जग गुप्तहेरांचं वेगळंच आणि थरारक

स्पाय, इंटेलिजन्स सर्व्हिस, रॉ, एजंट, हेर, हेरगिरी, मिलिटरी ऑपरेशन, मिशन... असे अनेक शब्द आपल्या कानांवर पडतात.
Book Spy Stories
Book Spy StoriesSakal
Summary

स्पाय, इंटेलिजन्स सर्व्हिस, रॉ, एजंट, हेर, हेरगिरी, मिलिटरी ऑपरेशन, मिशन... असे अनेक शब्द आपल्या कानांवर पडतात.

स्पाय, इंटेलिजन्स सर्व्हिस, रॉ, एजंट, हेर, हेरगिरी, मिलिटरी ऑपरेशन, मिशन... असे अनेक शब्द आपल्या कानांवर पडतात. त्यांचा नेमका अर्थ काही अभ्यासूंना माहीत आहे; पण बऱ्याच जणांना व खास करून ‘व्हॉट्सॲप विद्यापीठ’वर आपलं ज्ञान पाजळणाऱ्यांना या शब्दांचे अर्थ व त्यांचं कार्य याबद्दल फार काही माहीत नसतं. ते जाणून घ्यायचं असेल, तर त्यासंदर्भातील पुस्तकांचं वाचन करणे व त्यातही जर त्या क्षेत्रातील एका अधिकारी व्यक्तीने ती पुस्तकं लिहिलेली असतील, तर मग प्रश्‍नच नाही.

भारतीय पोलिस सेवेत अधिकारी असलेले अमर भूषण यांनी राज्य व केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सीसाठी काम केलेलं आहे. त्यातही त्यांनी रॉसाठी खासकरून काम केलेलं आहे. २००५ मध्ये ते भारताच्या या महत्त्वाच्या तांत्रिक इंटेलिजन्स सेवेचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी या काळात त्यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे कथा लिहिण्यास सुरुवात केली आणि ‘स्पाय स्टोरीज’ नावाने तीन पुस्तकांचा संच प्रकाशित केला. त्या तीनही पुस्तकांचा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. ‘टेरर इन इस्लामाबाद’, ‘द झरो कॉस्ट मिशन’, ‘मिशन नेपाळ’ अशी या तीन पुस्तकांची नावं आहेत. सत्य घटनांवर आधारित कथांची मांडणी चांगल्या पद्धतीने व खिळवून ठेवणारी अशी झाली आहे.

‘वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या हेरगिरीच्या कथा लिहिण्यासाठी, लेखकाच्या आयुष्यात पुष्कळ आनंद असणं अत्यावश्‍यक असतं, ज्यामुळे तो आधीचं सगळं आठवून पझलचे तुकडे पुन्हा जोडून पूर्ण चित्र तयार करू शकतो,’’ असं लेखकाने म्हटलं आहे. तिन्ही पुस्तकं वाचताना पझलचे तुकडे जोडून चित्र उभं करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत, असंच म्हणावं लागेल.

‘टेरर इन इस्लामाबाद’

या पुस्तकाची सुरुवात इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील अमित मुन्शी याच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापासून होते व पुढे सत्यकथा उलगडत जाते. तो सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून तिथं गेलेला असला, तरी प्रत्यक्षात तो भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीचा अधिकारी होता व त्याचं खरं नाव वीर सिंग होतं. ‘ते दुहेरी आयुष्य जगायचं... कधी कधी अमित मुन्शी म्हणून जगणं त्याला असह्य होत असे...’ आता एवढं वाचल्यानंतर पुस्तक खाली ठेवलं जात नाही... उत्कंठा वाढत जाते आणि हळूहळू एकेका गोष्टीचा उलगडा होत जातो.

पाकिस्तानात काम करणाऱ्या कोणत्याही भारतीयावर पाळत ठेवलीच जाते. अमित मुन्शी याच्याबाबतही तसंच होतं. त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी काय काय केलं गेलं याचं वर्णन या पुस्तकात आहे. पण अमित मुन्शीही त्या सर्वांना पुरून उरला हेही स्पष्ट होतं. म्हणून एका ठिकाणी लेखक म्हणतात, ‘‘पाळत ठेवणाऱ्यांना अमित मुन्शीच्या त्याच त्या कंटाळवाण्या दैनंदिनीचा वीट आला. तो नेहमी ठरावीक असा वर्तणुकीचा पॅटर्न न चुकता पाळायचा आणि त्याच्या प्रचंड कंटाळवाण्या जीवनशैलीत अडकून पडायचा.’’ पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान अमित मुन्शी याच्या पत्नीने भारतात राहून त्याला दिलेला धीर व प्रोत्साहनही वाखाणण्यासारखं आहे.

‘मिशन नेपाळ’

लखनौ, १९८९-९० चा काळ... येथून पुस्तकाची सुरुवात होते. ईस्टर्न सर्व्हिस ब्यूरो (ईएसबी) हा भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीचा एक भाग. ही कथा आहे जीवननाथ याची. एजन्सीमध्ये त्याला ‘जीव’ या नावाने संबोधलं जायचं. त्याची ‘ईएसबी’च्या लखनौ येथील कार्यालयात पोस्टिंग होते तोच ‘ईएसबी’ विभागच बंद करण्याचा निर्णय होतो व येथून कथानकाला सुरुवात होते.

विभाग बंद करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू झाली व जीवने कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नेमकं काय होणार याची कल्पना दिली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अनेकांची भयानक अवस्था झाली होती... आणि अचानक एक आशेचा किरण दिसला. ट्रेड अँड ट्रान्झिट ट्रीटीचं नूतनीकरण करण्याला आणि चीनकडून शस्त्रास्त्रखरेदी थांबविण्याला नेपाळच्या राजाने नकार दिल्याबद्दल भारताने नेपाळशी असलेले आर्थिक व्यवहार गोठवले.

नेपाळी प्रसारमाध्यमांनी भारतविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आणि उत्तरेकडील सीमा खुली करून नेपाळने चीनकडून माल आयात करावा असा आग्रह धरला. नवीन नावाच्या अधिकाऱ्याने जीवला फोन करून ‘तुमच्या इनपुट्सवरून आवश्‍यक वस्तूंची व सामग्रीची दैनंदिन स्टॉक पोझिशन काय आहे हे तुमच्याकडून हेडक्वार्टर्सला समजलं पाहिजे,’ असं सांगण्यात आलं. ‘ज्या ब्यूरोकडे अनेक फालतू सोर्सेस आहेत आणि जो खराब कामगिरीमुळे लवकरच बंद करण्यात येणार आहे, त्याच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा कशी करू शकता?’ जीवने म्हटलं... अन् येथून पुस्तकातील रंगत वाढत जाते.

‘द झीरो कॉस्ट मिशन’

सतत प्रचंड प्रलोभनं तुमच्यासमोर आणून तुम्हाला सन्मार्गापासून भरकटवू शकणाऱ्या आणि तुमच्या व्यावसायिक प्रामाणिकपणाचा कस लावणाऱ्या माझ्या क्षेत्रात जिच्या कटू आणि गोड प्रतिक्रियांमुळे मी टिकू शकलो आणि माझी भरभराट झाली, अशा माझ्या पत्नीला... असं लेखक अर्पणपत्रिकेत म्हणतो, त्यावरून या क्षेत्रात काम करणं म्हणजे काय, याची कल्पना येऊ शकते. या पुस्तकातील कथा द झीरो कॉस्ट मिशन व वायली एजंट अशा दोन प्रकरणांत आहे.

पहिल्या कथेची सुरुवात ही दिल्ली, १९९२-९३ ची आहे. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी बोलाविलेली बैठक संपवून भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीचा प्रमुख जगजितसिंग औलख बाहेर पडला... येथून कथानकाला सुरुवात होते.

तर, दुसऱ्या कथेची सुरुवात ढाका, १९९३ पासूनची आहे. या पुस्तकातील प्रत्यक्ष कथानकाबद्दल ऐकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष पुस्तकात वाचणंच सयुक्तिक ठरेल. जमात-ए-इस्लामीच्या कारवायांमुळे भारत-बांगलादेश संबंध बिघडतात.

त्यासंबंधी ऑपरेशनबाबतचं कथानक यात आहे. प्रत्यक्ष कारवायांबरोबरच भारतीय अधिकारी पातळीवर काय काय होतं, अशा थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा यात आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बढती, अपमान, स्वेच्छानिवृत्ती यामागचं नाट्य या पुस्तकातून कळतं.

‘‘यातील बहुतांश पात्रं मरण पावली आहेत. जी जिवंत आहेत त्यांना त्या त्या मिशनमध्ये त्यांनी निभावलेल्या भूमिका परत वाचताना आनंद वाटेल अशी आशा... पण ज्यांनी मिशन्समध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता, ते बहुधा निराश होतील...’’ असं लेखक मनोगतात म्हणतात. थोडक्यात, गुप्तचर यंत्रणा आणि विभाग यांचं काम कसं चालतं हे ज्यांना माहीत नाही, त्यांना ही पुस्तकं वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. एजंट कोणत्या मानसिकतेतून जातात हेही कळेल. ही तिन्ही पुस्तकं वाचल्यानंतर आपण एवढंच म्हणू... ‘वाटतं तेवढं सोप नाही’....

पुस्तकाचं नाव : स्पाय स्टोरीज (तीन पुस्तकं)

‘टेरर इन इस्लामाबाद’

पृष्ठं : १३६ मूल्य: २०० रुपये

मिशन नेपाळ’

पृष्ठं : १६० मूल्य : २५० रुपये.

‘द झीरो कॉस्ट मिशन’

पृष्ठं : १६८ मूल्य : २५० रुपये

लेखक : अमर भूषण

मराठी अनुवाद : प्रणव सखदेव

प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (७०६६७३८८८८)

संपूर्ण संच मूल्य : ७०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com