"जिओ' तो स्मार्ट हो के ! (गौरव मुठे)

gaurav muthe
gaurav muthe

रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या तंत्र-उपकरणांशी संबंधित असलेल्या या प्रयोगशाळेत "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) हा घटक महत्त्वाचा असेल. स्मार्टफोनच्याही पुढं जात आता "आयओटी'वर आधारित सुविधा विकसित होत आहेत.

भारतात गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्यानं बदल होत चालले आहेत. तंत्रज्ञान दिवसागणिक प्रगत होत आहे. काल-परवा बाजारात आलेलं तंत्रज्ञान काही दिवसांतच सर्वसामान्य होऊन जातं आणि नवीन तंत्रज्ञान बाजारातल्या प्रवेशासाठी दार ठोठावत असतं. हीच तंत्रज्ञानातली नवता लक्षात घेऊन रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून टाकली असून, "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे.

जगणं अंतर्बाह्य बदलून टाकण्यासाठी रिलायन्स "जिओ'नं मुंबईत "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' उभारलं असून तिथं "प्रयोगशाळा' निर्माण करण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्राव्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या मदतीनं मानवी जीवन माफक दरात सुख-सुविधापूर्ण करण्याचा "जिओ'चा मानस असून, त्या दृष्टिकोनातून या सेंटरमध्ये काम चालणार आहे. केवळ टेलिकॉम कंपनी म्हणून काम न करता "जिओ' आता एक "डिजिटल इकोसिस्टिम' तयार करत आहे. नागरिकांचं यापुढचं आयुष्य आता "डिजिटल लाईफ' म्हणून ओळखलं जाणार आहे, हे लक्षात घेता "जिओ'च्या या तंत्र-उपकरणांशी संबंधित असलेल्या या प्रयोगशाळेत "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) हा घटक महत्त्वाचा असेल. स्मार्टफोनच्याही पुढं जात आता "आयओटी'वर आधारित सुविधा विकसित होत आहेत. येत्या काळात तंत्रज्ञानातलं विविध प्रकारचं संशोधन, या क्षेत्रात लागणारे नवनवे शोध आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आता नुसते ऍप्स न येता "इंटेलिजन्स ऍप्स' बाजारात येतील. म्हणजेच बिग डेटा आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट यांचा मिलाफ होऊन स्पर्शविरहित "गुगल असिस्टंट' वापरकर्त्यांच्या सेवेला हजर असेल.

घराचं "स्मार्ट' नियंत्रण
आयओटी आणि "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' वापरून "स्मार्ट कुलूप', "स्मार्ट पंखा', "स्मार्ट दिवे'
यांच्या निर्मितीला सुरवातही झालेली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असलेली ही "स्मार्ट' उपकरणं आता तंत्रज्ञानामुळं प्रत्येकाच्या घरात दिसू शकतील. म्हणजेच स्मार्टफोनधारकांना आपल्या घराचं "नियंत्रण' कुठूनही करता येणं सहजशक्‍य होणार आहे. उदाहरणार्थ ः तुम्ही बाहेर गेले असताना तुमच्याकडं कुणी पाहुणे आले तर तुम्ही घरी नसतानादेखील तुमचं "स्मार्ट होम' पाहुण्यांचं स्वागत करायला सज्ज असेल. कारण, घरी आलेल्या त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी घराचे दरवाजे तुम्ही कुठूनही उघडू शकता! घरी पाहुणा म्हणून आलेल्या त्या व्यक्तीनं घरासमोर बसवलेल्या मशिनवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्यानं हात ठेवल्यास त्या व्यक्तीच्या हाताचे ठसे तुमच्या स्मार्टफोनवर दिसतील. त्याच स्मार्टफोनवरून तुम्ही त्या व्यक्तीची ओळख पटल्याची आज्ञा दिल्यास घराचे दरवाजे त्या व्यक्तीसाठी उघडले जातील!

गाडी कोणतीही असो; ती होणार "स्मार्ट'
"आयओटी'मुळं आता जुन्या उपकरणांनाही "स्मार्ट' करता येणं शक्‍य होणार आहे. जुनी कार असली तर तीदेखील डिव्हायसेसमुळं "स्मार्ट' होणार आहे. भारतात सन 2013 नंतरच्या सगळ्या वाहनांमध्ये "ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक्‍स'चं (ओबीडी) पोर्ट वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून देण्यात आलेलं आहे. "जिओ'नं ते पोर्ट विकसित केलं असून त्याद्वारे बॅटरी, मायलेज, गाडीतल्या इंधनापासून ते ब्रेक ऑईलपर्यंतची कारची सगळी माहिती गाडीमालकाच्या स्मार्टफोनवर मिळणार आहे. साधी असलेली कार "ओबीडी' पोर्टमुळं "स्मार्ट' होणार आहे. त्यामुळं कारमध्ये "हॉटस्पॉट' उपलब्ध होणार असून, धावत्या गाडीत लाईव्ह मनोरंजनाचे कार्यक्रम बघता येणार आहेत. शिवाय, सुरक्षितेच्या दृष्टीनं खास उपाययोजनाही करण्यात आल्या असून, चालकानं अनवधानानं किंवा जाणूनबुजून चुकीचा रस्ता निवडल्यास गाडीमालकाला ते काही सेकंदात समजणार आहे.

"स्मार्ट' आरोग्य
तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगतीमुळं माणसाचं आयुर्मान वाढलं आहे. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळं इतर आजारही बळावले आहेत. यावरदेखील तंत्रज्ञानानं मात करत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी "जिओ हेल्थ क्‍लब' उपक्रमांतर्गत पर्याय विकसित केला आहे. "जिओ' करत असलेल्या "हेल्थ ट्रॅकिंग'मध्ये तुम्ही आरोग्याशी संबंधित माहिती साठवून ठेवू शकणार आहात. शिवाय, तुमच्या डॉक्‍टरांनी दिलेलं "प्रिस्क्रिप्शन' आणि त्यावर झालेला खर्चही तुम्ही संग्रहित करून ठेवू शकणार आहात. तुमच्या परवानगीनं तुमचं जुनं "प्रिस्क्रिप्शन' किंवा तुमच्या आरोग्यासंबंधीची सगळी माहिती तुम्ही डॉक्‍टरांशी शेअर करू शकणार आहात.

टीव्ही "स्मार्ट' झाला!
सध्या टीव्हीमध्ये असंख्य प्रकार आहेत. बाजारात गेल्यावर फोर के, थ्रीडी टीव्ही किंवा क्‍यूएलईडी असे अनेक पर्याय भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरताना दिसतात. मात्र, अशा वेळी घरातल्या जुन्या एलसीडीचं किंवा एलईडीचं काय करायचं, असा प्रश्न पडतो. मात्र, आता स्मार्ट डिव्हायसेस फक्त कारपुरतेच मर्यादित राहणार नसून, त्यांच्यामुळं सध्याचे एलसीडी किंवा एलईडी टीव्ही "स्मार्ट टीव्ही' म्हणूनही वापरता येणं शक्‍य होणार आहे.

नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन स्टिक यांसारख्या गोष्टी वापरून टीव्ही "स्मार्ट' करता येतो; पण "जिओ'नं याला देशी स्वस्त पर्याय उपलब्ध करून देत "फायबर सेट टॉप बॉक्‍स'ची निर्मिती केली आहे. त्यामुळं पावसाळ्यातदेखील कोणत्याही अडथळ्याशिवाय मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. शिवाय, तुमचा टीव्ही फक्त तुम्ही सांगत असलेल्या आज्ञेचं पालन करणार आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी हातात "रिमोट' ठेवण्याची गरज नाही. तुम्ही टीव्हीला फक्त सांगायचं...तो ते ऐकून ग्रहण करेल आणि पुढच्या सेकंदाला संबंधित कार्यक्रम तुमच्या टीव्हीवर दिसू लागेल. म्हणजेच टीव्ही "आवाजी नियंत्रणा'तून चालतील. शिवाय, "जिओ'च्या स्लिमफिट ऍडॅप्टरच्या आणि एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून मोबाइलसुद्धा टीव्हीशी जोडता येणार आहे.

अमेरिकेत दरवर्षी "कन्झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो' म्हणजेच "सीईएस' हा तंत्रज्ञानविषयक मेळावा आयोजिला जातो. नवनवीन तंत्रनाज्ञाच्या साह्यानं भविष्यात येणाऱ्या उपकरणांची ओळख ग्राहकाला या मेळाव्यातून होते. तंत्रजगताला या प्रदर्शनाची कायमच ओढ लागलेली असते. भारतीय कंपन्यादेखील आता या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. यंदा लास वेगासमध्ये या क्षेत्रातल्या विविध शोधांची-संशोधनांची झलक पाहायला मिळाली. इंटेल, एलजी आणि ऍपलसारख्या अनेक मोठ्या कंपन्या यात सहभागी होत असतात. "ऍपल'नंही "होमकिट' श्रेणीतली उत्पादनं या मेळाव्यात सादर केली होती. गुगलच्या पावलावर पाऊल ठेवत एलजीनं "थिनक्‍यू स्मार्ट स्पीकर' आणला असून, विशेष म्हणजे हा स्पीकर घरातल्या एलजीची सगळी "स्मार्ट' उपकरणं नियंत्रित करतो.

"स्मार्ट' चार्जिग
तंत्रज्ञानामुळं माणसाचं जीवन सुखी झालं आहे, हे जरी खरं असलं, तरी तो तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबूनही राहू लागला आहे. परिणामी, माणूस अनेक गोष्टी विसरू शकतो, मात्र तो "स्मार्ट फोन' कधीच विसरत नाही! त्यामुळं तो सतत चार्जदेखील केला जातो. मात्र, चार्जिंग वायरसह चार्जर सांभाळणं कठीण जातं म्हणूनच "वायरलेस चार्जिंग' ही संकल्पना पुढं आली. मोबाईलची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या महागड्या स्मार्टफोनमध्ये "वायरलेस चार्जिंग'ची सुविधा दिली आहे. फोन एका "चार्जिंग मॅट'वर ठेवल्यावर चार्ज होतो. त्यात "चार्जिंग मॅट' विद्युतप्रवाहाशी जोडलेली असते.

"सीईएस'मध्ये यंदा आकर्षण होतं ते "स्मार्ट चार्जिंग'चं. "पॉवरकास्ट' नावाच्या परदेशी कंपनीनं "सीईएस'मध्ये स्मार्ट फोन चार्जिंगसाठीचं एक संशोधन सादर केलं. यात एक ट्रान्समीटर ठेवण्यात आला असून, त्याद्वारे 80 फूट अंतराच्या परिघातली सगळी उपकरणं एकाच वेळी चार्ज होऊ लागतात. ट्रान्समीटरद्वारे विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करून "वायफाय'प्रमाणे परिघातली उपकरणं चार्ज होऊ लागतात.
तंत्रज्ञान दिवसागणिक प्रगत होत चाललं आहे, त्यामुळं आता भविष्यात प्रत्येकानं "जिओ तो 'स्मार्ट' हो के!' हा मंत्र जपला पाहिजे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com