नांदी अमिताभ पर्वाची

मुळात अमिताभची या चित्रटातली व्यक्तिरेखा चित्रपटाच्या सूत्रधारासारखी आहे. त्याच्या वाणीतून फ्लॅशबॅकमध्ये आनंदची कथा सुरू होते.
Amitabh Bachchan and Rajesh Khanna
Amitabh Bachchan and Rajesh KhannaSakal

‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका साकारली होती. ‘आनंद’मधील राजेश खन्ना बघावा आणि त्याच्या प्रेमात पडावं इतका सहज, सुंदर अभिनय त्यानं केला होता. राजेश खन्नाचा सहनायक म्हणून जेवढी जागा वाट्याला आली तिचं अमिताभनं सुद्धा सोनं करून ठेवलं. राजेश खन्नाच्या झंझावातापुढं हे ताड-माड-झाड जरासंही झुकलं नाही. जडलेला कर्करोग आणि आयुष्य अवघ्या काही महिन्यांचं उरलंय या गोष्टीची पूर्ण कल्पना असूनही जीवन पूर्ण जिंदादिलीनं जगण्याची कला अवगत असलेला आनंद हा कर्करोगग्रस्त रुग्ण राजेश खन्नानं जबरदस्त रंगवला होता. यावरच्या उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञ डॉ. भास्कर बनर्जी (अमिताभ बच्चन) या अत्यंत गंभीर प्रवृत्तीच्या व्यक्तीकडं मुंबईला आलेला आनंद लवकरच त्याच्याशी मैत्री जोडून त्याचं नाव ‘बाबूमोशाय’ ठेवतो. आनंदच्या खुशमिजाज व्यक्तिमत्त्वावर भाळलेला बाबूमोशाय त्याची दिवसेंदिवस मृत्यूकडं चाललेली वाटचाल बघून उद्विग्न झालेला असतो.

मुळात अमिताभची या चित्रटातली व्यक्तिरेखा चित्रपटाच्या सूत्रधारासारखी आहे. त्याच्या वाणीतून फ्लॅशबॅकमध्ये आनंदची कथा सुरू होते. क्षणाक्षणानं आनंद मृत्यूच्या दिशेनं सरकत असतो, पण आनंदऐवजी अमिताभच्या चेहऱ्यावर मरणकळा स्पष्ट वाचली जाऊ शकते. आनंदनं त्याच्या आजाराला हलकेपणानं घेणं एका गंभीर प्रवृत्तीच्या डॉक्टरला अजिबात रुचलेलं नसतं. तरी तो आनंदचं बिनधास्त वागणं सहन करत त्याची बडबड ऐकत असतो, त्या बडबडीतून निर्माण होणारे आनंदाचे क्षण जगत असतो. आनंदच्या आजाराचं गांभीर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं महत्त्वाचं काम अमिताभनं कमालीच्या अचूकतेने पार पाडलं होत. वैद्यकीय व्यवसायातील अनैतिक गोष्टींची चीड असलेला आणि कुठलीही बेशिस्त खपवून न घेणारा ‘बाबूमोशाय’ गंभीर आणि वेगळाच होता. हृषीकेश मुखर्जींच्या दिग्दर्शनाची गुलजारच्या गीत/संवादांची, योगेशच्या गीतांची आणि सलील चौधरींच्या संगीताचा मनमुराद आनंद लुटत असताना प्रेक्षकांना आनंदच्या आजाराची चिंता सतावत असते. पुढं काय? हा प्रश्‍न आनंदच्या स्वच्छंदीपणाच्या पलीकडे जाऊन ताण वाढवत असतो. आनंदच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच आनंदचा लळा लागतो. मुरारीलालच्या भूमिकेतील जॉनी वॉकरने आनंदची शेवटची भेट संपेपर्यंत धरून ठेवलेल्या उसन्या अवसानाचा बांध खोलीच्या बाहेर आल्यानंतर फुटून वाहू देण्याचा प्रसंग हृदय हेलावणारा आहे. असे प्रसंगही हिंदी चित्रपटांची सौंदर्यस्थळं बनून गेली आहेत.

आनंद मृत्युशय्येवर आहे, अंत जवळ आलेला असतो, तशात अगतिक झालेला अमिताभ, स्वत: कर्करोगतज्ज्ञ असूनसुद्धा, काहीतरी करावे म्हणून एका होमिओपॅथिक डॉक्टरकडे औषध आणायला जातो. इकडे त्या दोघांत झालेल्या जुन्या संवादाची टेप ऐकण्याची इच्छा राजेश खन्ना व्यक्त करतो. ते ध्वनिमुद्रण अर्ध्यात असताना राजेश खन्ना प्राण सोडतो. औषध घेऊन परत आलेला अमिताभ मृत राजेश खन्नाला शोकसंतप्त अवस्थेत त्याची सहा महिन्यांपासून सुरू असलेली बकबक सुरू ठेवण्यास सांगतो आणि आश्‍चर्य घडते. बाजूला सुरू असलेल्या टेपरेकॉर्डरमधून राजेश खन्नाचा आवाज कानी पडतो ‘बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है जहापनाह, उसे न तो आप बदल सकते है न मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ है जिनकी डोर उपरवालेके हाथ मे हैं, कौंन कब कहां उठेगा, कोई नहीं जानता...हा हा हा...’ पुढे बारावीला आम्ही हायर लेव्हल इंग्रजी घेतलं तेव्हा शेक्सपिअरच्या ‘अॅज यू लाइक इट’ नाटकातील मूळ कविता ‘ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वूमन मिअरली प्लेयर्स’ समजायला जड गेली नाही, कारण १९७१ मध्ये आनंदच्या क्लायमॅक्सचे वेळी प्राथमिक शाळेत असतानाच ती आम्हाला कळली होती. असा क्लायमॅक्स होणार नाही. निश्‍चेष्ट पडलेल्या आनंदसमोर एकट्याच्या खांद्यावर पूर्ण क्लायमॅक्स खेचून नेला होता अमिताभनं. अमिताभच्या खर्जातल्या आवाजात कविता ऐकण्याचा छंदही सिनेरसिकांना याच चित्रपटापासून जडला. गुलजारची ‘मौत तू एक कविता है’ ही अमिताभनं सादर केलेली कविता हृदयात घर करून बसली आहे. चित्रपटात आनंदला श्रद्धांजली देताना अमिताभ म्हणतो, ‘‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नही.’’ तेच वाक्य अमिताभनं रंगविलेल्या ‘ बाबूमोशाय’च्या भूमिकेलाही लागू पडते. राजेश खन्नाचा ‘आनंद’ हा ‘बाबूमोशाय’ शिवाय अपूर्ण राहिला असता.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com