परिणामकारक इशारा ! Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh and Hemamalini
परिणामकारक इशारा !

परिणामकारक इशारा !

sakal_logo
By
जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

‘दारू पीने से लिव्हर खराब होता है’ हे वैद्यकीय ज्ञान आजच्या घडीला या देशातल्या अनेकांना असले तरी अशी स्थिती १९८२ च्या आधी नव्हती. सर्वसामान्यांपर्यंत हे ज्ञान तोपर्यंत पोहचले नव्हते. १९८२ मध्ये ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट आला त्यात दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी हे महाज्ञान पडद्यावर दारू पित असताना दिले आणि ते थेट सर्वसामान्याच्या डोक्यात जाउन बसले. एकोणचाळीस वर्षांपूर्वी पाहिलेले ते दृश्य आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि असे वाटते स्वत: दारुडा नसलेला माणूस अशी अदाकारी करणे शक्यच नाही. पण शेवटी अभिनय म्हणजे काय ? उच्च दर्जाचा कलाकार साधारण प्रसंग कसा रोमांचक बनवून सोडतो त्याचे उदाहरण म्हणजे ‘ सत्ते पे सत्ता’ मधील ‘दारू पीने से लिव्हर खराब होता है’ हा प्रसंग.

खलनायक अमजद खानला अमिताभकडून त्याच्या कुटुंबियांविषयी माहिती काढून घ्यायची असते. त्याकरिता तो अमिताभला दारूच्या मोहात पाडतो आणि हळू-हळू एक-एक रहस्य त्याच्याकडून उलगडून घेतो. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरानंतर अस्खलीत बेवड्याप्रमाणे अमिताभ एकच पालुपद लावतो. ‘मालूम क्यो, क्योकी वो दारू नही पिता. दारू पीने से लिव्हर खराब होता है. अपून भी पिता नही है... लेकीन उस दिन दोस्त की शादी मे... चार बाटली...’ सहा भावांची वैशिष्ठ्य एकेक करून सांगताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने अमिताभ हे धृपद आळवतो तेव्हा धमाल होते. त्याच्या सहा भावांची नाव सोम, मंगल, बुध, गुरू, शुक्र, शनी आणि त्याच स्वत:च रवी असतं.

शनी पासून सुरू झालेली जंत्री प्रत्येकवेळी एक एक पेग रिचवत पुढे जाते आणि त्यानुसार सोमचा क्रमांक येईपर्यंत माहिती देणारा अमिताभ ढेर झालेला असतो. चढत्या नशेत प्रत्येक वेळी नशेच्या मात्रेप्रमाणे बरळली गेलेली ही वाक्य तेव्हा तोंडोतोंडी झाली होती. लिव्हर नावाचा एक महत्वाचा अवयव मानवाला असतो ही माहिती आणि दारू पिल्याने तो खराब होत असतो हे ज्ञान त्यावेळी सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचं महान कार्य ह्या प्रसंगातून घडूनआलं होतं. त्याचा परिणाम पट्टीच्या पिणाऱ्यांवर किती झाला ? हा संशोधनाचा विषय असला तरी, ज्याच लिव्हर खराब झालं तो पिणाराच असला पाहिजे हे मात्र सगळ्यांना सहज कळलं. यात न पिऊनही लिव्हर खराब होणारे देवभोळे मात्र विनाकारण बदनाम झाले. ह्या दारू-दृश्यात अमजद खानने अमिताभला दिलेली साथ सुद्धा उच्च दर्जाची होती.

‘सत्ते पे सत्ता’ असे विचित्र नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक राज एन. सिप्पी आणि निर्माते रोमू एन. सिप्पी ही जोडीसुद्धा अमिताभ सोबत नव्यानेच जुळली होती. फिल्मी मासिक, पोस्टर, ट्रेलर इत्यादींमधून हा कुठलातरी वेगळाच प्लॉट आहे असे लक्षात आले होते. उत्सुकता वाढीला लागली आणि १९८२ च्या जानेवारीमध्ये ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटगृहात रुजू झाला. १९५४ मध्ये आलेल्या ‘सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स’ या इंग्रजी चित्रपटाचा हा भारतीय अवतार होता. अमिताभ आणि दिग्दर्शक राज एन. सिप्पी या एकमेव चित्रपटात एकत्र आले होते. राज एन. सिप्पींनी एकूण वीसच्या वर सिनेमे दिग्दर्शित केले त्यातील १९७८ मधला विनोद खन्नाचा ‘इन्कार’ लक्षात राहिला होता. नंतर मात्र राज एन. सिप्पींची ओळख ‘सत्ते पे सत्ता’ चे दिग्दर्शक अशीच उरली.

युरोपिय पद्धतीच्या एका फार्महाउस मध्ये राहणाऱ्या सात भावांची ही कथा होती. आई वडील लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे शहरापासून दूर वडिलोपार्जित फार्म हाउस हेच त्यांचे जग आणि थोरला भाऊ रवी – अमिताभ हाच त्यांचं सर्वस्व. थोरला रवी आणि सगळ्यात धाकटा शनी म्हणजेच आपला सचिन पिळगावकर हे थोडेफार माणसाळलेले. बाकीचे पाच म्हणजे सोम ते शुक्र जणू अश्मयुगाच्या जरासे नंतरचे असावे इतके धटिंगण. सुधीर, शक्ती कपूर, पेंटल, कंवलजीत ही त्यांतील ओळखीची नावे. स्वप्नसुंदरी ही उपमा सार्थ वाटावी इतकी सुंदर या चित्रपटात दिसलेली हेमामालिनी अमिताभची पत्नी बनून फार्म हाउस वर येते तेव्हा तिला त्याचे इतके भाऊ आहेत आणि ते इतके जंगली आहेत ह्याची प्रथमच माहिती मिळते. या असंस्कृत धटिंगणांना माणसात आणणाऱ्या या रिंग-मास्टरची भूमिका हेमा मालिनीने उत्कृष्ट पद्धतीने केली होती.

मध्यंतरापर्यंत म्युझिकल कॉमेडी सुरू असते. गुलशन बावराने लिहिलेली गाणी आर.डी.बर्मनने त्याच्या खास शैलीत बनवली होती. ‘प्यार हमे कीस मोड पे ले आया’, ‘दुक्की पे दुक्की हो या सत्ते पे सत्ता’ आणि ‘दिलबर मेरे कब तक मुझे’ या गाण्यांनी तेव्हाची तरुणाई वेडावली होती.

सहा भाऊ, त्यांच्या सहा प्रेमिका, हेमामालिनी सोबतचा रोमान्स, आणि एवढे कमी होते म्हणून काय शेवटी अमिताभ सारखा दिसणारा सुपारी किलर ‘बाबू’ (पुन्हा अमिताभ) इतक सगळं अमिताभने सांभाळलं होत. ‘बाबू’ च्या भूमिकेतील अमिताभची एन्ट्री जीवाचा थरकाप उडवून देते. अमिताभची दुहेरी भूमिका असलेल्या या कथेत सात जंगली भावांच्या कुटुंबाचा प्रमुख असलेल्या साध्या भोळ्या अमिताभच्या जागी ‘बाबू’ नावाचा एक खतरनाक सुपारी किलर त्या कुटुंबात घुसतो. ही भूमिका सुद्धा अमिताभनेच केलेली.

एक साधा भोळा, रोमँटिक, कुटुंबवत्सल अमिताभ आणि दुसरा घाऱ्या डोळ्यांचा खतरनाक गुंड. थेट दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व वाटावी असा सरस अभिनय. डोळ्यावर घाऱ्या रंगाचे काँटॅक्ट लेन्स चढविणे आणि उतरविणे ही साधी क्रिया किती उत्कंठा निर्माण करू शकते ते अमिताभच्या अभिनयातून अनुभवावे. बाबूचा पडद्यावरील लूक अधिक प्रभावी करण्यासाठी आर.डी. बर्मनने दिलेले पार्श्वसंगीत तितकेच परिणामकारक होते. परिणाम अत्यंत मनोरंजक होता. पण या सिनेमाची ओळख मात्र ‘दारू पीने से लिव्हर खराब होता है’ या प्रसंगाशीच जुळून राहिली.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top