दुर्दम्य आत्मविश्वासाचा त्रिशूल  

‘त्रिशूल’मध्ये अमिताभ बच्चन, संजीवकुमार, शशीकपूर
‘त्रिशूल’मध्ये अमिताभ बच्चन, संजीवकुमार, शशीकपूर

‘कभी कभी’ सारखी काव्यात्मक कलाकृती प्रस्तुत केल्यानंतर लगेच १९७८ या वर्षात यश चोप्रांनी अमिताभच्या रूपात ‘दिवार’ च्या धर्तीवरचा बंडखोर न-नायक प्रस्तुत केला ‘त्रिशूल’ या मल्टी-स्टारर चित्रपटात. कुमारी मातांनी जन्माला घातलेल्या आणि समाजानं अनौरस ठरवलेल्या बालकांच्या अनेक कथा आपण वाचलेल्या असतात. पण सलीम-जावेद या जोडीनं ‘त्रिशूल’ चित्रपट लिहिताना अमिताभच्या रुपात उभा केलेला अनौरस पुत्र वेगळ्या वाटेवरचाच होता. सासऱ्याच्या गडगंज बांधकाम उद्योगात भागीदारी मिळतीय हे लक्षात आल्यावर आणि आईच्या आग्रहामुळं श्रीमंतीच्या वाटेवर जाण्यासाठी संजीव कुमार गर्भवती प्रेयसी वहिदा रेहमानचा त्याग करतो. संजीवकुमारपासून दूर झालेली वहिदा त्याच्या बाळास जन्म देते आणि बाळाला शरीर आणि मनाने कणखर बनवत ‘ मेरे बर्बादिके जामीन अगर आबाद रहे, मै तुझे दुध ना बख्शुंगी तुझे याद रहे ’ अशी शपथ मुलाला देत प्राण सोडते.

जिसने पच्चीस बरस अपनी माँ को थोडा, थोडा मरते देखा हो, उसे मौत से क्या डर’’ असं म्हणत लहानपणापासूनच गरिबी आणि मजुरीच्या भट्टीत रापलेला अमिताभ आपल्या अनौरस बापाला उध्वस्त करण्याच्या इराद्यानं दिल्ली गाठतो. ‘‘ मै पाच लाख का सौदा करने आया हुँ , और मेरे जेब मी पाच फुटी कौडी भी नही.’’ अशा आत्मविश्वासानं तोपर्यंत विशाल साम्राज्य निर्माण केलेल्या संजीवकुमारशी भिडतो.  एक श्रीमंत, यशस्वी, ज्येष्ठ व्यावसायिकाचा रुबाब, घमेंड संजीवकुमारच्या अभिनयातून तंतोतंत झळकते. ‘शोले’च्या ठाकूर नंतर संजीवकुमारची ही उत्तम भूमिका. या चित्रपटातलं अमिताभ आणि संजीवकुमारच्या संघर्षाचं चित्रण अवर्णनीय.

संजीवकुमारचा व्यवसाय, त्याची संपत्ती, त्याचं कुटुंब असं सगळं काही बरबाद करण्याच्या एकमेव उद्देशानं झपाटलेलं विजयकुमार हे व्यक्तिमत्व दुर्दम्य आत्मविश्वासाचं प्रतीक बनून प्रेक्षकांच्या मनावर ठसतं. गुंडाना पूर्वकल्पना देऊन त्यांच्या अड्ड्यावर एकट्यानं जाणं, त्यांना आव्हान देणं आणि एकट्याच्या बळावर त्याना हुसकावून लावणं, इतकंच नाही तर सोबत रुग्णवाहिका घेउन जाणं, जेणेकरून ते गुंड जखमी झाल्यावर त्यांची रवानगी रुग्णालयात करता येईल हे ज्या आत्मविश्वासानं अमिताभ करतो, त्यावर दर्शक फिदा होते. संजीवकुमारचा मानभंग करणे हा एकमेव उद्देश्य असूनही जेव्हा संजीवकुमारच्या कार्यालयात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राखीवर खोटे आरोप होतात, तेव्हा स्वत:चा फायदा न बघता अमिताभ मदत करणाऱ्या खऱ्या फितुराला बखोटीला धरून संजीवकुमारच्या पुढ्यात  आणून उभा करतो.

‘जिंदगी मे कुछ बाते फायदे और नुकसान से उपर होती है, लेकीन ये बात कुछ लोग नही जानते’’ असे म्हणून संजीवकुमारला गोंधळात टाकतो. आपल्या अनौरस बापाच्या बरबादीच्या प्रयत्नात असूनही जेव्हा खलनायक प्रेम चोप्रा संजीवकुमारविषयी अपशब्द काढतो तेव्हा बाकी सगळ विसरून अमिताभ म्हणजे विजय प्रेमचोप्राचं श्रीमुख लाल करतो.  अमिताभच्या व्यक्तिमत्वातले  हे सगळे विरोधाभास त्याच्यातील हिम्मतीचे दाखले देत जातात.

यश चोप्रांनी सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या दमदार संवादांचा हे चरित्र उभं करण्यासाठी योग्य वापर करून घेतला होता. त्याच्या प्रामाणिकतेवर ताशेरे ओढताक्षणी खवळलेल्या संजीवकुमारला ‘‘ लगता है मैने आपकी किसी दुखती रग पर हात रख दिया है’’ असे म्हणत मानसिकदृष्ट्या अधिक आघात करतो.‘‘ हर वो बात, जो बिझिनेस ना हो, आप नही समज सकते.’’‘त्रिशूल’ चा हा नायक केवळ भेदक शब्दांतून प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करतो अस नाही, तर अभिव्यक्तीचं अत्यंत धारदार साधन असलेले त्याचे डोळे अनेक प्रसंगात सलीम-जावेदच्या संवादापेक्षाही गहिरा परिणाम साधतात.

साहिर आणि खैय्यामनं बनवलेल्या  श्रवणीय गाण्यांपैकी एका गाण्यातील येसूदास च्या आवाजातील एकच कडवं  ‘‘ किताबोमे छपते है चाहत के किस्से...’’  अमिताभवर चित्रित झालं होत आणि सर्वात जास्त तेच गाजलं होत. अत्यंत रुबाबदार कपडे आणि आईनं अंतिम समयी दिलेली माळ गळ्यात घट्ट बांधून फिरणाऱ्या अमिताभच्या झंझावाती अभिनयाच्या प्रवाहात त्यावेळचा प्रेक्षक अक्षरश: वाहून गेला होता. प्रेक्षकांमधील प्रत्येकाचं पडद्यावरील अमिताभशी जणृ व्यक्तिगत नातं जडलं होतं, कुठलाही तर्क त्यांच्या विश्वासाच्या आड येण अशक्यं होत. यश चोप्रांनी अमिताभ आणि प्रेक्षकांमधील हा अत्यंत खासगी अनुबंध जाणला होता.  त्यामुळंचं १९७९ मध्ये आलेल्या ‘काला पत्थर’ मध्ये पुन्हा एकदा अमिताभची वेगळी अदाकारी त्यांनी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कॅश केली होती.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक  आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com