‘सीमा’बंधनात ‘सरहद्द’ गांधींची नात!

‘सरहद्द दिलों को बाट देगी’ असे म्हणत भारत-पाकिस्तानच्या फाळणीला विरोध करणाऱ्या खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांची नात झरीन वॉल्श आपल्या मायभूमीत जाण्यास तळमळत आहेत.
‘सीमा’बंधनात ‘सरहद्द’ गांधींची नात!
sakal

‘सरहद्द दिलों को बाट देगी’ असे म्हणत भारत-पाकिस्तानच्या फाळणीला विरोध करणाऱ्या खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांची नात झरीन वॉल्श आपल्या मायभूमीत जाण्यास तळमळत आहेत. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असणाऱ्या झरीन सध्या मुंबईत एकट्या राहत आहेत. त्यांचे कुटुंबीय खैबर पख्तुनवा या पाकिस्तानच्या प्रांतात राहतात. अंथरुणात खिळलेल्या झरीन यांना आपले शेवटचे क्षण वाडवडिलांच्या मातीत, कुटुंबीयांसोबत घालवायचे आहेत; मात्र दोन देशांतील सीमा आणि कोविड संसर्गाने सरहद्द गांधींच्या या नातीचा मार्ग रोखला आहे.

सरहद्द गांधी, फ्रंटियर गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान हे भारत-पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. भारतरत्न मिळालेले ते पहिले परदेशी नागरिक. महात्मा गांधी यांच्या अहिंसा, सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानातून सरहद्द गांधी प्रभावित झाले होते. त्या वेळी पख्तुनिस्तानमध्ये कार्यरत सरहद्द गांधीनी ‘खुदाई खिदमदगार’ ही अहिंसक संघटना उभारून सीमेवर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष उभारला. म्हणून त्यांना ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाते. अशा स्वातंत्र्यसेनानींचा सर्वांत लहान मुलगा अब्दुल घनी खान, हेदेखील ब्रिटिश काळात भारतीय राजकारणात सक्रिय होते. झरीन ही त्यांची मुलगी, तर सरहद्द खान यांची नात.

झरीन यांचा जन्म ११ एप्रिल १९४४ रोजी शिमला येथे झाला. त्यांचे बालपण महात्मा गांधी, आजोबा सरहद्द गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेले. महात्मा गांधी यांचा सहवास फार कमी काळ लाभला असला, तरी छोट्या झरीनला पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरहद्द गांधी यांचे कार्य अगदी जवळून बघता आले. अनेक कार्यक्रम, चळवळी, आंदोलनांमध्ये त्यांना सहभागी होता आले. झरीन यांच्या आई हेल्ल्या रुस्तमजी फिरोदुलजी या ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या अध्यक्षा होत्या. हैदराबाद सरकारकडून बेगम नवाब रुस्तम जंग या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आईचा, आजोबांचा वारसा झरीन यादेखील चालवत होत्या. त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले होते.

मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झरीन यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आईच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले, रुग्णसेवेचा वसा घेतला. १९७० च्या सुमारास त्यांनी पारसी जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली. काही वर्षे काम केल्यानंतर त्या कॅनडामध्ये गेल्या. तिथेदेखील त्यांनी एका रुग्णालयात काम केले. याचदरम्यान त्यांची ओळख स्टेनली अर्नल्ड वॉल्श यांच्याशी झाली. त्याच्याशीच त्यांनी लग्नदेखील केले. लग्नानंतर त्या कॅनडात स्थायिक झाल्या.

झरीन यांचे काका फिरोजशाह आर्देरशर नारियलवाला हे मुंबईत राहत होते. त्यांना कुणीही वारस नव्हता. ते आजारी असल्याचे कळल्यानंतर त्यांची शुश्रूषा करण्यासाठी झरीन १९८३ मध्ये पतीसोबत मुंबईत परतल्या. यादरम्यान त्यांनी आपल्या काकाची वडिलांप्रमाणे सेवा केली. १९९७ मध्ये काका वारले. त्यानंतर झरीन यांनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. झरीन यांना मुलबाळ नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या मुलांमध्येच त्या रमायच्या. २०१३ मध्ये त्यांचे पती स्टेनली अर्नल्ड वॉल्श यांचे मुंबईत निधन झाले. स्टेनली वॉल्श हे मूळचे कॅनडा देशातील असल्याने त्यांच्या अस्थी कॅनडामध्ये घेऊन जाण्याची इच्छा झरीन यांची आहे. मात्र नंतर त्या सतत आजारी पडू लागल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. यानंतर झरीन पुन्हा एकाकी पडल्या.

झरीन अनेकदा पाकिस्तानात त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात. तिथे अनेक दिवस त्या राहायच्या. भाचे, सुना, नातवंडे यांच्यात रमत असत. पतीच्या घरी कॅनडामध्येदेखील जात असत. मात्र हळूहळू त्यांचे वय वाढले. थकल्या. आजारी पडू लागल्या. पाकिस्तानमधील त्यांचा भाचा मशाल खान हा अनेकदा त्यांना भेटायला मुंबईत येत असे. त्यांना पाकिस्तानमध्ये घेऊन जायचा. मशाल २०१३ मध्ये अस्थी घेऊन झरीन यांना पाकिस्तानात आपल्या घरी घेऊन गेला होता. त्याचदरम्यान झरीन आजारी पडल्या. त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. पाकिस्तानमध्ये झरीन यांच्यावर उपचार झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्या परत मुंबईत आल्या. त्यानंतर झरीन पुन्हा कधीही पाकिस्तानात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पतीच्या अस्थी विसर्जित होऊ शकल्या नाहीत. मशाल यांच्या पाकिस्तान येथील घरी त्या अस्थी जपून ठेवण्यात आल्या आहेत. झरीन पाकिस्तानात आल्यानंतर जपून ठेवलेल्या अस्थी कॅनडात विसर्जन करण्यात येणार आहे.

झरीन यांना अल्झायमरचा त्रास जाणवू लागला. हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. त्यांना बघायला त्यांची शुश्रूषा करायला दर तीन महिन्यांनी मशाल मुंबईत येतात; मात्र विजा संपल्यानंतर त्यांना मायदेशी पाकिस्तानात परतावे लागते. सध्या झरीन या अंथरुणाला खिळलेल्या आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाल्याने त्या कुणालाही ओळखत नाहीत. अन्न-पाणी त्यागले आहे. फळांचा रस घेऊन त्या एक-एक दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांची शुश्रूषा करण्यासाठी कायमस्वरूपी नर्स ठेवली आहे. नर्स त्यांची देखभाल करत आहे.

झरीन यांचे स्वातंत्र्यसेनानी आजोबा सरहद्द गांधी हे फाळणीपूर्व ब्रिटिश इंडियातील सीमेवरील पश्तुनी भागातील. त्यांची ती कर्मभूमी असल्याने तेथील अनेक आठवणी झरीन यांच्या स्मृतीत आहेत. फाळणीनंतर तो भाग पाकिस्तानात गेला. झरीन मात्र भारतात राहिल्या. उर्वरित कुटुंब पाकिस्तानात आहे. आपल्या आयुष्यातील उर्वरित क्षण आपल्या कुटुंबात, नातवंडासोबत घालवावेत, अशी इच्छा झरीन यांची होती; मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांना मायदेशात नेण्यासाठी कोर्टात लढाई सुरू आहे.

झरीन यांच्या देखभालीचे सर्व अधिकार त्यांचा भाचा मशाल यांच्याकडे आहेत. मार्च २००२ रोजी मशाल यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून झरीन यांना पाकिस्तानात नेण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर अनेकदा सुनावणी झाली; मात्र निर्णय अद्याप झालेला नाही. आता पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी आहे. न्यायालय आमची अडचण समजून घेईन आणि आम्हाला न्याय देईल, अशी आशा मशाल यांना आहे.

मशाल हे स्वत: सिव्हिल इंजिनियर आहेत. ते पाकिस्तान सरकारमध्ये अधिकारी होते; मात्र झरीन यांची देखभाल करण्यासाठी सतत मुंबईत यावे लागत असल्याने त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. सरहद्द गांधींच्या नातीला आयुष्यातील उर्वरित क्षण कुटुंबात, नातवंडासोबत घालवायचे आहेत. त्यासाठी त्यांना पाकिस्तान गाठायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com