कल्याणकारी सत्ताबाह्य शक्तिकेंद्र

सरकार स्वत: राजकारणात नव्हते पण ताकदीच्या भरवशावर राजकारण वाकवणारे होते. ‘गॉडफादर’ चित्रपटाला ही आपल्यातर्फे आदरांजली आहे, असा उल्लेख रामगोपाल वर्माने चित्रपटाच्या सुरुवातीलाच केला होता.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal
Summary

सरकार स्वत: राजकारणात नव्हते पण ताकदीच्या भरवशावर राजकारण वाकवणारे होते. ‘गॉडफादर’ चित्रपटाला ही आपल्यातर्फे आदरांजली आहे, असा उल्लेख रामगोपाल वर्माने चित्रपटाच्या सुरुवातीलाच केला होता.

काळी लुंगी, काळा झब्बा, मनगटावर रुद्राक्षाची माळ, कपाळावर शेंदुराचा टिळा, पांढरे विस्कळीत केस, तशीच दाढी, कपातील चहा बशीत ओतून धिटाईने पिणार इथपर्यंत ठीक आहे... पण ‘सरकार’वाली जरब कुठून आणणार? त्याचं उत्तर होतं अमिताभच्या इंटेन्स डोळ्यांमध्ये. हे जणू हत्यारच होतं अमिताभचं. २००५ मध्ये आलेला रामगोपाल वर्मांचा ‘सरकार’ बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित आहे, अशा वावड्या उठल्या होत्या आणि अर्थातच महाराष्ट्रात या चित्रपटाविषयी उत्कंठा ताणली गेली होती. प्रत्यक्ष चित्रपट बघताना लक्षात येतं की, बाळासाहेबांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासारखा बंगला, आतील मराठमोळा वावर आणि मराठी वातावरण सगळं काही तसंच होतं... पण ही कथा कुण्या राजकारण्याची नसून ती होती एका ‘जिसके पास पावर है, उसका रांग भी राईट होता है’ या तत्त्वावर जगणाऱ्या ‘गॉडफादर’ सारख्याची.

सरकार स्वत: राजकारणात नव्हते पण ताकदीच्या भरवशावर राजकारण वाकवणारे होते. ‘गॉडफादर’ चित्रपटाला ही आपल्यातर्फे आदरांजली आहे, असा उल्लेख रामगोपाल वर्माने चित्रपटाच्या सुरुवातीलाच केला होता. अमिताभने रामगोपाल वर्माच्या दिग्दर्शनात सुमारे आठ चित्रपटांत अभिनय केला. पण त्यातील ‘सरकार’ मालिकेतील तीन चित्रपटच उल्लेखनीय ठरले. महान ‘शोले’च्या नावावर कलंक म्हणावा असा ‘रामगोपाल वर्मा की आग’ हा ‘शोले’चा तथाकथित रिमेकदेखील त्यात सामील आहे.

‘सरकार’सारखे व्यक्तिमत्त्व उभे करण्यासाठी तेवढ्याच उंचीचा माणूस आवश्यक होता. सहा फूट दोन इंचांची शारीरिक उंची त्याच्यातील प्रतिभेपेक्षा ठेंगणीच वाटावी, असा अमिताभच सरकारच्या भूमिकेसाठी योग्य होता. सुरुवातीलाच त्याच्या धारदार नजरेसोबत खर्जातला आवाज कानी पडतो ‘मै किसीको सोचने से नही, करने से रोकता हूँ.’ दुर्दम्य आत्मविश्वास अंगी असलेली ही व्यक्तिरेखा साकार करण्यासाठीच जणू अमिताभ घडला होता. ‘दिवार’मधील ‘मै जानता हूँ की मै ये काम अकेले कर सकता हूँ’ किंवा ‘शोले’मधील ‘जब दारू उतरेगी, वो भी नीचे उतर आयेगा’ असा आत्मविश्वास त्याच्या व्यक्तिमत्त्वावर शोभत असे. भरल्या कुटुंबात बायको, सुना, मुलं, नातू आणि अत्यंत घातक असे अंगरक्षक ‘कार्यकर्ते’ ह्यांचा सारखाच वावर असलेल्या बंगल्यातून सरकारचा इतरांना बेकायदा वाटण्यासारखा पण कल्याणकारी कारभार चालत असतो. कुटुंब किंवा जगापासून आडपडदा न ठेवता केलेल्या ह्या व्यवहारामध्ये ‘मुझे जो सही लगता है, मै करता हूँ। वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलीस, कानून या फिर पुरे सिस्टिम के खिलाफ क्यो न हो,’ ही भावना असते. ही भावना असंवैधानिक असते, कायदाबाह्य असते पण सामान्य लोकांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होणाऱ्या समाजात असे नियमबाह्य शक्तिकेंद्र निर्माण होत असतात आणि त्यांचे व्यक्तिस्तोम माजवले जाते, कारण त्यांनी केलेली मदत ही व्यक्तिगत स्तरावरची असते.

मुद्दा होता अशा प्रकारचे शक्तिकेंद्र पडद्यावर विश्वसनीय ठरण्याचा आणि विविध प्रसंगांत अमिताभच्या उत्कट अभिनयाने ती गरज पूर्ण केली होती. विष्णू (के.के.) आणि शंकर (अभिषेक बच्चन) अशी सरकारची दोन मुले असतात. सरकारची लोकप्रियता आणि सर्वमान्यतेचे भांडवल करण्यास विष्णू हा तामसी वृत्तीचा पुत्र उतावीळ झालेला असतो.

मिळालेल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची त्याची वृत्ती सरकारला पदोपदी व्यथित करत असते. पूर्ण कुटुंब एकदा डायनिंग टेबलावर असताना विष्णू असेच अश्लाघ्य शब्द काढतो आणि त्यावर सरकारचा संताप पाहण्यासारखा आहे. ‘विष्णू, कितनी बार कहाँ तुझसे ....’ आणि नंतरच्या एका प्रसंगात ‘विष्णू, अभी...इसी वक्त, इस घरसे निकल जा। आज के बाद इस घर के आस पास भी दिखने की गलती मत करना ...’ बाहेरील नाठाळांना ठीक करणारी भाषा पहिल्यांदाच सरकार घरच्या माणसासाठी वापरतो आणि तिथे त्याची खरी ताकद दिसून येते.

सरकार हा चित्रपट पूर्णत: अमिताभचा होता. विविध प्रसंगात अत्यंत जवळच्या कोनातून कॅमेरा लावून भावना प्रदर्शित करणाऱ्या अमिताभने उत्कटतेची अकल्पनीय उंची गाठली होती. ‘नजदिकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिये’ अशी दूरदृष्टी आणि ‘ताकत लोगोको जोडने से बनती है, उनको खिलाफ करने से नही’ अशी प्रगल्भ धारणा असलेल्या सरकारला एका राजकीय खुनाचा संशयित म्हणून पोलिस त्याच्या बंगल्यातून अटक करून घेऊन जात असतात. बंगल्याबाहेरच्या भिंतीपलीकडून सामान्याची गर्दी अस्वस्थपणे ते दृश्य पाहत असते. तणाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सरकार पोलिस व्हॅनमध्ये बसणार इतक्यात एक पेटलेला समर्थक पोलिस गाडीवर दगड मारतो. लगेच पोलिस हत्यार उपसतात.

आता इथे राडा होणार असे वाटत असताना सरकार मराठीत ललकारी देतो ‘थांबा !... थांबा !!’ दुसरा आवाज द्यायचं काम पडत नाही. संतप्त जमाव शांत होतो. पोलिस शांतपणे सरकारला सोबत घेऊन जातात. जननायकाच्या एका शब्दातील ताकद दिसून पडते. जेव्हा सरकारचा ज्येष्ठ पुत्र विष्णू शत्रूंशी संगनमत करून त्याचा खून करण्यास घरी येतो आणि तसे करताना तो लहान मुलाच्या हातून धरला जातो, त्यावेळी अमिताभच्या अदाकारीतील सशक्तता अधिकच तीव्रतेने जाणवते. त्या हल्ल्यातून वाचल्याच्या आनंदापेक्षाही मुलाच्या मनात आपल्याविषयी इतकं विष भरलेलं असावं ह्या भावनेने इतक्या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेला सरकार अंतर्मुख होतो. सुप्रिया पाठक, के.के., अभिषेक बच्चन सगळ्यांनीच समरसून कामं केली होती. सरकारची पत्नी झालेली सुप्रिया पाठक मराठमोळ्या अवतारात लक्षात राहिली होती. एक सत्ताबाह्य शक्तिकेंद्र असलेल्या सरकारची भूमिका अमिताभने पडद्यावर साकारली होती. एकाच वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचं समांतर केंद्र संचलित करत असताना सरकारचा कौटुंबिक जीवनातील मराठमोळा, कुटुंबवत्सल वावर सहज वाटणं, ही अमिताभच्या अभिनयाची कमाल होती. देहबोलीतील भारदस्तपणा आणि उत्कट मुद्राभिनय काय असतो, ह्याचा वस्तुपाठ घालून दिला होता ‘सरकार’ अमिताभने....!!

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com