मैत्रीच्या श्रीमंतीचा रुबाब

‘नमक हराम’नंतर सुपरस्टार पद निर्णायकपणे अमिताभकडं गेलं. या चित्रपटानंतर हे सिद्ध होऊन गेलं होतं, की पुढील युग अमिताभचं आहे.
Rajesh khanna and amitabh bachchan
Rajesh khanna and amitabh bachchanSakal

समाजवादी विचारसरणीचा जगावर पगडा असण्याच्या त्या काळात कामगारांचे हक्क, त्यांची कारखानदारांकरवी होणारी पिळवणूक आदी विषय सत्तरच्या दशकात चर्चेत होते. १९७१ मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना आणि संघर्ष करत असलेला अमिताभ या दोघांना घेऊन ‘आनंद’ हा उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या हृषीकेश मुखर्जी यांनी कारखानदार विरुद्ध कामगार अशा कथेत या दोघांना ‘नमक हराम’मध्ये पुन्हा एकत्र आणलं, ते वर्ष होतं १९७३. पण एक फरक होता. ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’च्या दरम्यान ‘जंजीर’ येऊन गेला होता. सुपरस्टार राजेश खन्नाची स्टार व्हॅल्यू अबाधित होती; पण ‘आनंद’च्या वेळी आधीच्या पडेल चित्रपटांचं ओझं खांद्यावर असलेला अमिताभ, ‘नमक हराम’ चित्रपटगृहात येईपर्यंत स्वत:च स्टार बनला होता. ‘आनंद’ चित्रपटातल्या राजेश खन्नाच्या अप्रतिम अभिनयाच्या कौतुकात अमिताभनं त्याला तोलामोलानं दिलेल्या टकरीची नोंद नक्कीच झाली होती; पण अमिताभमधील अफाट क्षमतांचा आवाका तेव्हा ध्यानात आला नव्हता. ‘नमक हराम’ चित्रपटात अमिताभसोबत बरोबरीची भूमिका स्वीकारणं ही राजेश खन्नाची त्याच्या आयुष्यातली घोडचूक ठरली.

‘नमक हराम’नंतर सुपरस्टार पद निर्णायकपणे अमिताभकडं गेलं. या चित्रपटानंतर हे सिद्ध होऊन गेलं होतं, की पुढील युग अमिताभचं आहे. ‘नमक हराम’ हे नाव राजेश खन्नाच्या पडद्यावरील चरित्राला दिलेलं विशेषण होतं. श्रीमंत कारखानदाराचा मुलगा विक्रम ऊर्फ विकी (अमिताभ) आणि त्याचा गरीब मित्र सोमू (राजेश खन्ना) यांच्या दोस्तीच्या कथेला पार्श्वभूमी होती गरीब-श्रीमंत संघर्षाची. दोघांचाही अभिनय गगनाला टेकला होता. गरिबांचा कैवारी म्हणून जी सहानुभूती राजेश खन्नाला मिळायला हवी होती, ती मिळाली होती आणि श्रीमंत मित्राच्या चरित्रातील मजबूत दुवे अमिताभनं अचूक पकडले होते.

कामगार नेता ए. के. हंगल यांच्यासमोर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपला मित्र सोमूला आपल्याच कारखान्यात नोकरी देऊन, त्याची कामगारांच्या नजरेत प्रतिष्ठा वाढवून, खऱ्या कामगार नेत्याची सत्ता संपविण्याच्या षडयंत्रातून जे नाट्य आकाराला येतं, ते हृषीकेश मुखर्जींनी प्रभावीपणे चितारलं होतं. मित्र सोमूवर कामगारांचा हल्ला होतो तेव्हा त्यांच्या वस्तीत जाऊन, पूर्ण जमावापुढं संतापलेला अमिताभ त्या गर्दीला ‘कौन है वो माई का लाल, जो अपनी माँ का दूध आजमाना चाहता है, आ जाये सामने,’ असं त्वेषपूर्ण आव्हान देतो तो एक क्षण.... त्या क्षणाला राजेश खन्ना युगाच्या अंताची सुरुवात झाली होती. ‘जंजीर’मध्ये पोलिस ठाण्यात खुर्चीला घातलेली त्वेषपूर्ण लाथ एका वर्दीधारी पोलिस अधिकाऱ्याची असते. हाच त्वेष एका गरीब मित्राला मारहाण झाल्यानंतर एका मित्रासाठी काहीही करणाऱ्या श्रीमंत मित्राच्या प्रतिक्रियेतून ‘नमक हराम’मध्ये प्रगट होतो. श्रीमंतांनी गरिबाच्या चष्म्यातून जग पाहणं उपयोगाचं नसतं, ही अमिताभच्या कारखानदार वडिलांची शिकवणूक मात्र चित्रपटाच्या शेवटी अमिताभ झुगारून टाकतो. गुलजारच्या दमदार संवादांनी सिनेमात पकड आणली होती.

‘नमक हराम’मधील अमिताभच्या वाट्याला आलेला एक-एक प्रसंग दमदार झाला होता. युनियन लीडर ए. के. हंगल एका जखमी मजुराच्या मदतीसंदर्भात भेटायला आलेले असताना त्यांच्यावर मालक म्हणून खवळलेला अमिताभ, गरीब लोकांमध्ये राहून दृष्टिकोनात झालेला बदल सांगणाऱ्या राजेश खन्नावर ‘नमक हराम’ असं म्हणत संतापलेला अमिताभ आणि मजुरांच्या वस्तीत मित्र राजेश खन्नाला मारहाण झाल्यानंतर तिथून आपल्यासोबत चलण्यास सांगणारा अमिताभ... खणखणीत विशुद्ध संताप. ‘आनंद’मधून डोकावलेला, ‘जंजीर’मधून पूर्णपणे प्रगटलेला अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’, ‘नमक हराम’मध्ये एका सुपरस्टारचं राज्य खालसा करून गेला.

श्रीमंतीचा तोरा, गरिबीविषयीची अनभिज्ञता आणि मित्राबद्दलचं निर्व्याज प्रेम... सगळं सगळं स्वच्छपणे दिसलं होतं अमिताभच्या नजरेतून. कामगार नेता ए. के. हंगलची माफी मागण्याच्या प्रसंगातील त्याची अक्कड असो, अथवा मित्रावर कुणी हात उगारल्यानंतरची प्रतिक्रिया असो, श्रीमंतीची रग कशाला म्हणतात ते अमिताभनं दाखवून दिली होती. प्रेक्षकांची पूर्ण सहानुभूती हिरोकडंच जावी अशी भूमिका राजेश खन्नाच्या वाट्याला आली असताना, सहनायक अमिताभनं संपूर्ण चित्रपट थाटात खेचून नेला आणि तिथून हिंदी चित्रपटांचा इतिहास बदलला. ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’ या दोन्ही चित्रपटांत मित्र अमिताभच्या पुढ्यात मृत्यूचा प्रसंग साकारणाऱ्या राजेश खन्नास हे कळलंच नव्हतं, की हा अंत त्या ‘आनंद’ किंवा ‘सोमू’ या पात्रांचा नसून त्याच्या सुपरस्टार या पदवीचा, दिमाखाचा होता.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com