बेरकी म्हाताऱ्याचं भंगलेलं स्वप्न

आयुष्यमान खुराना आणि अमिताभ बच्चन या दोघांना शुजीत सरकार २०२० मध्ये एकत्रितपणे घेऊन आले ते ‘गुलाबो-सिताबो’ हे अनाकलनीय नाव असलेल्या चित्रपटात.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal
Summary

आयुष्यमान खुराना आणि अमिताभ बच्चन या दोघांना शुजीत सरकार २०२० मध्ये एकत्रितपणे घेऊन आले ते ‘गुलाबो-सिताबो’ हे अनाकलनीय नाव असलेल्या चित्रपटात.

आयुष्यमान खुराना आणि अमिताभ बच्चन या दोघांना शुजीत सरकार २०२० मध्ये एकत्रितपणे घेऊन आले ते ‘गुलाबो-सिताबो’ हे अनाकलनीय नाव असलेल्या चित्रपटात. सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना, चित्रपटगृहं बंद असताना, जूनच्या महिन्यात अमिताभ बच्चनने ओटीटी (ओव्हर द टॉप) अशा माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करवून बदलत्या युगात या प्लॅटफॉर्मचं महत्त्व अधोरेखित केलं. गढ्या-महालांचं वैभव उतरणीला लागल्यानंतर येणारं औदासीन्य, मानहानी आणि फिक्कट पडलेल्या जीवनरंगाची ही कहाणी आहे. परंतु, दिग्दर्शक शुजीत सरकार आणि लेखिका जुही चतुर्वेदीने ज्या मिस्कील ढंगात ती सादर केली, त्यामुळे गंभीर वाटू शकला असता असा हा चित्रपट आपण गालातल्या गालात हसत बघतो.

पहिल्याच दृश्यात एक जख्ख म्हातारा एका जुनाट हवेलीच्या बोळकांडातील इलेक्ट्रिकचा बल्ब मध्यरात्रीच्या भकास वातावरणात चोरत असताना आपणास दिसतो. पण, त्याच्या हालचालींत चोराची लगबग नसते. नजर मात्र चोरटी आणि हलकट अशी जाणवते. हा अठ्ठ्याहत्तर वर्षांचा लखनवी म्हातारा रंगवला आहे साक्षात अमिताभ बच्चनने.

पहिल्या प्रथम तर अमिताभला मिर्झा ह्या पात्राच्या वेशभूषेत ओळखणंच जड जातं. पण चित्रपटात अमिताभ आहे हे आधीच माहीत असल्यामुळे सहजच अमिताभ ओळखू येतो आणि मग सुरू होते लखनौमधील जुनाट; पण खानदानी अशा ‘फातिमा महल’ नावाच्या एका हवेलीच्या प्रेमापोटी घडून येणाऱ्या गमतीची सफर.

उत्तर भारतातील कठपुतलीसारख्या एका बाहुल्यांच्या खेळाला ‘गुलाबो सिताबो’ असं नाव आहे. मिर्झा चुन्नन नवाब या लखपती म्हाताऱ्याने, हवेलीच्या मालकीसाठी आयुष्यभर अंतःकरणात पोसलेल्या हावरटपणाची ही कथा आहे. या चित्रपटात लखनवी वातावरणातील जुनाट फातिमा महलचं चरित्र उभं झालं असून, या हवेलीच्या भोवतीची मानवी आकांक्षांची विविध रूपं लेखिका जुही चतुर्वेदी ह्यांनी रेखाटली आहेत. फातिमा बेगम (फारुखा जफर) ही खानदानी म्हातारी या हवेलीची मूळ मालकीण असते. तिच्या गर्भश्रीमंत वडिलांनी मृत्यूपूर्वी ही हवेली तिच्या नावे केलेली असते. हवेलीप्रती असलेल्या प्रेमापोटी बेगम परदेशी जाणाऱ्या श्रीमंत नवऱ्याला टाकून देते आणि वयाने तिच्यापेक्षा पंधरा वर्षं लहान चिंधीचोर मिर्झाशी निकाह लावते. अट एकच असते, हवेलीत राहायचं. कोत्या मनाचा, लालची, फटीचर मिर्झा तिचा मिंधा बनून आयुष्य हवेलीत घालवतो. वैभव गेलं तरी मालकिणीचा नवाबी पीळ कायम असतो; पण हवेलीचं ओसरलेलं वैभव औदासीन्याची छाप मनावर सोडून जातं. नवाबीण बाई वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षात बरेचदा असंबद्ध बोलतात; पण त्या असंबद्धतेतसुद्धा नवाबी आब असतो. कुठलीही जुनी गोष्ट सांगत असताना म्हातारी सहजच नेहरूजींच्या भेटीचा संदर्भ देत असते.

एकेकाळी नवाबी मानसन्मान भोगलेल्या हवेलीत असुविधांचा सामना करत, सार्वजनिक संडासाच्या वापरासाठीदेखील स्पर्धा करणारे अतिसामान्य भाडेकरू राहू लागतात, यातच मान, सन्मान, वैभव ह्या कल्पना कशा क्षणभंगुर आहेत, त्याची प्रचिती येते. नाममात्र भाड्यावर अनेक वर्षांपासून हवेलीत चिकटून बसलेली ही बिऱ्हाडं गरिबीत शिणलेली सर्वसामान्य माणसं असतात. त्यांत पिठाची गिरणी चालविणारा तरुण बांके रस्तोगी (आयुष्यमान खुराना) आणि हवेलीच्या मालकिणीचा अठ्ठ्याहत्तर वर्षीय नवरा अमिताभ यांचा संघर्ष मनोरंजक झाला आहे. भाडेकरूंकडे तुटपुंज्या भाड्यासाठी तगादा लावणारा, स्वतःच्याच हवेलीतील दिवे, झुंबर, फर्निचर बेगमपासून चोरून विकणारा मिर्झा जेव्हा बांकेसाठी ‘घर मे नही दाने, अम्मा चली भूनाने’ किंवा ‘इनकी जायदादवाली सूरत कहाँ!’ असं म्हणून हिणवतो, तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही.

त्र्याण्णववर्षीय बेगम मेल्यानंतर हवेली आपल्या नावाने होईल, ह्या एकमेव आशेवर जगलेला भिकार मिर्झा एकदा बेगम आजारी पडते, तेव्हा तिच्या मरणापूर्वीच तिच्या दफनविधीची पूर्ण तयारी करून ठेवतो. नवाबी घराण्यातल्या बाईच्या कफनसाठीसुद्धा तो दुकानात भाव करण्यास मागे-पुढे पाहत नाही. पण, नवाबीणबाई जिवंत राहून त्याच्या आशेवर पाणी फिरवतात.

पुरातत्त्व विभागातील भ्रष्ट अधिकारी, बिल्डर आणि राजकारण्यांची हवेलीवरील नजर, भाडेकरूंची जीव गेला तरी हवेली खाली न करण्याची वृत्ती आणि लखनवी वातावरण... हे सगळं पाहताना आपण त्या हवेलीशी संबंधित कुणीतरी आहोत असं वाटायला लागतं; आणि मग येतो अकल्पनीय धक्कादायक क्लायमॅक्स. हा क्लायमॅक्स बांके आणि मिर्झा या दोन्ही प्रमुख पात्रांसाठी अत्यंत क्लेशकारक सिद्ध होतो. सर्वसामान्यांची उथळ मानसिकता उजागर करणारं हे व्यंग मस्त जमलं होतं. एक सामान्य तरुण आयुष्यमानने हुबेहूब उभा केला. विजय राज या कलाकाराने सरकारी औधेदारांची नासकी वृत्ती उत्तम पद्धतीने मांडली. मजेदार शैलीत सादर झालेली मानवी आचरणाची ही गंभीर कथा अमिताभशिवाय अपूर्ण राहिली असती, इतका तो मिर्झाच्या भूमिकेत चपखल बसला आहे. एका जख्ख लखनवी म्हाताऱ्याचं चालणं-बोलणं, संवादफेकीतील लखनवी लहेजा... सगळंच अप्रतिम. एका खुसट म्हाताऱ्याची भूमिका करताना अमिताभने देहबोलीतून केलेला अभिनय बघण्यासारखा आहे. धक्कादायक असं काही ऐकायला मिळालं की अठ्ठ्याहत्तर वर्षांचा हा म्हातारा तोल जाऊन पडण्याचं दृश्य चित्रपटात कमीत कमी सहा वेळा तरी आलं आहे आणि प्रत्येक वेळी अमिताभने अविश्वसनीयरीत्या त्यातील वैविध्य कायम राखलं आहे.

पार्श्वभूमीला वाजणाऱ्या एका गाण्याच्या ‘बनके मदारी का बंदर, डूगडूगी पे नाचे सिकंदर’ ह्या ओळी मिर्झाच्या व्यक्तिमत्त्वावर फिट्ट बसल्या आहेत. नवाबी खानदानीतील बेगमकडून मिंधेपणाने खर्चासाठी चिल्लर पैसे मागत जगणाऱ्या मिर्झाचं भाडेकरू आणि इतर जगाशी मात्र जबरदस्त टेचीत भांडण सुरू असतं. ‘जा रहे है मलाई पान खाने’, ‘हम डरते नही है... दबोच दिये जावोगे...’, ‘हवेली हमारी, जमीन हमारी, मर्जी हमारी... कैसे नही बेच सकते...’, ‘हमारी मोहब्बत है, उल्फत है हवेली...’, ‘हवेली और हमारे बीच आना ना, वरना ऐसा हाल कर देंगे...,’ असं फुकाचं धमकावणं हा मिर्झाच्या चरित्राचा महत्त्वाचा पैलू ठरला आहे. ही सगळी गंमत अवास्तव वाटत नाही, ही अमिताभच्या अभिनयाची कमाल. तरुण दिग्दर्शकांना म्हाताऱ्या अमिताभमध्ये बाहेर येण्यासारखं अजून काय काय दिसून पडतं ते काळच सांगू शकेल. आपण मात्र अमिताभच्या कलाकारीचा दीर्घकाळ आनंद घेत राहण्याची कामना करू या.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com