काही आंबट, काही गोड

आपल्याला रानात मिळणाऱ्या भाज्यांत-फळांत नेमकं काय आहे...
Gayatri Oak writes about Nutrients fruits and vegetables that we get in forest
Gayatri Oak writes about Nutrients fruits and vegetables that we get in forestsakal
Summary

आपल्याला रानात मिळणाऱ्या भाज्यांत-फळांत नेमकं काय आहे

गायत्री ओक

रानफळांमध्ये बरीच पोषणतत्त्व आहेत. त्यावर खूप संशोधन झालंय. शाळेच्या पुस्तकात आहाराच्या धड्यामध्ये विविध अन्नपदार्थ, त्यातून मिळणारी पोषणतत्त्वे, होणारे फायदे असा एक तक्ता असतो. मात्र पाठ्यपुस्तकात सर्वसामान्यतः मिळणारी फळे-भाज्या यांची माहिती मिळते. रानात-जंगलात मिळणाऱ्या अन्नघटकांबाबत पुस्तके काही सांगत नाहीत. आपल्याला रानात मिळणाऱ्या भाज्यांत-फळांत नेमकं काय आहे, हे सांगणारे तक्ते आम्ही गावात लावले... जंगल फक्त संसाधन नाही, ते असा आनंदाचा स्रोत आहे.

उन्हाळा सुरू झालेला असतो. राबासाठी खांडलेल्या झाडांमुळं ऊन जास्तच तापल्यासारखं वाटतं. जंगलफेरी सुरू होतानाच ‘परत फिरूया’ असं वाटायला लागतं; पण मुलांबरोबरची ही खास जंगलफेरी अशी संपत नाही. वाळलेल्या ओहळाच्या काठाला लागून उक्षीचे घोसच्या घोस फुललेले असतात. हे हिरवे, फिकट रानटी वासाचे घोस लगडलेल्या काठ्या हातात घेऊन पोरं ते नाचवत चाललेली असतात. ओहळाच्या बाजूने चालता-चालता कहांडोळीचं मोठ्ठं फांद्या पसरून उभं असलेलं झाड लागतं. आपण त्याच्या पानं नसलेल्या पांढऱ्या अवताराकडे ऑ करून पाहत असतानाच पोरं झाडाखाली शोधाशोध करायला लागलेली असतात. ‘याच्या बिया खायच्या.’ कोणीतरी सांगतं. ते ऐकून कहांडोळीचं फळ उचलायला जावं तर त्यावरचे कुसळासारखे केस हातात शिरतात. आपल्या सोबतची एक धिटुकली सांगते, ‘ते हातात गेले ना तर हात केसांवर घासायचा मग जातात!’ ‘सारो (मैना) असते ना, ती कहांडोळीची फळं घेऊन जाते. फक्त फळ खाते आणि बिया खाली टाकते. मग त्या बिया आम्ही खातो’ हात साफ करता करता हे ज्ञान पदरात पडतं. तेवढ्यात कोणीतरी कुकरवळाच्या बिया आणून दिलेल्या असतात. ‘या ना भाजून खायच्या, मस्त एकदम. कच्च्या तरी खातात, पण जास्त नको खाऊ, माजवतं (नशा येते!)’

कुंभीच्या झाडाखाली पांढरी, धागे-धागे असलेली फुलं पडलेली असतात. हे फूल देठापासून गळून पडतं तेव्हा फुलाच्या तळाशी एक मस्त गोल भोक तयार झालेलं असतं. कोणीतरी पोरगं निघतंच, जे अगदी जमिनीला डोकं लावून त्या भोकातून आरपार पाहायचा प्रयत्न करतं.डोंगर चढताना मोठमोठ्या शिळांच्या मधून गुहा तयार झालेल्या असतात. गुहा म्हटल्यावर त्यांच्या गोष्टीही आल्याच. ती कॉमेंटरी चालू असते. गप्पा थोड्या थांबतात करवंदाची झुडपं लागली की. आपण हावरटासारखं करवंद काढताना मुलांच्या सूचना चालूच असतात. ‘ही करवंद कडू आहेत. ती वरची करवंद आहे ना, तिची फळं हिरवी आहेत, पण ती आतून पिकलेली असतात.’ या ज्ञानावर शंका घ्यायची नाही. खरंच त्यांनी कडू म्हटलेली करवंद कडू आणि ‘पिकेल आहेत’, असं म्हटलेली करवंद हिरवी दिसली तरी आतून पिकलेली निघतात.

कोसंबाची हिरवी फळं जाम आंबट. फळांच्या चवी आम्ही लिहायला घेतल्या तेव्हा काही फळांच्या चवीचं आंबट, गोड असं वर्णन नाही करता आलं. मग आम्ही सरळ ‘चव सांगता येत नाही’ असा एक नवीन प्रकार करून टाकला.ओहोळात कुठे पाणी साठलेली जागा निघाली तर मात्र अजून किती वेळ जाईल सांगता येत नाही. त्या आटत आलेल्या पाण्यात दगडांखालचे खेकडे धरायचं कोणाच्या डोक्यात आलं की शांतपणे काठावर सावली बघून ताणून द्यायचं. पाणी असलेला एकमेव डोह सापडला, तर मग आजची जंगलफेरी इथंच पूर्ण झाली. काठावरच्या उंबरावरून त्या बारक्या डोहात धडाड उड्या मारत आंघोळ करत राहतील पोरं. आणि आपल्यालाही पाण्यात उतरायचा मोह आवरणार नाही. पोरांबरोबर जंगल शिकायचं म्हणजे वेळ ठेवूनच जायला हवं.

गुरांमागे हिंडताना, दूध काढून पळसाच्या द्रोणात घ्यायचं. काळ्या कुडीच्या चिकाचे काही थेंब त्यात टाकायचे. मस्त दही बनतं. आंबट नाही अजिबात. ज्यांनी ज्यांनी आपलं बालपण गुरांमागे हिंडण्यात घालवलंय त्यांच्याकडे जंगलातल्या अशा खूप आठवणी असतात. मोठ्यांकडून अशा आठवणी ऐकायला मिळतात. पोरांबरोबर फिरताना ही गंमत पाहायला मिळते. पोरं जंगलात हिंडतात. फळं खातात. उन्हाळा संपत येताना शेवळासारख्या भाज्या आणायला जातात. ओहळावर मासे धरतात. आईबाबांबरोबर कामंही करतात. हे सगळं करत असताना त्यांच्या-त्यांच्या अशा मजेच्या कितीतरी जागा त्यांनी शोधलेल्या असतात. त्यात त्यांना जंगलाची माहिती केवढी आहे हे दिसत राहतं.

अशा दहा जंगलफेऱ्या आम्ही पोरांसोबत केल्या. जंगलातल्या फळांबद्दल गप्पा मारल्या. मोठी, पोक्त माणसं अशी जंगलातली फळं गोळा करत हिंडत नाहीत, करवंदावर जात नाहीत. त्यांच्या लहानपणी त्यांची ही धमाल करून झालेली असते. जंगलातली फळं माहिती करून घ्यायला मुलांबरोबरच फिरायला पाहिजे. जंगलातल्या फळांची यादी काही ठिकाणी पंचवीसच्या पुढे गेली. बरीचशी उन्हाळी फळं, काही पावसाळीसुद्धा. काहींचा मांसल भाग खायचा, काहींच्या बिया खायच्या. मुलांनी गावाचा नकाशा काढला, त्यावर फळांची ठिकाणं नोंदवली. जंगलात फिरताना फोनवर जीपीएस लॉगर ॲप सुरू केलं, त्यावर फळांची लोकेशन्स टाकली. नंतर गुगल अर्थवर ते नकाशे उघडून पाहिले. कोणती फळं जंगलात कमी झाली आहेत, कोणती फळं अजून भरपूर मिळतात. त्यांच्या चवी कशा आहेत, अशा सगळ्या सगळ्यावर गप्पा झाल्या. ही माहिती लिहूनही काढली. आम्ही जंगलात हिंडताना काय काय घडतं त्याच्या गोष्टीही मुलांनी लिहिल्या.

या सगळ्या मजा मजा करताना फळं तोंडात टाकत जाणं, हे इतकं सहज दिसलं तरी या गोष्टीचं महत्त्व मोठं आहे. उन्हाळ्याच्या काळात आमच्या गावात कित्येक गावं कामासाठी स्थलांतरित होतात. आई-बाप मुलांना म्हाताऱ्या आजी-आज्याच्या हवाली करून मजुरीला बाहेर पडतात. अशावेळी ही फळंच मुलांचं एरवीच्या आहारातून पूर्ण न होणारं भरणपोषण करत असतात.

या सर्व रानफळांमध्ये बरीच पोषणतत्त्वं आहेत. त्यावर खूप संशोधन झालंय. शाळेच्या पुस्तकात आहाराच्या धड्यामध्ये विविध अन्नपदार्थ, त्यातून मिळणारी पोषणतत्त्वे, त्यातून होणारे फायदे असा एक तक्ता असतो. मात्र पाठ्यपुस्तकात सर्वसामान्यतः मिळणारी फळे-भाज्या यांची माहिती मिळते. रानात-जंगलात मिळणाऱ्या अन्नघटकांबाबत पुस्तके काही सांगत नाहीत. त्यातून मग आसपास सहज आणि फुकट उपलब्ध असलेल्या अन्नाविषयी अनास्था वाढत जाते. बाजारात मिळणारी आणि इथल्या वातावरणात न होणारी संत्री नि सफरचंदच मोलाची वाटू लागतात. आपल्याला रानात मिळणाऱ्या भाज्यांत-फळांत नेमकं काय आहे, हे सांगणारे तक्ते आम्ही गावात लावले. मुलांनी फळं खाताखाताच ही माहितीही समजून घेतली आणि ग्रामसभांमध्ये ती गावातल्या मोठ्या माणसांनाही सांगितली.

‘‘भाज्या-फळं तर जंगलच वाढवत आहे. ना त्यासाठी आपल्याला पैसे टाकावे लागतात, ना खते घालावी लागतात, ना फवारावे लागते. मग ही फळे मिळायची तर आपण काहीतरी करायला हवं’’ अशा चर्चा ग्रामसभांमध्ये झाल्या. आतापर्यंत औषधी वनस्पती, भाज्यांचा अभ्यास, पाण्याच्या जागा अशा बाबींची माहिती मोठ्यांनी जमवली. आता मुलांचंही जंगलनिरीक्षण या अभ्यासात आलं.

जंगलातल्या मजेच्या गोष्टी केवढ्या मौल्यवान आहेत, याची जंगलात हिंडत जाम धमाल करणाऱ्या पोरांच्या टोळीला जाणीवही नाही. जंगल फक्त संसाधन नाही, ते असा आनंदाचा स्रोत आहे.

(लेखिका वयम्‌च्या कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com