गोष्ट महानायकाची अशी संपत नाही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

आम्ही पाचवीत असताना, म्हणजे १९७३ मध्ये आम्हाला प्रथमच हिंदी चित्रपटातल्या नायकाची ‘ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही’ अशी आगळीवेगळी मिरास पडद्यावर बघायला मिळाली.

गोष्ट महानायकाची अशी संपत नाही...

आम्ही पाचवीत असताना, म्हणजे १९७३ मध्ये आम्हाला प्रथमच हिंदी चित्रपटातल्या नायकाची ‘ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही’ अशी आगळीवेगळी मिरास पडद्यावर बघायला मिळाली; आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्‍भुत माणूस आम्हाला ‘पिंक’ ह्या महिलाप्रधान सिनेमात ‘ना का मतलब सिर्फ ना होता है’ असं ठणकावतो, ‘बदला’ ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे ‘सब का सच अलग अलग होता है’ असं तत्त्वज्ञान मांडतो; आणि अगदी अलीकडच्या ‘झुंड’मध्ये झोपडपट्टीतील मुलांच्या घोळक्याला ‘झुंड नही, टीम...’ म्हणायची शिकवण देतो, तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं. आता पन्नाशीत असलेल्या आमच्या पिढीच्या मनोविश्वातून अमिताभ बच्चनला वजा करणं अशक्य आहे. दैनंदिन जीवनात अमिताभच्या चित्रपटातल्या संवादांचे संदर्भ आपसूकच आमच्या पिढीच्या तोंडून बाहेर पडत असतात.

१९६९ पासून हिंदी चित्रपटांशी जोडलेल्या अमिताभच्या कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ‘अ-अमिताभचा’ ह्या सदरातून पन्नास वर्षांत त्याने साकारलेल्या उल्लेखनीय भूमिकांवर प्रकाश टाकण्याचा मानस होता, त्याच्या भूमिकांच्या अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न होता, परंतु झालं विपरीतच. त्याच्या भूमिकांवर लिहिण्याच्या नादात पुन्हा एकदा त्याच्या गारुडात वाहवून गेलो. त्याने साकारलेल्या भूमिकांना आवाक्यात घेण्याच्या नादात पुन्हा एकदा त्याच्या कलाकारीच्या आविष्कारात डुंबून गेलो.

ही नेमकी जादू तरी काय आहे? की पन्नास वर्षांत अनेक पिढ्या म्हाताऱ्या झाल्या; पण ऐंशीला टेकलेला ‘बिग बी’ कधीच म्हातारा झाला नाही. किमान पडद्यावर तरी नाहीच.

चित्रपटांतल्या त्याच्या भूमिकांची वैशिष्ट्यं ध्यानात घेऊन लेखन करायचं असं ठरवलं होतं. पण काय करायला गेलो.. अशी स्थिती तेव्हा झाली, जेव्हा त्याच्या एकाच चित्रपटातील भूमिकेत अनेक वैशिष्ट्यं आढळत गेली. काय घ्यावं आणि काय घेऊ नये असं होऊन बसलं. महानायकाला इतक्या कमी जागेत म्हणजे सदराच्या मर्यादेत बसवणं शक्य नसल्याची जाणीव झाली. ‘‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है’’ची प्रचिती वारंवार आली. लिखाणाच्या ओघात लक्षात आलं की, आपण जे करत आहोत ती कुठल्याही नटाची, सिनेमाची, कथेची अथवा कलेच्या कुठल्याही अंगाची समीक्षा नसून, जे लेखणीतून बाहेर येत आहे ते एक नैसर्गिक प्रकटीकरण आहे, आपल्या काळातील नायकाने दिलेल्या अपरिमित आनंदाचं...!

अमिताभचा ‘जंजीर’ आला तेव्हा आमच्या माध्यमिक शाळेची सुरुवात झाली होती. आम्ही दहावीला पोहोचलो तेव्हा त्याचा ‘अँथनी’ झाला होता. बारावीला आम्ही होतो तेव्हा ‘सिकंदर’ बनून तो ‘जोहराजान’च्या नजरेने घायाळ झाला होता. त्याच्या प्रतिभेच्या आविष्कारांसोबतच आमचं किशोर वय सरलं, तारुण्य ओसंडून गेलं आणि आमची निवृत्ती येईपर्यंत तो ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ होऊन बसला होता. एका क्षणी तर त्याच्या भूमिकांची चिकित्सा करण्याची गरज गळून पडली आणि केवळ सिनेमातील त्याच्या अस्तित्वाचा आनंद घ्यायचा इतकंच काय ते उरलं होतं. डोळसपणे सिनेमा पाहत असताना त्याने केलेल्या चुका पोटात घालणं हासुद्धा सवयीचा भाग झाला. आपल्यासारख्याच हाडामांसाच्या व्यक्तीचं महानायक होणं म्हणजे काय असतं, ते आमची पिढी बालपणापासून ते निवृत्तीच्या क्षणापर्यंत पाहत आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर जन्माला आलेल्या पहिल्या पिढीच्या आकांक्षांचा आक्रोश त्याने आपल्या पहिल्या डावात मांडला आणि कालौघात आधुनिकतेकडे अग्रेसर झालेल्या देशाच्या समकालीन समस्या आणि भावभावनांचं प्रतिबिंब त्याच्या उतारवयातील भूमिकांत बघायला मिळालं.

सव्वा वर्षाच्या काळात ‘अ-अमिताभचा’ या सदरात अमिताभच्या एकूण बासष्ट भूमिकांची चर्चा केली. ज्यांच्यासोबत अमिताभने एकापेक्षा अधिक सिनेमांत काम केलंय असे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी, प्रकाश मेहरा, यश चोपडा, मनमोहन देसाई, राकेश कुमार आणि अलीकडच्या काळातील रामगोपाल वर्मा, आर. बाल्की, शुजीत सरकार आणि ज्यांच्यासोबत केवळ एकाच, परंतु संस्मरणीय सिनेमाची साथ त्याने केली असे चंद्रा बारोट, सुधेंदू रॉय, बासू चॅटर्जी यांच्यासारख्या प्रतिभावंतांच्या भागीदारीतील अमिताभच्या भूमिकांचा अर्क सांगणारं हे रसग्रहण होतं. यात ज्या दिग्दर्शकांचा उल्लेख आहे, त्यांचे अमिताभसोबतचे सगळेच चित्रपट समाविष्ट केलेत, असं नाही. उदा. - मनमोहन देसाईंच्या अमिताभसोबतच्या केवळ सात चित्रपटांचा समावेश या सदरात होता. आठवा ‘गंगा, जमना, सरस्वती’ कितीही सहानुभूतिपूर्वक विचार केला तरी घ्यायचं धाडस झालं नाही. केवळ बॉक्स ऑफिसवरचं यश हा या सदराकरिता केलेल्या चित्रपटांच्या निवडीचा निकष नव्हता. हे संपूर्ण सदर अमिताभच्या पडद्यावरील भूमिकांना वाहून घेतलेलं असल्यामुळे त्याच्या व्यक्तिगत जीवनातील त्याच्याविषयीच्या चांगल्या अथवा वाईट गोष्टींना यामध्ये स्थान नव्हतं.

कानाला हेडफोन, हातात इंटरनेट कनेक्शनसह मोबाईल आणि बेदरकार वाटावा असाच चेहऱ्यावरचा भाव, भारी बाइकवर उडणाऱ्या नवतरुण पिढीसाठी हे सदर नसेल असं गृहीत धरून लिहिणाऱ्या मला माझ्या मेलबॉक्सनं आश्चर्याचे धक्के दिले. अमिताभच्या तरुण वयातील, पण आता पोक्तपण गाठलेल्या त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांइतक्याच तरुणाईच्या उत्सुक प्रतिक्रियांनीसुद्धा मेलबॉक्स ओतप्रोत असे. वनप्रेमी, पक्षितज्ज्ञ, डॉक्टर, निवृत्त सरकारी अधिकारी अशा विविध क्षेत्रांतील, विविध वयोगटांतील अमिताभ-प्रेमींनी ‘अ-अमिताभचा’ या सदराला प्रचंड प्रतिसाद दिला. पन्नास वर्षं सतत प्रकाशात राहूनही एका व्यक्तीविषयी इतकी उत्सुकता समाजमनात असणं, हे तर्कबुद्धीच्या पलीकडचं आहे. अमिताभच्या चाहत्यांच्या अमिताभगिरीचा कळस असा की, एका सत्तरी पार केलेल्या चाहतीने एकदा असा अभिप्राय दिला होता की, ‘‘अमुक एक सिनेमा पाहिलेला नसल्यामुळे लेखातील काही मुद्दे डोक्यावरून गेले; पण असंच लिहीत राहा, पूर्ण समजलं नाही तरी अमिताभविषयी वाचायला आवडतं.’’

काही करा, उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या कलाकाराची गोष्ट संपता संपत नाही की, सांगून कंटाळा येत नाही. शेवटी त्याच्या गोष्टींचा आनंद घेत राहणं, इतकंच आपल्या हाती उरतं. जेव्हा सगळं जग कोरोनाच्या विचित्र विळख्याने त्रस्त होतं अशा काळात महानायकाच्या गोष्टी सांगत आपण वाचकांचा ताण काही प्रमाणात कमी करू शकलो, ह्याचं समाधान मी घेतो आणि श्रेय अर्थात महानायकाला देतो. ‘अ-अमिताभचा’ हे खोलवर रुजलेलं मुळाक्षर भारतीय जनमानसातून निघणं अशक्य आहे, हे मात्र नक्की.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

(समाप्‍त)

Web Title: Gb Deshmukh Writes Amitabh Bachchan Entertainment Movie Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top