गजमालिकेची ‘पितळखोरा लेणी’

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात फार महत्त्वाच्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत.
gajmalika Pitalkhora Caves
gajmalika Pitalkhora Cavessakal

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात फार महत्त्वाच्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते अगदी सतराव्या शतकापर्यंत तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे या जिल्ह्याचा जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास सहजपणानं समजण्यास मदत होते. यामध्ये लेणी आहेत, किल्ले आहेत, महाल आहेत, मकबरा आहे.

नगरविकास करण्यास कारणीभूत ठरणारी बांधकामे आहेत. अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या समाधीस्थळं आहेत. मंदिरं आहेत. यापैकीच एक म्हणजे दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणारी आणि घनदाट जंगलात अस्तित्व टिकवून असलेली पितळखोरा लेणीसमूह. महाराष्ट्रात किंबहुना पश्चिम भारतात निर्माण करण्यात आलेल्या सर्वांत पुरातन लेणीसमूहांपैकी एक.

गौताळा अभयारण्यात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी पितळखोऱ्याची लेणी आहेत. एकूण १४ लेणींचा समूह असलेल्या या लेणींमध्ये चार चैत्यगृह आहेत, काही विहार आहेत आणि स्मृतिस्तूप विथिका आहे. ‘पितग्याल’ या नावानं पुरातन काळात प्रसिद्ध असलेल्या या लेणींमध्ये हीनयान तसेच महायान संप्रदायाचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो.

ढोबळमानानं सांगायचं झाल्यास, हीनयान किंवा थेरवाद संप्रदायात कोणत्याही स्वरूपात बुद्धप्रतिमांची निर्मिती किंवा पूजाअर्चा करण्यात येत नव्हती. तर, महायान काळात गौतम बुद्धांना विविध स्वरूपानं चित्रकला तसेच मूर्तिकलेमध्ये दर्शवण्यात आलं होतं.

पितळखोरा येथे गौतम बुद्धांची एकही दगडात निर्माण केलेली प्रतिमा नसली, तरीही लेणी क्रमांक तीनमधील खांबांवर स्थानक तसेच बसलेल्या अवस्थेतील गौतम बुद्धांची तीसपेक्षा जास्त चित्रे चितारली आहेत. यावरून, या लेणीची निर्मिती ही इसपू दुसऱ्या ते इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंत झाल्याचा अंदाज आपण लावू शकतो.

लेणींचा काळ ठरवताना त्यांचं स्थापत्य, त्यावर कोरण्यात आलेले शिलालेख ज्याप्रकारे लक्षात घेतले जातात, अगदी त्याच प्रकारे बुद्धप्रतिमांचं अस्तित्वही ध्यानात घेतलं जातं. टॉलेमीच्या लिखाणात या लेणींचा उल्लेख ‘पेट्रीगल’ या नावानं आलाय.

लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ गाड्या लावून, काही पायऱ्या उतरून आपण मुख्य लेणी परिसरात प्रवेश करतो. इथं सुरुवातीलाच एक धबधबा आहे आणि त्याच्या खाली, काही अंतरावर पाणी अडवण्यासाठी केलेली व्यवस्था आढळते. लेणीमध्ये राहणाऱ्या बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी, वाटसरू यांना पाण्याची उपलब्धता व्हावी, म्हणून ही बंधाऱ्याची व्यवस्था केलेली आहे.

लेणीच्या बरोबर मधून एक नदी वाहते, ज्यामुळे एका बाजूला चार तर दुसऱ्या बाजूला दहा अशाप्रकारे लेणींची नैसर्गिकरीत्या विभागणी झालेली आहे. या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी शिल्पं. त्यातही, यक्षप्रतिमा. चौथ्या ते पाचव्या शतकाच्या आसपास संपादित करण्यात आलेल्या ‘महामयूरी’ नामक ग्रंथामध्ये या भागात संकरिन नामक यक्षाचे स्थान असल्याचा उल्लेख आला आहे.

काही पायऱ्या चढून आपण चैत्य क्रमांक तीनमध्ये प्रवेश करतो, जिथं बऱ्याच गौतम बुद्धांच्या प्रतिमा आपल्याला खांबांवर रंगवलेल्या दिसतात. अनेक अभ्यासक तसेच पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, हे चित्रकलेचं काम लेणीच्या संवर्धनासाठी करण्यात आलं असावं.

या चैत्यलेणीच्या बाजूला असलेला विहार हा भारतात आढळणाऱ्या सर्व विहारांमध्ये फार वेगळा आहे. या विहाराला गजमालिकेची रचना केलेली दिसून येते. हत्तींची आज बऱ्यापैकी नासधूस झालेली असली, तरीही त्यांच्या उर्वरित आकारावरून ते किती भव्य आणि सुबक असतील, याचा आपल्याला अंदाज येतो. जवळपास पन्नासेक वर्षांपूर्वी म. न. देशपांडे यांनी या लेणी परिसरात उत्खनन केले होते. तेव्हा या लेणीसमोर साचलेला मातीचा ढिगारा बाजूला करत असताना ही संपूर्ण गजमालिका आढळून आली.

गजमालिकेच्या बाजूलाच एक प्रवेशद्वार आहे आणि काही पायऱ्यांची रचना केलेली आहे. या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूनं दोन यक्ष आणि दरवाजाच्या वरील बाजूस महामायेचं शिल्प कोरलं होतं. यातील महामाया शिल्प आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आलं आहे. एका बाजूचा द्वारपाल हा आजमितीस नष्ट झालेल्या अवस्थेत आहे तर एक द्वारपाल आजही पितळखोरा इथं मूळ जागेवर आहे.

अशाप्रकारे दरवाजाची रचना असलेला, गजमालिका असलेला, दोन यक्ष पहारेकरी असलेला प्रकार इतरत्र कुठेही आढळून येत नाही. आतील बाजूस अनेक खोल्यांची रचना केलेली आहे. प्रत्येक खोलीच्या प्रवेशद्वारावर चैत्यकमानीची रचना दिसून येते. तर खांबावर अनेक प्राणी कोरलेले आहेत. यातील काही सिंह आहेत, नीलगाय आहेत, बैल आहे, घोडे आहेत. विशेष म्हणजे, यातील काही प्राण्यांना पंख दाखवण्यात आले आहेत.

या लेणीसमूहात अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत. त्यातील काही शिलालेखांमधून प्रतिष्ठान आणि धान्यकटक यांसारख्या प्राचीन शहरांचा आणि तेथील व्यापाऱ्यांचा उल्लेख वाचावयास मिळतो. हा लेणीसमूह उज्जैनला जोडण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर निर्माण करण्यात आला होता. त्यामुळं अनेक भागातील व्यापाऱ्यांचं इथं येणं-जाणं सुरूच असे.

यासोबतच, इथे सापडलेल्या एका यक्षाची प्रतिमा आज दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. या यक्षाच्या हातावर ‘कन्हदस’ नामक सोन्याच्या व्यापाऱ्याचं नाव कोरलं आहे. हे शिलालेख लेणींच्या आर्थिक घडामोडी तसेच तत्कालीन महत्त्वाच्या गावांची माहिती पुरवतात.

पितळखोरा अतिशय सुंदर आहे. दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती आणि व्यापाराविषयक अतिशय महत्त्वाची माहिती या लेणींच्या माध्यमातून प्राप्त होते. वेरूळ पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणीसमूहाविषयी मात्र पर्यटकांना फारशी माहिती नसते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात अशाप्रकारचे दुसरं कुठलंही उदाहरण आपल्याला आढळत नाही, इतका हा लेणीसमूह महत्त्वाचा आहे.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com