प्रेमाची अशीही भन्नाट पाककला!

आर. बल्की या तरुण दिग्दर्शकाच्या प्रतिभेची चुणूक २००७ मध्ये प्रदर्शित ‘चीनी कम’ ह्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रथमच बघायला मिळाली होती.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal
Summary

आर. बल्की या तरुण दिग्दर्शकाच्या प्रतिभेची चुणूक २००७ मध्ये प्रदर्शित ‘चीनी कम’ ह्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रथमच बघायला मिळाली होती.

आर. बल्की या तरुण दिग्दर्शकाच्या प्रतिभेची चुणूक २००७ मध्ये प्रदर्शित ‘चीनी कम’ ह्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रथमच बघायला मिळाली होती. चित्रपटाच्या नावातील वेगळेपण विषयाचा संदर्भ लागू देत नव्हतं. फारशा अपेक्षा न ठेवता चित्रपट पहायला गेलो आणि पहिल्याच दृश्यात लंडन येथील एका पॉश रेस्टॉरंटच्या भटारखान्यातील दृश्य बघायला मिळालं. गेल्या सात पिढ्या शेफच्या व्यवसायात असाव्यात असा आत्मविश्वास आणि स्वतःच्या पाककलेविषयीचा अहंकार मनात बाळगणाऱ्या चौसष्टवर्षीय हाय-फाय शेफ बुद्धदेवच्या वेशात दिसला आपला अमिताभ बच्चन. रेस्टॉरंटचा चालक-मालक असलेला हा शेफ आपल्या शेफगिरीच्या प्रेमात इतका रमलेला असतो, की चौसष्ट वर्षांचं वय होईपर्यंत त्याला जीवनात इतर कुठल्या प्रेमाची गरजच भासत नाही. त्याची त्र्याण्णव वर्षांची अरभाट पंजाबी म्हातारी (जोहरा सैगल), वयापेक्षा खूप जास्त परिपक्वतेनं बोलणारी; पण रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार घेत असलेली शेजारची आठवर्षीय गोड मुलगी ‘सेक्सी’ (स्वायनी खारा) इतकंच त्याचं रेस्टॉरंटच्या बाहेरचं जग असतं. पण, वयाच्या पासष्टाव्या वर्षी एकेदिवशी त्याच्या शेफगिरीच्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडविणारी घटना घडते.

चौतीसवर्षीय सुंदर, लाघवी तब्बू त्याच्या रेस्टॉरंटमध्ये येते आणि तिला तेथील ‘जाफरानी हैदराबादी पुलाव’ चवीला गोड लागत असल्यामुळे ऑर्डर केलेली डिश ती परत पाठवते. आपल्या रेस्टॉरंटमधील पाकक्रियेचा टोकाचा अभिमान बाळगणारा हा शेफ सरळ तिची तक्रार उडवून लावतो आणि तुम्हालाच खाण्याची चव नाही, अशा आशयाचा प्रतिवाद करतो. शिवाय, ‘जाफरानी हैदराबादी पुलाव’ बनवून दाखविण्याचं आव्हान देतो. नंतर दोनेक दिवसांनी चव घ्यायची म्हणून वेटरच्या हातातील डिशमधील चमचाभर ‘जाफरानी हैदराबादी पुलाव’ तोंडात टाकतो आणि आपल्या रेस्टॉरंटमधील या डिशचं छाती फुगवून कौतुक करतो. हा पुलाव आपल्या रेस्टॉरंटचा नसून, त्यादिवशी आलेल्या बाईंनी तुमच्यासाठी योग्य तो ‘जाफरानी हैदराबादी पुलाव’ बनवून पाठवला आहे, असं वेटर उच्चारताच त्याला ४४० व्होल्ट्सचा झटका बसतो. आपल्यापेक्षा सरस चव हाताला असलेली ही कोण... हा प्रश्न पडलेल्या बुद्धदेवाचं हृदय चौसष्ट वर्षांत पहिल्यांदाच स्त्री-प्रेमाच्या फोडणीचा सुवास झोंबल्याचं मान्य करू लागतं.

पाककलेचा अहंकार तुटल्याचं कबूल करणं या शेफला जड जातं; पण दोघांतील तीस वर्षांचं अंतर दिल्लीनिवासी तब्बूच्या गिणतीतही नसतं.

चौसष्ट वर्षांचा प्रेमी आणि चौतीस वर्षांची प्रेमिका अशा जोडीचं प्रेम लग्नात रूपांतरित होण्याची भारतीय वातावरणात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट कशी शक्य होते, त्याची गंमत म्हणजे ‘चीनी कम’ सिनेमा. सासरा परेश रावल अठ्ठावन्न वर्षांचा आणि होणारा जावई अमिताभ चौसष्ट वर्षांचा. शिवाय, हा सासरा म्हणजे दिवसभर गांधीजींचं नाव घेत आठवड्यातील सहा दिवस मांसाहार करणारं, दुटप्पीपणाने ठासून भरलेलं आदर्श भारतीय रसायन.

हा गमतीदार प्रवास जोहरा सैगल, स्वायनी खारा, परेश रावल आणि लंडनमधील अमिताभच्या रेस्टॉरंटमधील कर्मचारीवर्ग (ज्यांतील एक आपला मराठमोळा निखिल रत्नपारखीसुद्धा होता) यांच्या सोबतीनं आनंदमय होतो. प्रेमीजिवांच्या वयांतील अंतर अथवा तत्सम विरोधाभासापेक्षा प्रेमाचं महत्त्व अधिक असल्याचं तथ्य हा सिनेमा अधोरेखित करतो. चित्रपटाचं लेखन आणि संवादसुद्धा आर. बल्कींचेच. छोट्या-छोट्या वाक्यांतील विनोद ही त्यांची खासीयत. त्र्याण्णव वर्षं वयाची आई जोहरा सैगल आणि चौसष्ट वर्षांचा मुलगा अमिताभ ह्यांच्यातील नोक-झोक खुमासदार होती. पूर्ण चित्रपटात हे माय-लेक एकदाही आपसांत सरळ बोलताना दिसत नाहीत, तरी त्या दोघांमधील संवादातून त्यांचं आपसांतील प्रेम व्यक्त होत राहतं. चित्रपट या माध्यमाची महती कळलेला दिग्दर्शक असला की कसले चमत्कार पडद्यावर होऊ शकतात, त्याचं हे उदाहरण. लंडनच्या भारतीय रेस्टॉरंटमधील वातावरण, तिथं घडणारे मिश्कील विनोद, रेस्टॉरंटमधील तब्बूच्या प्रत्येक भेटीतील उत्कंठा, दोघा वयस्क व्यक्तींमध्ये छत्रीच्या देवाण-घेवाणीतून फुललेलं प्रेम, दोघांनाही वाढलेल्या वयातून येणाऱ्या शारीरिक मर्यादांची जाणीव असणं, इतक्या विविध भावना हलक्याफुलक्या पद्धतीने आपल्यापर्यंत येत राहतात.

आठवर्षीय मुलीच्या कर्करोगाच्या दुःखाची बोच तिच्या चटपटीत गप्पांमुळे अधिक तीव्रतेनं जाणवते. खरं प्रेम सापडल्यासरशी चौतीस वर्षं वयाच्या तब्बूने चौसष्ट वर्षं वयाच्या अमिताभसोबत वयाचं अंतर न बघता संसार मांडण्यास तयार होणं, चौसष्ट वर्षं वयाच्या होऊ घातलेल्या जावयापेक्षा वय कमी असूनही थिजलेल्या जीवनऊर्जेसोबत जगणारा परेश रावल, आठ वर्षं वयाच्या छकुलीचा असाध्य आजाराने जवळ आलेला अंत, त्याच वेळी नव्वदी पार केलेली म्हातारी जोहरा सैगलचा जिंदादिल स्वभाव... ह्या सगळ्या उदाहरणांमधून वय हा केवळ आकडा आहे, ह्याचा जीवनातील आनंद कमी-जास्त होण्याशी संबंध नाही, हे सिद्ध करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. ह्यासाठी आठपासून वय वर्षं त्र्याण्णवपर्यंतची सगळीच पात्रं त्याने प्रस्तुत केली होती.

नव्वदीची म्हातारी आई, चौतीसची प्रेमिका, अठ्ठावन्न वर्षांचा सासरा आणि केवळ आठ वर्षांची मैत्रीण... इतक्या विविध वयोगटांतील पात्रांशी चौसष्टवर्षीय अमिताभने साधलेला ताळमेळ अविश्वसनीय होता. निरूपा रॉय, सुलोचना, इतकंच काय खुद्द राखीसुद्धा ‘शक्ती’ चित्रपटात अमिताभची आई झाली होती; पण ‘चीनी कम’ चित्रपटात जोहरा सैगल आणि अमिताभ ह्या माय-लेकांची चटपटीत आणि खुमासदार जोडी सर्वांत वेगळी ठरली.

चौसष्ट वर्षं वयाच्या शेफच्या भूमिकेत अमिताभने सगळे रंग व्यवस्थित उधळले होते. आकर्षक आणि तरुण तब्बूचा वयस्क प्रेमी म्हणून अर्धा सिनेमा ‘पोनी टेल’ घेऊन फिरलेल्या अमिताभच्या आकर्षक दिसण्यात वय कुठंच आडवं येत नाही. एका मजेदार म्हातारीचा मजेदार मुलगा, मृत्युशय्येवर असलेल्या एका आठवर्षीय बालिकेचा फास्ट फ्रेंड, पोथीनिष्ठ दुटप्पीपण अंगी बाळगणाऱ्या, वयाने लहान असलेल्या, होऊ घातलेल्या सासऱ्याला वैतागलेला उपवर आणि लंडनमधील ‘स्पाइस-६’ ह्या त्याच्या रेस्टॉरंटमधील निष्ठावान आणि अकडू शेफ-कम-मालक झालेला अमिताभ, केवळ अप्रतिम. खरं म्हणजे वय हा केवळ आकडा आहे, अधिक काही नाही, हे सिद्ध करण्यास अमिताभचं व्यक्तिमत्त्व पुरेसं होतं, त्यात ‘चीनी कम’मधील मिश्कीलतेच्या वाजवी साखरेनं अविट गोडी आणली आणि अमिताभच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातील हा महत्त्वाचा सिनेमा होऊन बसला.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com