नक्षल्यांच्या वर्मावर घाव (?)

Naxalite
Naxalitesakal media

गडचिरोलीतल्या कोरचीच्या जंगलातली अशीच एक पहाट नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरली. व्यवस्थेबाबत नाराज लोकांना हेरणे, त्यांच्यात नक्षलवादी विचाराचे बीजारोपण करणे, हे मिलिंदचे काम. गडचिरोली, गोंदिया, बालाघाट आणि राजनांदगाव जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर हल्ले, बॉम्बस्फोटाचे नियोजन करणारा म्होरक्या मिलिंद तेलुंबडेच चकमकीत मारला गेला आणि नक्षलवादी चळवळीचा कणा मोडला.

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिनाचा जल्लोष सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अमानुष हल्ला केला होता. नक्षलवादाच्या प्रवाहात माणसाचे माणसामधील अंतर वाढले. आपलीच माणसे आपली वैरी झाली. व्यवस्थेला होणारा विरोध एवढा टोकाला गेला, की त्यात आपलेच भाऊबंद मारले जाताहेत, याची जाणीवही नक्षलवाद्यांना राहिली नाही. तेव्हा आयईडीच्या स्फोटात गडचिरोली पोलिस आणि काही स्थानिकांसह तब्बल १५ जणांचा बळी गेला. अवघा महाराष्ट्र या घटनेने हळहळला... आणि तेव्हाच सुरू झाली नक्षलवादविरोधातली खरी नक्षलबारी...

संध्याकाळी पाचनंतर सामसूम होणाऱ्या आणि छत्तीसगढ राज्याला लागून असलेल्या गडचिरोलीतल्या कोरचीच्या जंगलातली अशीच एक पहाट नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरली. दारूगोळा कमी पडला, की फटाक्यांची मदत घेणारे नक्षलवाद्यांवर बऱ्याचदा शरणागती पत्करायची वेळ येते. मग ते दूरवर छत्तीसगडच्या दिशेने जंगलात नाहीसे होतात, पळून जातात. त्या पहाटे मात्र त्यांना तसे काहीही करता आले नाही; कारण पोलिसांनी हल्ला केला तेव्हा चळवळीचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे त्यांच्यासोबत होता. आपल्यापैकी कितीही लोकांचे जीव गेले, तरी त्याचा जीव वाचवणे नक्षलवाद्यांसाठी महत्त्वाचे होते.

त्यामुळे तब्बल १२ तास ते सूर्योदयाची वाट पाहत होते; पण तो त्यांचा अखेरचा सूर्यास्त ठरला. मिलिंदला वाचवण्याच्या प्रयत्नात २६ जहाल नक्षलवादी मारले गेले. आतापर्यंतच्या गडचिरोलीतील नक्षलवादविरोधी मोहिमेतली ही पोलिसांची महत्त्वाची, भरीव कामगिरी. केवळ मिलिंद होता म्हणून ही चकमक एक-दोन नव्हे, तर तब्बल १२ तास चालली. अखेर राज्य सरकारने ५० लाखांचे बक्षीस ठेवलेला मिलिंद तेलतुंबडे ठार झाला आणि नक्षल चळवळीचा कणा मोडण्यात सरकार यशस्वी झाले. मिलिंदवर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पोलिसांनी लावलेल्या बक्षिसांची रक्कम एकत्र केल्यास ती थेट अडीच कोटींच्या घरात जाते.

त्यावरूनच मिलिंदला ठेचून काढणे पोलिसांसाठी किती महत्त्वाचे होते, हे अधोरेखित होते. २६ वर्षांच्या कारकिर्दीत तो पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच वेळी पोलिसांनी त्याचा खात्मा केला. पूर्वेतिहास सोडल्यास महाराष्ट्र - मध्य प्रदेश - छत्तीसगड (एमएमसी) झोनचा प्रमुख, सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेल्या मिलिंद ऊर्फ दीपक ऊर्फ जिवा ऊर्फ सह्याद्रीबद्दल पोलिसांना काहीच माहिती नव्हती. एखाद्या रहस्यमयी कथानकाला शोभेल, अशा मिलिंदच्या वास्तव्याचा आणि त्याच्या असण्याच्या केवळ दंतकथा ऐकायला मिळायच्या. नऊ महिने जंगलात आणि दोन ते तीन महिने शहरात असा त्याचा वावर. त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांना कठीण झाले होते.

२०२० मध्ये छत्तीसगडच्या राजनांदगाव येथे प्रमुख नक्षलवादी नेत्यांपैकी एक असलेला डेव्हिड मारला गेला. त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी सापडली. त्या डायरीतून पोलिसांपुढे पहिल्यांदाच मिलिंद तेलतुंबडेची माहिती आली. त्यात मिलिंदचे एकंदरीतच व्यवस्था, सरकार, चळवळीविषयीचे विचार लिहिलेले होते. मिलिंदने ही डायरी इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिली होती. त्यात मिलिंदच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील माहिती होती. तो आपल्या भाषणाने लोकांना प्रभावित करायचा. त्याच्या जोरावरच त्याने महाराष्ट्राच्या सीमेवरचा मध्य प्रदेशचा भाग, राजनांदगाव, राजुरा, नागपूर परिसरात नक्षलवादी चळवळीचे नेटवर्क उभारल्याचे नक्षलवादविरोधी मोहीम हाताळलेले एक माजी आयपीएस अधिकारी सांगतात.

माओवादी विचारांचा त्याच्यावर पगडा होता, असे या डायरीवरून लक्षात आले. डायरीत मिलिंद म्हणतो, की ‘अलीकडे संघटनेत सुरू असलेल्या कामामुळे मी निराश आहे. सध्याचे काम बघता आपण आपल्या मूळ विचारधारेपासून भरकटल्यासारखं वाटते, जे नवे केडर येत आहे, त्यांना शिस्त नाही. प्रामाणिकपणा, समर्पणाचा त्यांच्यात अभाव आहे, त्यांना मेहनत घ्यायची नाही. संघटन कुठल्या दिशेने चाललेय हे कळत नाही. आम्ही केवळ चालतोय, फिरतोय...’

नक्षलवादी चळवळीत येण्यापूर्वी मिलिंद एक सर्वसामान्य आयुष्य जगत होता. पाच भाऊ आणि तीन बहिणी अशा आठ भावंडापैकी मिलिंद शांत होता. आयटीआय झाल्यावर मिलिंदला बल्लारशहा येथील कोळसा खाणीत नोकरी मिळाली होती. शासकीय नोकरी करणारा तो तेलतुंबडे कुटुंबातील पहिलाच सदस्य. त्याच्यानंतर त्याचा भाऊ आनंद तेलतुंबडेलाही नोकरी लागली. बल्लारशहा येथे काम करताना मिलिंद कामगार चळवळीत सक्रिय झाला. त्याने इंटकची बांधणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात तो कामगार नेता म्हणून उदयास आला आणि तेथेच तो नक्षलवादी चळवळीच्या संपर्कात आल्याचे पोलिस सांगतात. मात्र १९९६ नंतर मिलिंद अचानक गायब झाला. त्यापूर्वी एकदा तो यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील त्याच्या घरी आला होता.

त्या वेळी मिलिंदने त्याचे पुढील संपूर्ण आयुष्य तो चळवळीसाठी समर्पित करणार असल्याचे आम्हाला सांगितले. मिलिंदचे हे बोलणे आमच्यासोबतचे शेवटचे बोलणे ठरले, त्यानंतर तो कधीच घरी आला नाही. लहान भाऊ प्रवीण २००६ मध्ये मरण पावला. २०१२ मध्ये आजोबा गेले. तेव्हाही मिलिंद घरी आला नाही. २४ वर्षांनंतर थेट त्याचा मृतदेहच घरी आला. मिलिंदचा स्वभाव बघता तो माओवादी चळवळीत जाईल, असे कधीच वाटले नव्हते. टीव्ही, बातम्यांमधूनच आम्हाला तो नक्षलवादी झाल्याचे कळले. त्यानंतर आमच्या परिवाराला नेहमीच पोलिस चौकशांना सामोर जावे लागले. आमचे फोन टॅप होत होते, असे त्याचे चुलत बंधू विप्लव तेलतुंबडे सांगतात.

पोलिसांना मिळालेल्या डायरीवरून मिलिंदचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या कारवायांबद्दल बरीच माहिती मिळाल्याचे राजनांदगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी सांगितले. १९९५ पर्यंतच्या मिलिंदच्या आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे; मात्र चळवळीत सहभागी झाल्यानंतरचा मिलिंद कुणीच पाहिला नव्हता. २००४ मध्ये तो राज्य कमिटीचा सदस्य झाला; मात्र त्यानंतरची त्याची कुणालाच माहिती नव्हती. मिलिंदची मिळालेली ही डायरी नियमित लिहिलेली नव्हती; मात्र त्यामुळे मिलिंद कुठला आहे, गेल्या चार-पाच वर्षांत तो कुठे-कुठे फिरला, याची नेमकी माहिती पोलिसांना मिळाली.

डायरीत मिलिंदचा फार काही तपशील लिहिला गेलेला नाही. केवळ सहा महिन्यांच्या कालावधीचा मजकूर आहे; मात्र या डायरीमुळे मिलिंदचा नक्षलवादी चळवळीतला एकंदरीत वावर, त्याचा माईंडसेट समजणे, त्याचे पिक्चरायजेशन करणे पोलिसांना सोपे झाले. मिलिंदच्या मेंदूत काय चालले आहे, तो कशा प्रकारे विचार करत असेल, याचे विश्लेषण करून, त्याला पकडण्यासाठी मोहीम कशी राबवायची, याबाबत मदत झाल्याचे राजनांदगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सांगतात. भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर छत्तीसगड पोलिसांना पहिल्यांदा मिलिंद नागपूरला असल्याची माहिती मिळाली; मात्र तेव्हा पोलिस पथक पोहोचण्यापूर्वी मिलिंद तेथून पळून गेला होता.

बुद्धिमान मात्र व्यवस्थेबाबत नाराज झालेल्या लोकांना हेरणे, त्यांच्यात नक्षलवादी विचाराचे बीज पेरणे, हे मिलिंदचे काम. त्याच जोरावर त्याने मोठ्या शहरात नक्षलवादी चळवळ पसरवली. कित्येक तरुणांना त्याने या चळवळीत आणल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. २०१६-१७ मध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगडचा (एमएमसी) विस्तार करण्याची, नेतृत्व करण्याची जबाबदारी मिलिंदवर पडली. २०२१ मध्ये त्याला या झोनचा प्रमुख करण्यात आले. गडचिरोली, गोंदिया, बालाघाट आणि राजनांदगाव जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर होणारे हल्ले, बॉम्बस्फोटाचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.

मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा होणे, हा नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का आहे. आता ‘एमएमसी’चा विस्तार खुंटणार आहे. मिलिंदप्रमाणे लगेच दुसरा कुणी या भागात नक्षलवादी चळवळीला पुन्हा उभारी देऊ शकणार नाही. त्याच्या जाण्यामुळे उत्तर गडचिरोली, राजनांदगाव, वर्धा डिव्हिजन समाप्त होऊ शकते. वेळीच हातोडा मारला, तर या भागातून नक्षलवादी चळवळ समूळ नष्ट होऊ शकते, असे छत्तीसगड पोलिसातील अधिकारी सांगतात; मात्र मिलिंद तेलतुंबडे मारला गेल्याने ही चळवळ दिशाहीन होण्याची भीतीही काही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com