उत्तरार्धाचा दणकट प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan and Shahrukh Khan
उत्तरार्धाचा दणकट प्रारंभ

उत्तरार्धाचा दणकट प्रारंभ

‘जंजीर’मधून १९७३ मध्ये चित्रपट रसिकांना ‘अँग्री यंग मॅन’ मिळाला आणि दोन हजार या वर्षात झळकलेल्या ‘मोहब्बते’च्या माध्यमातून अमिताभच्या ‘सेकंड इंनिंग्ज’चं अर्थात महानायकाच्या प्रवासाचं महाद्वार उघडलं गेलं.

वाढलेलं वय आणि ‘मृत्युदाता’, ‘लाल बादशाह’सारखे चित्रपट पाहून आता अमिताभची कारकीर्द संपायला आली, असं कबूल करायला अमिताभच्या चाहत्यांचं मन तयार व्हायला लगलं होतं. तशात १९९९ मध्ये अमिताभशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना जागत यश चोपडा यांनी त्यांचे चिरंजीव आदित्य चोपडांना अमिताभकरिता खास भूमिका लिहायला सांगत सिनेमानिर्मितीची जबाबदारी घेतली. अमिताभच्या उतारवयाची चाहूल लागल्यामुळं १९८८ ते १९९६ या काळात जी प्रचंड पोकळी हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाली होती, ती भरून काढायला तीन-तीन खान पुढं आले होते. आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या अतिभव्य यशामुळं शाहरुख तेव्हा निर्विवादपणे तरुण कलाकारांत आघाडीवर होता. तेव्हा तरुणांच्या दिलाची धडकन असलेला शाहरुख आणि अमिताभ एकत्र येणार म्हटल्यावर चित्रपट रसिकांची उत्सुकता ताणली गेली.

अमिताभ, शाहरुख आणि ऐश्वर्या राय अशा दिग्गजांना घेऊन १९९९च्या जुलैमध्ये ‘मोहब्बते’चं चित्रीकरण सुरू झालं. दरम्यान, अमिताभनं एक क्रांतिकारी निर्णय घेत दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर दोन हजार या वर्षातच ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोमधून पदार्पण केलं.

‘केबीसी’ हा कार्यक्रम अमिताभच्या अभूतपूर्व संचालनामुळं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असतानाच त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘मोहब्बते’ पडद्यावर झळकला. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला अंगीकारल्या गेलेल्या आर्थिक उदारीकरणातून जी नवी उपभोक्ता संस्कृती उदयाला आली, त्या हाय-फाय संस्कृतीचं प्रतीक बनला होता शाहरुख खान. त्याच वावटळीत ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकून हिंदी सिनेमात टॉपवर पोहोचलेली ऐश्वर्या राय ‘मोहब्बते’तील तिसरी सेलिब्रिटी होती.

हिंदी चित्रपटातला श्रीमंतीच्या अफाट प्रदर्शनाचा सुरू झालेला सामाजिक ट्रेंड ‘मोहब्बते’मध्ये यशस्वीरीत्या पुढे नेला गेला. पंचतारांकित महविद्यालय, पंचतारांकित वसतिगृह आणि कमी कपड्यांत वावरणाऱ्या बोल्ड विद्यार्थिनी. ‘गुरुकुल’ नावाच्या महागड्या महाविद्यालयाचे अत्यंत कडक शिस्तीचे प्राचार्य नारायण शंकर बनले होते अमिताभ बच्चन. त्यांच्या शिस्तीत मोडता घालायचा विडा उचलून दाखल झालेला संगीत शिक्षक होता राज आर्यन (शाहरुख खान). प्राचार्य साहेबांच्या तरुणांमधील प्रेमविरोधी नीतीमुळं त्यांची मुलगी आणि आर्यनची प्रेयसी राहिलेल्या ऐश्वर्यानं काही वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली असते, तरी प्राचार्य महोदय आपल्या ‘प्रतिष्ठा, परंपरा और अनुशासन’ या मंत्रापासून ढळलेले नसतात. त्याच महाविद्यालयातील तीन नव-तरुण आणि त्यांच्या तिन्ही प्रेयसी यांना हाताशी धरून शाहरुख खान हे बंड उभारतो. आनंद बक्षींच्या गीतांना जतीन-ललित यांनी दिलेलं संगीत श्रवणीय होतं; पण चित्रपटाचं मुख्य आकर्षण होतं शाहरुख आणि अमिताभचं एकत्रित असणं!

‘प्रतिष्ठा, परंपरा और अनुशासन’ असे शब्द अमिताभच्या खर्जातल्या आवाजात महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये घुमतात आणि तीनही शब्दांचा अर्थ एकवटलेली भेदक नजर पूर्ण पडद्यावर उमटते. प्रगल्भतेकडं झुकलेले अमिताभचे पहिल्या पिढीतील चाहते तो परत आल्याचा नि:श्वास टाकतात. ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘शोले’मधील मधल्या काळात मंद पडलेली अमिताभच्या डोळ्यांतील आग नारायण शंकरच्या डोळ्यांत दिसली होती आणि या आगीत आता प्रेक्षकांच्या पुढल्या तीन पिढ्यासुद्धा लपेटल्या जाणार होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेमाच्या वाटेला लावून ‘बिघडविण्याचं’ काम अंगावर घेतलेल्या शाहरुखचा या चित्रपटातला वावर लक्षणीय होता. अमिताभनं आपल्या कडक लहेज्यात ‘‘मुझे आपका आत्मविश्वास पसंद आया, मिस्टर आर्यन’’, ‘‘मुझे किसी भी तरह का परिवर्तन पसंद नही’’, ‘‘इस इमारत की नीव इतनी मजबूत है की इसकी एक भी इट कोई भी राज आर्यन हिला नही सकता’’, ‘‘मुहोब्बत और डर की जंग मे जीत सिर्फ डर की होती है, मिस्टर आर्यन’’, ‘‘ऐसी ताकत को तो मै देखना चाहुंगा’’, असे स्वतःचा खंबीर स्वभाव रेखांकित करणारे संवाद फेकतानाच, शेवटी हृदयपरिवर्तन झाल्यांनतर ‘‘जिंदगी प्यार लेने और देने का नाम है, और कुछ भी नही’’ असं म्हणून अमिताभनं अंगावर काटा आणला होता. काळी शेरवानी, पांढरी दाढी, कपाळावर लाल टिळा आणि भेदक नजर घेऊन गुरुकुलाच्या इमारतीतील कॉरिडॉरमधून चालणाऱ्या रुबाबदार अमिताभसमोर शाहरुख खान टिकला, ही शाहरुखची कमाल. शाहरुखनं वाट्याला आलेली भूमिका त्याच्या खास पद्धतीनं, ज्यात थोडा ओव्हर ॲक्टिंगचा हवाहवासा तडका असतो, छान वठवली. समोर साक्षात् अमिताभ असताना त्याच्या नजरेला नजर भिडवून संवादफेक करणारा शाहरुख मनाला भावला. देहबोली, मुद्राभिनय आणि संवादफेक ह्या तीनही अंगानं अमिताभनं पडद्यावर राज्य केलं.

चित्रपटाच्या शेवटी अमिताभ शाहरुखला म्हणतो, ‘‘मैने कहाँ था मिस्टर आर्यन, प्यार और डर की जंग मे जीत हमेशा डर की होती है,’’ ह्यावर शाहरुखच्या “जहाँ से मै देख रहा हूँ, आप आज भी हार गये है मिस्टर नारायण शंकर” या वाक्यानं सुरू होणाऱ्या दीर्घ संवादाच्या दृश्याला त्या वर्षीचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दृश्याचा पुरस्कार मिळाला होता.

यश चोपडा, आदित्य चोपडा यांचे आभार याकरिता मानायचे की, ‘मोहब्बते’मधून त्यांनी अमिताभच्या डोळ्यांत ‘दिवार’च्या काळातील आग पुन्हा चेतवली आणि रसिकांना आजपर्यंत सुरू असलेल्या अमिताभच्या दीर्घ उत्तरार्धाचा आनंद घ्यायची संधी मिळवून दिली.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top