिस्थितीला सामोरे जाणे कसे गरजेचे होते, त्याची ही कथा...

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com