esakal | अमिताभची रुबाबदार खुन्नस !

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan
अमिताभची रुबाबदार खुन्नस !
sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

‘खुन्नस देणे’ हा प्रकार जर प्रत्यक्ष बघायचा असेल तर मनमोहन देसाईंचा ‘परवरीश’ चित्रपट बघावा. या चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारे ‘हम प्रेमी, प्रेम करना जाने’ हे गाणं ज्यानं बघितले त्याला अमिताभच्या नजरेतून अक्षरशः खुन्नस मिळून जाईल. १९७७ या एकाच वर्षात प्रदर्शित झालेला देसाईंचा हा चौथा सुपरहिट चित्रपट. त्यांच्या चित्रपटात सगळं काही हसत खेळत होऊन शेवट गोड होत असे. प्रत्येक फ्रेममध्ये अमिताभ असणं ही त्या काळाची गरज देसाईनी ओळखली होती.

या कथेत अमिताभ पोलिस इन्स्पेक्टर आणि त्याचा भाऊ विनोद खन्ना स्मगलर असतो. वडील शम्मी कपूर पोलिसदलाचे सर्वोच्च पद म्हणजे आय.जी. असतात. लहानपणीच वाईट रस्त्याला गेलेल्या विनोद खन्नाचा असा गैरसमज असतो की आपण शम्मी कपूरचे पुत्र नसून चित्रपटातला खलनायक अमजद खानचे पुत्र आहोत.

या गैरसमजातून विनोद खन्ना अमजद खानच्या वाईट धंद्यात सामील असतो. एका पोलिस कारवाईचे वेळी आपला भाऊ अयोग्य मार्गावर भरकटला आहे असे अमिताभच्या लक्षात येते. घरी परतल्यावर अमिताभ विनोद खन्नाला गुन्हा कबूल करून शरण येण्यास सांगतो पण आपण गुन्हेगार आहोत हेच तो मान्य करत नाही.

आपल्या भावाच्या खोटारडेपणावर संतापलेला अमिताभ आणि आपण त्या गावचेच नाही असे भासवणारा विनोद खन्ना यांची सलामी झडते ती वडिलांच्या म्हणजेच शम्मी कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत. आता समोर सादर होणार असते, थ्री पीस सूट घातलेल्या तीन अत्यंत देखण्या आणि राजबिंड्या पुरुषांचे शानदार गाणे. मोठ्या वाड्यातील दिवाणखान्यासारख्या कमानी असलेला भव्य हॉल. अंध मुलांचा बँड, पाहुणे मंडळी, पांढऱ्या शुभ्र सुटामध्ये सत्याची बाजू घेऊन अमिताभ, काळ्या सुटात खोटारडा विनोद खन्ना आणि दोघांवरही सारखेच प्रेम करणाऱ्या गुटगुटीत शम्मी कपूरचा सूट करड्या रंगाचा असतो. ‘हम प्रेमी प्रेम करना जाने, कहे न दिलकी बात सदा चूप रहना जाने ’ अशी मोहम्मद रफीच्या रुहानी आवाजात पहिली तान विनोद खन्ना घेतो त्यास ‘प्यार के दुश्मन को हजारो मे पहचाने, हम प्रेमी प्रेम करना जाने’ असे उत्तर संतप्त अमिताभ कडून येते, हीच ती खुन्नस !

प्रत्यक्ष भांडण, मारामारी, बाचाबाची जो परिणाम देऊ शकणार नाही तो परिणाम मजरूहचे शब्द देऊन जातात आणि दोन आकर्षक व्यक्तिमत्त्वांच्या मतभेदांची तीव्रता आपल्यापुढे व्यक्त होते. ‘अपनो से जब ठेस कोई लग जाती है, हिम्मत अपनी और भी बढ जाती है ‘ अशी मखलाशी करू पाहणाऱ्या विनोद खन्नाला अमिताभ ‘ये मत भुलो ऐसेही दिवानो के पैरो में जंजीर भी पड जाती है’ असे म्हणत असताना कोपऱ्यातील एका रोमन शिल्पाची लोखंडी साखळी एका हाताला हातकडीसारखी गुंडाळून दाखवत परिस्थितीची जाणीव करून देतो. त्या साखळीची दोघांमधील सहज देवाण-घेवाण कलाकारांच्या उच्च दर्जाची साक्ष देऊन जाते.

वडिलांच्या पदाचा प्रभाव दाखवू पाहाणाऱ्या गुन्हेगार विनोद खन्नाला ‘मुजरीम को परदा छुपा ना पायेगा, चिंगारीके खेल में जल जायेगा’ असा इशारा देत अमिताभ गाणं पुढं नेतो. या वाक्यावर अमिताभच्या चेहऱ्यावरील संताप आणि पोटतिडीक वातावरणातील गांभीर्य अधोरेखित करते. हा एक क्षण बघण्याकरिता हा सिनेमा नक्कीच बघायला हवा. नृत्य निर्देशक कमल, गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग आणि संगीतकार लक्ष्मीकान्त-प्यारेलाल. या गाण्यात अमिताभने व्यक्त केला आहे रुबाब, संताप, आणि संयम. अभिनय ही कला डोळ्यात साठलेली असते. या गाण्यातल्या तणावाचं वर्णन शब्दात होण कठीणच. तो तणाव, ती खुन्नस अनुभवावी अमिताभच्या डोळ्यात. गाण्यातील तणाव टिपेला जातो तेव्हा बाळसेदार शम्मी गळ्यात एकॉर्डिअन अडकवून उताराची धून वाजवतो आणि नवख्या शैलेंद्र सिंगच्या आवाजात ‘आपसमे टकाराना कैसा, गाओ मिलकर साथ मेरे’ असे म्हणत वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करतो. ‘हम प्रेमी प्रेम करना जाने’ हे पॅकेज सादर करणाऱ्या ह्या सगळ्या देखण्या हिरोंना केवळ सलामच करावा. तीन दमदार कलाकारांचे नृत्य,अभिनय आणि अमिताभनं दिलेली रुबाबदार खुन्नस अजमावण्यासारखी होती. याच रुबाबदार अमिताभला १९७९ मध्ये ‘ सुहाग’ चित्रपटात मनमोहन देसाईंनी मुंबईच्या एका टपोरी तरुणाच्या भूमिकेत सादर केले होते.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)