

Marathi Children’s Literature
esakal
डॉ. श्रीरंग देशपांडे - saptarang@esakal.com
बाल-किशोरवयीन मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सकस बालवाङ्मय त्यांच्या हाती पडले पाहिजे. मोठ्या माणसांसाठी लिहिण्यापेक्षा बालवाङ्मय, मग ते गद्य असो की पद्य, हे लिहिणे फार आव्हानात्मक आहे. ते जसे मनोरंजनात्मक झाले पाहिजे, तसे संस्कारक्षमही असले पाहिजे. याशिवाय त्याचा आशय आणि त्याची ‘निर्मिती’ बालमनाला आकर्षित करणारी असली पाहिजे. या कसोटीवर उतरलेले उत्तम लेखन म्हणजे गणेश घुले यांची अलीकडेच प्रकाशित झालेली ‘झाड’ ही कादंबरी.
आपल्या कवितांसाठी ओळखल्या जाणाऱ्या घुलेंची ही पाहिली कादंबरी एका चांगल्या संदेशाबरोबरच उत्तम साहित्यमूल्य घेऊन आली आहे. पर्यावरणसंरक्षणाचा संदेश देणारे मध्यवर्ती कथानक आहे, पण त्यासोबतच मराठी शाळाची होणारी परवडही त्यांनी परखडपणे मांडली गेली आहे. निसर्ग, पर्यावरण अधोरेखित करणाऱ्या समकालीन बालकथा लेखकांमध्ये प्रामुख्याने ल. म. कडू, सलील मुल्ला, शंकर विभुते, स्वाती राजे, मिलिंद बोकील, लीला शिंदे, बाबा भांड इत्यादींची नावे डोळ्यांपुढे येतात. त्या यादीत आता गणेश घुले ह्यांची भर पडली आहे. पर्यावरण संवर्धानासाठी एक विशिष्ट संदेश देणारी कादंबरी म्हणून ‘झाड’चे महत्त्व अधोरेखित करावेसे वाटते.