esakal | पडद्याबाहेरचाही अवकाश व्यापणारा ‘शहेनशाह’ I Amitabh Bachchan
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

पडद्याबाहेरचाही अवकाश व्यापणारा ‘शहेनशाह’

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

महाविद्यालयीन काळातील मित्र राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर वर्ष १९८५ मध्ये, कारकिर्दीच्या शिखरावर असताना अमिताभ चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात उतरला. अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेत खासदार झाला. राजकारणाचे चटके खाऊन झाल्यावर या कलाकाराने अर्ध्यात राजकारण सोडले आणि १९८८ मध्ये तो आपल्या साम्राज्यात परतला.

राजकारणात जायच्या आधी करारबद्ध केलेला दिग्दर्शक टिनू आनंदचा ‘शहेनशाह’ तेवढ्यात दाखल झाला आणि चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या. १९८१ च्या ‘कालिया’ नंतरचा दिग्दर्शक टिनू आनंद आणि अमिताभचा हा दुसरा चित्रपट होता. कथा खुद्द जया बच्चन हिने लिहिली होती.

प्रामाणिक पोलीस अधिकारी असलेल्या कादर खानला अमरीश पुरी आणि प्रेम चोप्रा हे दोघे खलपुरूष लाचखोरीच्या आरोपात अडकवतात आणि पश्चातापदग्ध कादर खान गळफास लावून घेतो. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असलेल्या अस्लम खान (प्राण) च्या घरात कादर खानचा मुलगा अमिताभ लहानाचा मोठा होतो आणि प्रामाणिक वागणुकीने आपल्या बापाचा घात केला हे लक्षात घेऊन, तसे न जगायचे ठरवतो. मोठा झाल्यावर पोलीस अधिकारी झालेला अमिताभ दिवसा गुन्हेगारांकडून लाच खातो आणि रात्री ‘शहेनशाह’ चे रूप धारण करून त्याच गुन्हेगारांना तुडवतो.

पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेतील अमिताभने एका उत्तर भारतीय बावळट आणि भ्रष्ट अधिकाऱ्याची भूमिका विनोदी ढंगाने सादर केली होती. पूर्ण गणवेशात असताना सतत तिरपी टोपी घालणे, कमरेत ढिला असलेला पँट सतत वर ओढत राहणे, डोक्यावर तेलाची बाटली उलटली असावी इतक तेल लावून चापट भांग करणे आणि आधीच पानाने रंगलेल्या तोंडातून लाल रस ओघळेपर्यंत पर्यंत वारंवार पान खात राहणे, मजा आणली होती अमिताभने. सोबतीला मिनाक्षी शेषाद्री ही नावापुरती नायिका होती. मिनाक्षीची चोरी पकडण्यासाठी अमिताभने एका दृश्यात वठवलेला पारशी बावाजी लाजवाब झाला होता. शिवाय मुख्तारसिंग नावाच्या एका गुंडा सोबत संवाद साधत असताना अमिताभने ज्या विनोदी मुद्रा केल्या होत्या त्या सुद्धा कमाल होत्या.

तिकडे ‘शहेनशाह’ च्या गेट अप मधील लार्जर दॅन लाईफ़ हिरो अभूतपूर्व अशा पेहरावात पडदा व्यापून टाकतो. इंदर राज आनंदचे संवाद अपवादात्मक नव्हते पण अमिताभच्या तोंडी दिलेल्या ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है ‘शहेनशाह’...!’ या एका वाक्याने पब्लिकचा अमिताभ-ज्वर नियंत्रणाबाहेर गेला होता. ह्या संवादाची लोकप्रियता गेल्या तेहत्तीस वर्षात तसूभरही कमी झाली नाही. लेदरची काळ्या रंगातली तंग फुल-पँट, काळ जाकीट, काळपट-सोनेरी दाढी, तशीच केशरचना, उजव्या हाताला मनगटापासून खांद्यापर्यंत स्टीलच्या जाळीचे ऐसपैस कवच, डाव्या हातात बापाने ज्या दोराने फाशी लावून घेतली होती तो दोर, असे सुमारे सतरा किलो वजन अंगावर घेतलेल्या अवतारातील ‘शहेनशाह’ चा दरारा पडद्याच्या पार पोहोचला होता.

समोर येणाऱ्या लहान-मोठ्या प्रत्येक गुंडाला भेदक नजर आणि दमदार आवाजात ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है ‘शहेनशाह’...!’ अशी खुन्नस अमिताभ देतो तेव्हा वेडे झालेले प्रेक्षक पडद्यावर पैसे फेकायचे. संवाद म्हणून तसं साहित्यिक मूल्य नसलेलं हे एक वाक्य अमिताभने अजरामर करून ठेवलं. सिनेमात ‘शहेनशाह’चे केवळ पाच प्रवेश आहेत. प्रत्येक प्रवेशाला वरील संवाद अनिवार्य. त्याच्या मागून पब्लिकचा प्रचंड जल्लोषही अनिवार्य. माहिती असतं की हे सगळ खोटं आहे, नाटक आहे, डोळ्यात विभ्रम तयार करणार आहे, तरी त्यातील अमिताभ नावाचा घटक तारतम्य, बुद्धी खुंटीला टांगण्यास भाग पाडतो. चित्रपट संपल्यावरसुद्धा त्या संवादाच कौतुक संपलेल नसतं, कुठेही हा संवाद ऐकू येताच तुमचे कान टवकारले जातात. गुंड प्रवृत्तीच्या माणसाना ‘शहेनशाह’ सारखा धडा शिकवणारा बाप मिळावा असे स्वप्नरंजन प्रत्यक्षात उतरलेले बघून सामान्य प्रेक्षक रोमांचित झाला होता.

या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेवटी अतिरंजित कोर्ट-रूम ड्रामा धरून सलग वीस मिनिट केवळ अमिताभच डोळ्यासमोर असतो. अतिशयोक्तीपूर्ण नाट्यमय घटनांनी ठासून भरलेला शेवट अतर्क्य होता. अमिताभची शहेनशाही एकदा कबूल केली की पुढे सगळं मनोरंजनाच्या स्तरावर घ्यायचं, यातच त्याकाळातील सुज्ञपण होत. एका वाक्यावर सिनेमा खेचून न्यायचं हे उदाहरण न भूतो न भविष्यती असं होतं.

(लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत. )

loading image
go to top