ही जोडी ‘ बेमिसाल ’...

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com
Sunday, 3 January 2021

अ-अमिताभचा...
महानायक अमिताभ बच्चन यांची अनेक दशकाची कारकीर्द कुणालाही प्रेरणादायी अशी आहे. याच झगमगत्या कारकीर्दीचा वेध...

‘यशासारख यशच असतं’ या उक्तीनुसार १९७३ मध्ये ‘जंजीर’चं नाणं वाजल्याबरोबर अमिताभमधल्या असल्या-नसल्या सगळ्या गुणांची वाहवा होऊ लागली. पण या सगळ्यात एक नजर होती जिच्यामध्ये बंगाली संस्कृतीची शिस्त होती, ती नजर होती हृषीकेश मुखर्जींची. दिलीपकुमार, राज कपूर, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा नामवंतांना दिग्दर्शित करणारे आणि त्या सर्वांच्या आदरास प्राप्त ठरलेले हृषीदा. अमिताभ बच्चन नावाच्या येऊ घातलेल्या तुफानाबद्दल ‘जंजीर’च्या आधीच ते आश्वस्थ होते. हृषीकेश मुखर्जीनी ‘आनंद’ या राजेश खन्नाच्या हिट्ट चित्रपटात अमिताभला त्याच्यासमोर उभं केलं. हिंदी चित्रपटाचा पहिला सर्वमान्य सुपरस्टार पुढ्यात असताना सतत पडक्या सिनेमांची रांग लावलेल्या अमिताभसारख्या तेव्हाच्या अपयशी नटाला सहनायक म्हणून त्याच्यासमोर उभं करणं, यातच हृषीदांच्या पारखी नजरेतील अमिताभ विषयीच्या विश्वासाची ग्वाही होती. 

१९७३ च्या शेवटी शेवटी राजेश खन्ना – अमिताभ जोडीचा दुसरा आणि निर्णायक मुकाबला ‘नमक हराम’च्या निमित्तानं हृषीदांनी सादर केला. अमिताभसमोर दुसऱ्यांदा बेसावधपणे उभं राहण्याची चूक राजेश खन्नाला जड गेली. ‘कौन है, वो माई का लाल... जिसने अपनी माँ का दूध पिया हो, वो सामने आये’ या एका डायलॉगमधून चित्रपट सृष्टीचं पुढचं अर्धशतक हलवून सोडणाऱ्या‘अँग्री यंग मॅन’ ने अवतार घेतला होता. कुठलाही गाजावाजा अथवा श्रेयवादात न पडता ह्रषीदांनी ही कमाल केली होती. ‘जंजीर’च्या आधीच अमिताभमधला अंगार ओळखणाऱ्या ह्रषीदांनी लगेच त्याच्या तसल्या भूमिकांचा रतीब घालणं सुरू केल नाही.

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘आनंद’ मधला गंभीर बाबूमोशाय, नमक हराम मधला श्रीमंत, माजोरा पण सच्चा मित्र दाखवून झाल्यानंतर ‘अभिमान’ या संगीतमय सिनेमात त्यांनी अमिताभ आणि जया भादुरीला सोबत घेउन एक अत्यंत नाजूक वळणाची कथा साकारली होती. इथं अमिताभनं जवळ जवळ अँटी-हिरो रंगवला होता. गायनाच्या क्षेत्रात बायकोला आपल्यापेक्षा अधिक प्रसिद्धी, पैसा मिळतो आहे हे पाहून अभिमान दुखावलेला हा पुरुष ‘अँग्री यंग मॅन’ च्या पठडीतीलच होता. बायकोच्या यशामुळं चिडचिडा झालेला अमिताभ जेव्हा इर्षेने उफाळून येतो, तेव्हा लक्षात येते की ‘अँग्री यंग मॅन’चे सादरकर्ते हृषीदा होते. इतकंच कशाला, १९७५ मध्ये जेव्हा अमिताभ जंजीर, मजबूर, दिवार, शोले च्या यशावर स्वार झाला होता तेव्हा ह्रुषिदांनी त्याला ‘मिली’ नावाच्या छोट्या बजेटच्या चित्रपटात घेऊन पुन्हा एकदा त्याच्यातील ‘अँग्री यंग मॅन’ वेगळ्या पद्धतीने दाखवला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेनं आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्याने कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. १९७९ मध्ये ह्रषीदांच्या दिग्दर्शनात राखी-अमिताभ चा ‘जुर्माना’ चित्रपट आला होता. लता मंगेशकर-आर.डी बर्मन यांची बेमिसाल गाणी या चित्रपटात होती आणि अत्यंत महागड्या सुटा-बुटातील राजबिंडा, श्रीमंत अमिताभ. तारुण्य आणि पैसा दोन्हीची मिजास कशी दाखवायची ते शिकायचे ‘जुर्माना’ मधील अमिताभकडून. १९८२ मध्ये आलेला ‘बेमिसाल’ कोण विसरू शकेल. ‘ये काश्मीर है’ आणि ‘किसी बात पे मै किसी पे खफा हूँ’ या गाण्यातील अमिताभ बघावा आणि धन्य होऊन जावे. दुहेरी भूमिकेतल्या या चित्रपटातले अमिताभचे चरित्र ह्रषीदांनी जगावेगळे रंगवले होते.

जीव लावणारा मोठ्या मनाचा भाऊ, मित्र, सखा आणि अशा व्यक्तिमत्वाला किनार, अन्यायाविरुद्धच्या रागाची. ह्रषीदांनी अमिताभ मधील स्फोटक ‘अँग्री यंग मॅन’ बॉक्स ऑफिस वर डोळा न ठेवता त्यांच्या प्रत्येक सिनेमात प्रामाणिकपणे सादर केला होता.१९७५ मध्ये प्रदर्शित  ‘चुपके-चुपके’ विसरून कसे चालेल. ओमप्रकाश, धर्मेद्र आणि अमिताभच्या उच्च दर्जाच्या विनोदाने ओतप्रोत भरलेला हा चित्रपट. इंग्रजीचा प्राध्यापक असूनही वनस्पतीशास्त्राची विद्यार्थीनी असलेल्या जया भादुरीची शिकवणी घेणारा अमिताभचा नर्मविनोदी  प्रा. सुकुमार सिन्हा सर्व भूमिकांपेक्षा वेगळा होता. ही एक भूमिका वगळता अमिताभ आणि ह्रषिदांनी संयम राखून रागाची पेरणी करणारा ‘अँग्री यंग मॅन’ आपल्या हृदयात कधी रुजवला ते आपल्या लक्षात देखील आले नाही.
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक  आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gb deshmukh Writes about actors