

Fictional Story of Gabru Rabbit
esakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com
एका ‘वनसारा’ नावाच्या शहरात गबरू नावाचा ससा राहात असे. गबरू खरे तर अत्यंत भित्रा ससा होता. पण आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर मात्र त्याला आपण भित्रे आहोत, हे मान्य करण्याची लाज वाटत असे. त्यामुळे तो त्याच्या शूरपणाच्या गोष्टी कल्पनाविलास करून रंगवून रंगवून सांगत असे. गबरूला उत्तम बोलण्याची कला अवगत होती. तो गोष्टी अशा रंगवून सांगे की ऐकणाऱ्याला गबरूसारखा दुसरा शूरवीर जगात नाही, असेच वाटत असे. दिवसभर वेगवेगळ्या सभांमध्ये वेगवेगळ्या हिंस्र प्राण्यांना धडा शिकवण्याच्या गोष्टी करणे, अन्यायाला वाचा फोडण्याचे भाष्य करणे, त्यासाठी विविध बातम्यांच्या वाहिन्यांवर मुलाखती देणे, चर्चासत्रांमध्ये हिरिरीने आपली बाजू मांडणे... असे सगळे करण्यात गबरूचे दिवस छान चाललेले होते.
आपण एकदा सिंव्हाची आयाळ खाजवली आहे, एकदा वाघाचा जबडा उघडून त्याचे दात मोजलेले आहेत, एकदा अमुक धर्माच्या प्राण्यांचे बिंग फोडलेले आहे... असे कित्येक किस्से बोलण्याच्या तावात तो रंगवून सांगत असे. गबरूच्या या रंजक बोलण्यावर, त्याच्या कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगावर, लाल लाल डोळ्यांवर कित्येक लोक फिदा होते. तो बोलताना इतका मोहक दिसत असे की त्याचे म्हणणे फक्त खरेच आहे याची सगळ्यांना खात्री झालेली होती. युट्युबवर त्याची भाषणे अत्यंत गाजलेली होती. त्याचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते होते. त्याने धर्माच्या नावाने नुसती हाक देण्याची खोटी होती की सगळीकडे लोक ढाल-तलवारी घेऊन तयारच होते.