अपयश संपवणारा ‘जंजीर’

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com
Sunday, 10 January 2021

अ-अमिताभचा...
महानायक अमिताभ बच्चन यांची चित्रपटसृष्टीतली अनेक दशकांची कारकीर्द कुणालाही प्रेरणादायी अशी आहे. याच झगमगत्या कारकीर्दीचा रसिला वेध...

भागीदारी प्रकाश मेहरांबरोबरची 
‘आराधना’ प्रदर्शित झाला १९६९ मध्ये, या चित्रपटानं राजेश खन्ना या पहिल्या सुपरस्टारचा जन्म झाला. सलग पंधरा सिल्वर ज्युबिली चित्रपट केवळ चार वर्षात देणाऱ्या राजेश खन्नाची कारकीर्द ही लोकप्रियतेची ‘ढगफुटी ’ होती. ‘ढगफुटी’चा काळ संपेपर्यत होणारी वाताहत पाहत राहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय मर्त्य मानवाकडं नसतो. राजेश खन्नाच्या लोकप्रियतेच्या तुफानापुढं उभं राहायला कुणी तयार नसताना त्याच्या ‘आनंद’ मध्ये त्याच्यासमोर ताठ उभा राहिलेला अमिताभचा ‘बाबूमोशाय’ म्हणूनच वेगळा ठरला. याच ‘बाबूमोशाय’च्या डोळ्यांतला सुप्त ज्वालामुखी हेरला तो दिग्दर्शक प्रकाश मेहरांनी. ‘बेखुदी मे सनम’ या लता-रफीच्या आवाजातल्या गाण्यानं गाजलेला शशी कपूरबरोबरचा ‘हसीना मान जायेगी’ आणि ‘काटा लगा’ या लता मंगेशकरच्या आवाजातील (आशाचे आहे असे वाटावे असे ) हिट्ट गाणे असलेला धर्मेंद्रचा ‘समाधी’ एवढीच मर्यादित पुंजी तोपर्यंत मेहरा यांच्या गाठीशी होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९७३ हे वर्ष उजाडलं. आणि सलीम - जावेद या तरुण पटकथा - संवाद लेखकांनी प्रकाश मेहरांना ‘जंजीर’ चित्रपटाची गोळीबंद कथा ऐकवली. देवानंद, राजकुमार आणि धर्मेंद्र या तिघांच्या दारावर या कथेचं बाड घेऊन प्रकाश मेहरा पोहोचले मात्र त्यांना सगळीकडूनच नकारघंटा ऐकावी लागली. विविध कारणांनी या तिघा दिग्गजांनी त्या कथानकावर काम करण्याचं नाकारलं. मात्र एकीकडे हे सगळं घडतं असताना वेगळीच बाब घडली होती. ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातल्या एका ताड-माड उंचीच्या नव्या नायकानं च्युईंगम चघळत प्रवासी बसच्या आत गुंडांशी हाणामारी करण्याचं दृश्य दिलं होतं. त्या नायकाचा बेदरकारीचा भाव नेमका टिपला होता सलीम-जावेद यांनी. ‘जंजीर’मधला तापट स्वभावाचा आपला पोलिस इन्स्पेक्टर च्युईंगम चघळण्याच्या त्या अदाकारीत सलीम-जावेद जोडीला गवसला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सलीम - जावेद यांना गवसलेला हा नायक आपल्या चित्रपटाचा मुख्य नायक करण्याची जोखीम प्रकाश मेहरांनी घेतली आणि शेरखानच्या गेट - अपमधील भारदस्त प्राणला उद्देशून ‘ जब तक बैठने को, ना कहां जाये, शराफत से खडे रहो.. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही ’ या संवादासोबत अमिताभ ज्या त्वेषानं खुर्चीला लाथ मारतो ती अजरामर ठरली. 

हिंदी चित्रपटसृष्टीच्या पुढील पन्नास वर्षांच्या भविष्यावर प्रभाव टाकणारी घटना घडण्यास एक क्षुल्लक च्युईंगम कारणीभूत ठरला असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ‘आनंद’ च्या तुफानातून सहीसलामत निघालेल्या बाबूमोशायनं आता स्वत:च तुफानाचा आकार घेतला होता.  सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाचा कणखर विरोध ही त्या काळच्या हिंदी चित्रपटांमध्ये कधी न  दिसलेली गोष्ट ‘जंजीर’ मध्ये होती. “ आज के बाद तुम्हारे आदमीयो से कह दो की तुम्हारे नजदीक रहे...क्योंकी तुम्हारी नजदीक की नजर कमजोर है...” अजितनं रंगवलेला थंड रक्ताचा खलनायक ‘तेजा’ सोबतची इन्स्पेक्टर विजय खन्नाच्या जुगलबंदीमधली ही  खुन्नस आज अठ्ठेचाळीस वर्षांनंतरही तेवढीच धारदार वाटते. 

‘जंजीर’ चित्रपटानं या चित्रपटसृष्टीचा इतिहास असा काही बदलला की ‘जंजीर’पूर्व आणि ‘जंजीर’ पश्चात अशी थेट विभागणी झाली. हे सगळं घडू शकलं ते प्रकाश मेहरा या जादुगारानं प्राण, अजित, ओमप्रकाश, इफ्तेकार यांच्या सारख्या मुरलेल्या कलाकारांच्या मांदियाळीत अमिताभसारख्या एका शिडशिडीत व्यक्तिमत्वाच्या, तोपर्यंत एकटा नायक म्हणून यशस्वी न ठरलेल्या कलाकाराच्या बाबतीत जोखीम पत्करायची तयारी दर्शविली म्हणून.

नफा - तोट्याची  गणितं न बांधणारेच इतिहास घडवत असतात. धोका पत्करून हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रवाह आमुलाग्र बदलविण्याचं श्रेय जातं ते मेहरांकडे. ‘जंजीर’च्या यशानंतर अमिताभचा विचार तशाच प्रकारच्या भूमिकेसाठी करण्याचा मोह कुणाही दिग्दर्शकाला झाला असता, पण १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा-फेरी’मध्ये त्यांनी अमिताभला विनोद खन्नासोबत एका ॲक्शन-कॉमेडी-सस्पेन्स थ्रीलरमध्ये बिनधास्त सादर केला.

'जंजीर’ चित्रपटाच्या यशामध्ये निर्विवादपणानं सलीम - जावेदच्या कथा-पटकथा-संवादांचा मोठा वाटा होता, परंतु नंतर मेहरा यांनी अमिताभसोबत केलेल्या एकाही चित्रपटात सलीम-जावेद  नसतानाही त्यांनी त्याच्या कारकिर्दीत महत्वाचे ठरतील असे पाच सुवर्ण महोत्सवी चित्रपट दिले. एकदा त्यांच्या हाताला अमिताभ नावाचा परीस लागल्यानंतर त्यांनी योग्य तिथं या परिसाचा स्पर्श करून कलाकृतीचं सोन्यात रुपांतर करण्याचं कौशल्य दाखवून दिलं. अमिताभशिवाय अन्य नायकांना घेऊन त्यांनी चित्रपट काढणं सुरूच ठेवलं होतं मात्र त्यांना अमिताभसोबत जे उत्तुंग यश मिळालं तसं यश त्यांना इतरांसोबत कधीच प्राप्त झालं नाही.  
(क्रमशः) 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gb deshmukh writes about janjeer movie