‘तिच्या नकारा’तला ठामपणा पटवणारा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला आणि २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पिंक’ चित्रपट खास होता.

‘तिच्या नकारा’तला ठामपणा पटवणारा!

अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला आणि २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पिंक’ चित्रपट खास होता. चित्रपट किंवा इतर कुठल्याही माध्यमातून प्रकट झालेल्या महिला सक्षमीकरणावरचं हे सर्वाधिक सशक्त असं भाष्य होतं. हा संदेश देणारी व्यक्ती एक गंभीर, परिपक्व आणि ज्येष्ठ वयोगटातील निवृत्त वकील दीपक सैगल (अमिताभ बच्चन) होती. जितक्या विश्वासानं आणि समर्थपणे आक्रमक पुरुषी मानसिकतेची लक्तरं ह्या सिनेमात काढली गेली, त्याची तोड नाही. राजधानी दिल्लीत तिघी नोकरदार तरुण मुली तापसी पन्नू, कीर्ती कुल्हाडी आणि आन्द्रीया तरंग एका अपार्टमेंटमध्ये राहत असतात. नोकरदार गटातल्या तरुणींची मेट्रो शहरातील जीवनशैली अंगवळणी पडलेल्या या तिघी एका शाळकरी मित्राच्या आमंत्रणावरून दिल्लीतील एका रिसॉर्टमध्ये एका संध्याकाळी जातात. तिथं त्याच्या इतर दोघा मित्रांशी या मुलींची ओळख होते. या दोघांतील एकजण हरियानाच्या राजकारणातील एका नेत्याचा ‘आदर्श’ मुलगा (अंगद बेदी) असतो.

जेवणाआधी हलकीशी ड्रिंक्स घेणं, मनमोकळं बोलणं आणि एकूणच मोकळी वागणूक बघून मनात आधीच वाईट हेतू असलेल्या नेताजींच्या चिरंजीवांना या मुली ‘त्यातल्या’ आहेत अशी ‘खात्री’ पटते आणि ही मुलं त्यांच्याशी शरीरसुखाच्या इराद्याने आक्रमक होतात. त्यांतील तापसी पन्नू हाती आलेली काचेची बाटली त्या मर्दाच्या टाळक्यात हाणून स्वतःची सुटका करवून घेते; मात्र या प्रक्रियेत त्याचा एक डोळा दुखावतो, तसंच कपाळावर खोल जखम होते. तिथून या मुलींच्या शांत जीवनात पुरुषी दांडगाईचे फेरे सुरू होतात. जेव्हा मुली एफ.आय.आर. दाखल करण्याचा निर्णय घेतात, त्याचक्षणी नेताजींतर्फे सूत्रं हलतात आणि तापसी पन्नूलाच जीवघेणा हल्ला केल्याबद्दल पोलिसांकडून अटक केली जाते. शिवाय, एका सकाळी ती जॉगिंग करून परत येत असताना हे टोळकं तिला उचलून एका गाडीत घेतं आणि तिचा विनयभंग करून तिथं परत आणून फेकतात. ह्या सगळ्या घडामोडी समोरच्या बंगल्यात राहणारे ज्येष्ठ आणि निवृत्त वकील (अमिताभ बच्चन) मूकपणे बघत असतात. मुलींची घुसमट ओळखून हा कर्मठ म्हातारा स्वतः पुढाकार घेऊन, निवृत्ती तात्पुरती बाजूला ठेवून त्यांचं वकीलपत्र घेतो. मग सुरू होतो एक जबरदस्त कोर्ट रूम ड्रामा.

बाहेरख्याली असणं, चारित्र्य संशयातीत नसणं अशी सरधोपट गृहीतकं घेऊन सरकारी वकील (पीयूष मिश्रा) मुलींविरुद्धची केस कोर्टात सादर करतात. मीनल अरोरा, फलक आली आणि आंद्रिया अशी भारतातल्या प्रमुख तीन धर्मांच्या मुलींच्या नावावरून दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांना हे लक्षात आणून द्यायचं असतं, की इतर बाबतीत असो की नसो, महिलांच्या छळामध्ये मात्र सर्वधर्मसमभाव कठोरपणे पाळला जातो, याबाबतीत धर्मा-धर्मांत भेद केला जात नाही. मुलींच्या बचावासाठी अमिताभने केलेला एक-एक युक्तिवाद हा स्त्री सक्षमीकरणाच्या धोरणातील ब्रह्मवाक्य ठरावा असा होता. अत्यंत खणखणीत आवाजात ‘‘अगर लडकियाँ लडकों के साथ डीनर पे जाती है, तो ये उनकी अपनी चॉईस है. अॅव्हेलेबल होने का साइन बोर्ड नही बनके जाती,’’ असं अमिताभ भर कोर्टात म्हणतो, तेव्हा समाज कुठंतरी चुकत असल्याची कबुली प्रेक्षक मनात देत असतात. स्त्रीच्या नकाराचं महत्त्व अधोरेखित करताना अमिताभ म्हणतो, ‘‘ ‘ना’ सिर्फ एक शब्द नही, अपने आप मे एक पूरा वाक्य है. इसे किसी तरह के स्पष्टीकरण, एक्स्प्लनेशन या व्याख्या की जरुरत नही. ‘ना’ का मतलब सिर्फ ‘ना’ ही होता है.’’

कायद्यामध्ये स्त्रीच्या संमतीला जे महत्त्व दिलं आहे, त्यावर प्रकाश टाकताना हा अनुभवी वकील म्हणतो, ‘‘दिज बॉइज मस्ट रीअलाईज, ‘ना’ का मतलब ‘ना’ होता है. उसे बोलनेवाली कोई परिचित हो, फ्रेंड हो, गर्लफ्रेंड हो, कोई सेक्स वर्कर हो, या आपकी अपनी बिवी ही क्यो ना हो. ‘नो’ मीन्स ‘नो’ अँड इफ समवन सेज नो, यू स्टॉप!’’

रीतेश शाहचे अर्थपूर्ण संवाद अमिताभने खूपच परिणामकारकरीत्या सादर केले होते. ‘कारी कारी रैना सारी सौ अंधेरे क्यो लाई’ हे गाणं सिनेमात रहस्य, उत्कंठतेचं वातावरण निर्माण करतं. सिनेमाच्या शेवटी अमिताभच्या बुलंद आवाजात तन्वीर गाजी यांची कविता ‘तू खुद की खोज मे निकल, तू किस लिये हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है’ आधीच सुन्न झालेल्या प्रेक्षकांच्या कानावर पडते आणि स्त्रीच्या अस्तित्वाप्रती त्यांच्या मनात संवेदना जागृत करते. तीन पीडित मुलींच्या बाजूने उभा राहिलेला म्हातारा वकील दीपक सैगल (अमिताभ बच्चन) हा त्याच्या कायद्याच्या ज्ञानाच्या बळावर त्यांना वाचविण्यासाठी उभा राहिलेला सामाजिक कार्यकर्ता इतकाच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग नसतो. वैयक्तिक जीवनातसुद्धा अंथरुणास खिळलेल्या अर्धांगिनीची अंतःकरणापासून शुश्रूषा करणारा एक ज्येष्ठ नागरिक दाखवला आहे.

महिलांप्रती पुरुषांच्या मनात ज्येष्ठांपासून ते नव- तरुणांपर्यंत कुठल्या दर्जाचा आदर असावा ते अमिताभच्या पात्रातून ठळकपणे पुढे आणलं गेलं आहे. आरोपी बाहुबलीपुत्र असो, राजकीय दबावातून कागदपत्रांत फेरबदल करणारी असंवेदनशील महिला पोलिस अधिकारी असो, की अत्यंत भावनाशून्य पद्धतीने महिलांविरुद्ध गुन्हा करणाऱ्या गणंगांची केस चालविणारे वकील पीयूष मिश्रा असोत, सगळ्या पात्रांची अमिताभने आपल्या धीरगंभीर खर्जातल्या आवाजाने जी उलट तपासणी घेतली आहे, ती केवळ पडद्यावरच बघावी. सुरुवातीपासून एक गूढ व्यक्तिमत्त्व अशी बांधणी करत आणलेली ही भूमिका, अत्यंत प्रभावी संवादफेकीचा नमुना म्हणून लक्षात राहते.

उर्दू, हिंदी आणि इंग्रजी असे सगळेच उच्चार प्रत्येक अक्षरावर योग्य त्या ठिकाणी भर देऊन ज्या पद्धतीने अमिताभने उच्चारले आहेत, त्यावरून महिला उत्पीडनातील दर्द प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतो. एक-एका साक्षीतून अमिताभ कोर्टासमोर महिलांकरिता लागू असलेले अलिखित नियम उपहासात्मक पद्धतीने उद्‍धृ‍त करतो तेव्हा पाहणाऱ्यांना आपल्या समाजातील दुटप्पीपणाचीसुद्धा निश्चित जाणीव होते. मुळात अमिताभने कोर्टात केलेल्या युक्तिवादावरून महिला सक्षमीकरणाचे धडे महिलांबरोबरच पुरुषांनाही देण्याची गरज अधोरेखित होते.

जबरदस्त वाद-प्रतिवादानंतर जेव्हा निकाल मुलींच्या बाजूने लागतो आणि एक अशक्य अशी लढाई प्रतिकूल परिस्थितीत जिंकल्याचं लक्षात येतं, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात अमिताभच्या धीरगंभीर आवाजातील ‘नो’ हा शब्द खोलवर बिंबवला गेलेला असतो.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Web Title: Gb Deshmukh Writes Amitabh Bachchan Entertainment Pink Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top